चटका..

>> बुधवार, १९ जानेवारी, २०११

एक १० -१२ वर्षांची चिमुरडी. प्राण्यापक्षांची तिला खूप आवड. घरात एक गोजिरवाणे कुत्रे, एक छोटसं मांजराचं पिल्लू आणि सतत वटवट करणारा एक बोलका राघू. या सगळ्यांनी तिचं आयुष्य अगदी व्यापून टाकलेलं. हे मुके जीव तिच्या लहानश्या विश्वाचा अविभाज्य भाग होते. अशातच तिचा तो प्राणप्रिय मोत्या कुत्रा आजारी पडला. काही खाईना-पिईना, सतत मलूल असा पडून राहायचा. ती शाळेला जाताना तिच्या अंगावर उड्या मारून, "मला पण घेऊन चल" असे मुक्याने विनवणारा मोत्या तिला जाताना पाहून फक्त मान वर करून परत मरगळून झोपू लागला. हे सगळं जाणवून की काय, मोत्याला भयानक टरकून असणारं ते मनीमाऊचं पिल्लू देखील मोत्याच्या आसपास वावरून आपलं त्याच्यावर असणारं प्रेम व्यक्त करू लागलं. राघू ची सतत चालू असणारी वटवट फक्त " टीर्र! मोत्या उठ! टीर्र" एवढीच मर्यादित झाली. पण कसल्याश्या आजाराने थकलेला मोत्या या सगळ्या गोतावळ्याला सोडून गेलाच. त्याला जवळच असणाऱ्या प्राण्याच्या दफनभूमीत पुरण्यात आलं.

त्या एका दिवसाने त्या मुलीचं अवघं आयुष्यच बदलून गेलं. तिला जिथे तिथे मोत्याच दिसू लागला. वेड्यासारखंच काहीतरी करायला लागली ती. मोत्या मेला, हेच पटायला तयार नाही तिला. तिला वाटलं तो तिला सोडून गेला दूर कुठेतरी. आपली मनी आणि राघू पण आता आपल्याला सोडून जाणार या धास्तीने त्यांना सतत जवळ घेऊन बसू लागली. जेवताना, झोपताना सगळीकडे मनी आणि राघू. शाळेत जायला तयार होईना, का तर ती शाळेत गेल्यावर मनी आणि राघू तिला सोडून गेले तर?

घरचे लोक  थोडेसे धास्तावलेच. त्यांना आधी वाटलं होतं की काही दिवस ही असे करेल, पण एकदा शाळा, अभ्यास सुरु झाला, की विसरेल सगळं. पण कसलं काय, मोत्या जाऊन ३ महिने लोटले तरी तिचं हे सगळं चालूच होतं. तिच्या बाबांनी तिला नवा मोत्या आणूया असं सांगून समजावयाचा प्रयत्न केला, पण तिला काही केल्या तोच मोत्या हवा होता. आता मोठं कुत्रं तर आणू शकत नव्हते ते. ते बरं अचानक या सगळ्यांना आपलंसं करेल. त्याला सगळ्यांची सवय तर लागायला हवी. या विचाराने तिच्या बाबांनी अगदी तसंच दिसणारं त्याच जातीचं एक पिल्लू आणलं. तिने ते स्वीकारलं पण "तो मोत्याच", हे काही तिला पटलं नव्हतं. ती त्याच्यावर मोत्याइतकं प्रेम करायची नाही, त्याला दूर दूर करायची. त्याला दिलेली ताजी पोळी आणि दूध मनीला द्यायची. फक्त मनी आणि राघुशी प्रेमाने वागायची. कितीही नाही म्हणलं तरी प्राण्यांनाही कळतंच, कोण त्यांच्यावर प्रेम करतं आणि कोण नाही ते. त्या बिचाऱ्या पिल्लालाही जाणवलं की ही त्याचा राग राग करतेय, तिला आपण आवडत नाही. ते पण तिच्यापासून दूर पळू लागलं, ती येताना जरी दिसली तरी कर्कश्श ओरडू लागलं. तिला जवळपास देखील फिरकू देईना.

तशातच त्या मुलीला स्वप्नात देखील मोत्याच दिसू लागला. झोपेतून ओरडत उठायची, "मोत्या मला बोलावतोय, त्याला कुणीतरी खूप मारलंय,मी जाते त्याच्याकडे" असं म्हणून घरातून दाराच्या दिशेने चालू लागायची. घरच्यांना आता थोडी थोडी भीती वाटायला लागली. हिच्या मनावर काही परिणाम तर नाही ना झाला, या विचाराने त्यांचं डोकं गरगरायला लागलं. लवकरात लवकर एका चांगल्या मानसोपचार तज्ञांकडे जायचं असा विचार पक्का झाला.

एक दिवस सकाळी ती मुलगी उठली. कधी नव्हे ते छान आवरून, एकदम शांतपणे, शहाण्या मुलीसारखी जिना उतरून खाली आली, आणि वडिलांना म्हणाली, "बाबा, आपला मोत्या परत आलाय, बाहेर दारात आपल्या सगळ्यांची वाट पाहतोय, पण त्याला ना आपण आवडलो नाही, त्याने दुसऱ्या मालकांकडे रहायचं ठरवलयं. तर मी त्याला सोडून येते त्यांच्या कडे." घरचे संभ्रमात. बोलतेय तर शहाण्यासारखी, पण मोत्या बाहेर आलाय, म्हणजे काय? सगळे तिच्या मागून बाहेर गेले. अर्थातच बाहेर कुणी नव्हतं. अचानक  एका दिशेला बोट करून ती बोलायला लागली "तो पहा मोत्या, किती छान गब्बू झालाय ना आता. मीच त्याला कदाचित नीट खाऊ देत नसेन, म्हणून तो मला सोडून गेला. नव्या मालकांकडे त्याची तब्येत छान सुधारलीय, ते त्याच्यावर खूप प्रेम करतात."  तिच्या आईच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहायला लागले. आपली मुलगी अशी भान हरपून काल्पनिक जगात वावरतेय या जाणीवेने तिच्या आई-वडिलांच्या पोटात धस्स झालं.

ती बोलतच होती, "बाबा, त्याला त्याचं नवीन घर सापडत नाहीये, मी त्याच्याबरोबर जाऊन त्याला सोडून येते". तिच्या आईने काही बोलायच्या आत, ती जोरात धावत सुटली.

"मोत्या मोत्या, अरे थांब, किती जोरात पळतोस? मी पडेन ना! आपण शोधूया तुझं नवं घर, पण जाता जाता माझ्याशी खेळशील ना? तिथे गेल्यावर मला विसरू नकोस हा, मला भेटायला येत जा!!"

धप्प!!
इतका वेळ स्तिमित होऊन तिला पाहणारे सगळे, काहीतरी आवाज आला म्हणून एकदम संमोहन सुटावं तसे भानावर आले.  त्यांची मुलगी कुठेच दिसत नव्हती. अचानक तिच्या आजीच्या लक्षात आलं, मोत्याला पुरलेल्या प्राण्यांच्या दफनभूमीच्या पाठीमागे एक दलदल आहे आणि तिची नात काल्पनिक मोत्याच्या मागे धावत धावत त्याच दिशेने गेली आहे. आजी सर्व शक्ती एकवटून ओरडली, वाचवा रे तिला, ती तिकडे गेलीय.

पण.... ती परत कुणालाच दिसणार नव्हती, कारण जेव्हा तिचे घरचे तिथे पोचले तेव्हा एक हात दलदलीत रुतत रुतत नाहीसा होत होता!!!!...

पुन्हा कधीच न दिसण्यासाठी!!

.
आयुष्यभर झोंबत राहील असा चटका सगळ्यांना देऊन..





             

6 comments:

Eat & Burpp १९ जानेवारी, २०११ रोजी ५:४१ PM  

अग काय हे?? कशाला लिहिल?? बापरे...नको वाटला तो शेवट!! नको लिहूस ग अस :(

पण हे सगळ झाल ते तुझया लिखाणामुळे!!

थॅंक्स म्हणाव की शिव्या घालाव्यात तेच समजत नाहीए!!

Aarti २० जानेवारी, २०११ रोजी ३:२० PM  

काय हे......... कसे सुचले तुला, अशी खरी घटना आहे का? मनाने लिहिले आहेस?
शेवट खूप भयानक होता.
आत्ता पर्यंत एकदम हलके पुलके लेख होते तुझे आणि एकदमच हे काय?

Ketaki Abhyankar २० जानेवारी, २०११ रोजी ४:१४ PM  

अगं पूर्णपणे काल्पनिक आहे. मला सुचलेली पहिलीच गोष्ट स्वरूपातली पोस्ट. मी पाहिलेले काही पिक्चर, वाचलेली काही पुस्तके अशा सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे ही कथुकली. खरं आहे, नेहमी हलकं फुलकं लिहिते मी, पण या वेळी खरंच हे असंच सुचलं आपोआप,आणि इथे उतरलं.

भानस २५ जानेवारी, २०११ रोजी १०:१६ AM  

:( चटका लावून गेली कथा.

अभय परांजपे २८ जानेवारी, २०११ रोजी ११:३७ AM  

कथा चांगली आहे. पण फार थोडक्यात झाली.. फुलवायला हवी होती.. तशी झाली असती तर जरा जास्त चटका लागला असता.. पण छान आहे..
अभय परांजपे

Chitti sir १४ जून, २०१८ रोजी ९:०५ PM  

सुंदर कथा आहे. खुप छान

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP