मुक्कामपोस्ट 'कंटाळा बंगला' ता.वैतागवाडी....

>> बुधवार, २५ फेब्रुवारी, २००९

काय दिवस आहे हो आजचा..सगळ्या गोष्टींचा अगदी वीट आलाय मला. सकाळपासून जे-जे काम करायच ठरवते आहे त्याला सगळीकड़े नुसता 'नन्ना' चा पाढा.

सुरुवात ऑफिस ला येण्यापासूनच झाली. आमचा घोड़ा (माझी अत्यंत आवडती स्कूटी पेप, कध्धी कध्धी त्रास देत नाही हो) काही केल्या हालायलाच तयार नाही (आजच मेली काय उसण भरली तिला, TVS च जाणे). किक मारून पाहिली पण छे...शेवटी काहीतरी करून कशीबशी एकदाची झाली चालू तर तोपर्यंत १० वाजून गेलेले. (लगेच आमच्या डोळ्यासमोर मॅनेजरचा चिडलेल्या बुलडॉग सारखा चेहरा अवतीर्ण झाला.)

तो सीन डोळ्यासमोर ठेउन, जितक्या स्पीड मधे गाडीला पळवणे शक्य होते तितक्या जोरात हाकत आणि सगळ्या सिग्नल्स ना नेहमीपेक्षा जास्त वेळ लागल्यामुळे जिथे तिथे थांबत, अशी तब्बल दिड तासाने पोचले एकदाची कंपनीत. सगळीकड़े नेहमी सारखी शांतता होती. म्हणल, 'चला इथे तरी सगळं व्यवस्थित दिसतय'. माझ्या जागेवर पोचले तर माझी नेहमीची खुर्ची कोणीतरी ढापलेली. मला दुसरी चालतच नाही. माझी खुर्ची नसेल तर माझी चिडचिड अजुनच वाढते. मग काय , तसच झाल. काम करायच सोडून आधी तो 'प्रोजेक्ट' संपवला आणि सापडली एकदाची माझी खुर्ची. म्हणतात ना.."दिवस असे की कोणी माझा नाही, अन मी कोणाचा नाही". जो तो मला त्रास द्यायला टपलेला.

मशीन चालू केलं. नेहमीच्या सवयीने मेलबॉक्स उघडला. बघते तर मेनेजर च्या 'ह्याssss' इतक्या मेल्स पडलेल्या. म्हणल, बघू निवांत. आत्ता तर एंट्री मारलीय.(आधी जीमेल पाहुया.) तासाभराने पाहिल, तर सगळ्या असाइनमेंट्स च्या डेडलाइन्स आजच..अरे देवा..काय वैताग आहे. पण काय करणार..दिवसभर खपून बरीचशी कामे मार्गी लावण्याशिवाय उरलय काय दुसरं हातात?

त्यात गाडीला किक मारून बरयापैकी कॅलरीज जळल्यामुळे दमलेही होते आणि कंटाळाही आला होता. दिवसाच्या सुरुवातीलाच इतक्या पनवत्या लागल्यावर काम करावंस वाटेल तरी का? पण...(हा 'पण' मधे मधे येउन फारच घोळ करतो नाही?) उरलेला दिवस ती रटाळ आणि कंटाळवाणी कामे पूर्ण करण्यात संपला. शेवटी शेवटी तर 'संदीप खरे' च्या कवितेतल्या त्या चाकरमान्यासारखाच मलाही 'कंटाळ्याचा कंटाळा' यायला लागला.

त्या दिवशी रात्री ११.३० वाजता, अनेक लोकानी दमलेला, थकलेला आणि खांदे पाडून चाललेला एक दु:खी जीव नक्की रस्त्यावर पाहिला असेल. देवाने आकाशातून पाहिले असेल का हो? पाहिले असेल तर त्याला नक्कीच दया आली असेल आणि तो विचार करत असेल की "मी बनवलेला इतका क्षुद्र प्राणी देखिल किती कष्टात दिवस काढतो आहे. पुढचा मानव बनवताना हा 'program' modify करायला हवा"..

Read more...

सारेगमप लिटिल चॅम्प्स चा अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल.

>> सोमवार, ९ फेब्रुवारी, २००९

८ फेब्रुवारी २००९ ...
सकाळपासून महाराष्ट्रातील प्रत्येक संगीत रसिकाला संध्याकाळच्या "सारेगमप महाअंतिम फेरी " चे वेध लागले होते. प्रत्येक जण दुसऱ्याला बजावून सांगत होता, की बाबारे संध्याकाळी काहीही बेत ठरवू नकोस. महाअंतिम फेरी चुकवायची नाहीये मला. सगळेजण आपापली कामे संपवून ७.३० च्या आत घरी परत आणि बरोब्बर ७.३० वाजता टीव्ही चालू झाले सगळ्यांचे....
सुरुवात छान झाली. सगळ्या स्पर्धकानी मिळून एक समूहगीत सदर केले. त्यानंतर "फॅन्सी ड्रेस राउंड" सारखी एक फेरी झाली.म्हणजे, तुम्हाला आठवत असेल तर दिवाळी च्या वेळी जुन्या काळातील काही गाणी या मुलानी सादर केली होती, मूळ गाण्यातल्यासारखे कपडे घालून. तीच सगळी गाणी या फेरीत झाली. आर्या ने "आता कशाला उद्याची बात", रोहितने "वासुदेवाची स्वारी", प्रथमेशने "सुंदरा मनामधे भरली", मुग्धाने "छड़ी लगे छम छम" आणि कार्तिकीने "मन सुद्ध तुज" ही गाणी गायली. त्यातल आर्या आणि प्रथमेश ची गाणी मस्त झाली.

आपले ज्यूरी म्हणजे सुरेश वाडकर, देवकी पंडित, संजीव अभ्यंकर, आशा खाडिलकर आणि श्रीधर फडके ही मंडळी मनापासून स्पर्धकांची गाणी ऐकत होती. दाद ही देत होती. बरेच दिग्गज कलाकार, गायक, संगीतकार या छोट्या गंधर्वांना आशीर्वाद देण्यासाठी खास उपस्थित होते.

त्यानंतर आपल्या महागयिकेने आणि आत्ताच्या विश्वगयिकेने, अहो म्हणजे वैशाली भैसने-माडे हिने "घन रानी" आणि "सात समंदर" ही गाणी पेश केली. नेहमीप्रमाणेच उत्तम.

मग आपल्या स्पर्धकांच्या हिंदी गाण्यांचा राउंड झाला. पण सगळी गाणी आधी गायलेलीच गायले हो सगळे. त्यातल ही प्रथमेश च "सूरत पिया की" अप्रतिमच. शब्दच नाहीत माझ्याकडे. आर्याने "वंदे मातरम" छान गायल. मुग्धाने "ये इश्क हाय" छान गायल. पण तिच वय लहान असल्याच मात्र जाणवल या गाण्यात. अहो जीव केवढासा तिचा. पण पोरीने आत्तापर्यंत जोरदार लढत दिली सगळ्या मोठ्या मुलाना.
ही फेरी झाल्यावर असे जाहिर करण्यात आले की आता sms करायची वेळ संपली आहे आणि सगळे ज्यूरी आत जाउन निर्णय घेणार आहेत.
शेवटचा राउंड ही नव्या गाण्यांचा नव्हताच. पूर्वी गायलेलीच पण जरा "ढ़िन चॅंग" गाणी होती. ही सगळीच गाणी मस्त झाली. आर्याने "छम छम", मुग्धाने "डोक फिरलया", कार्तिकिने "नवरी नटली" आणि "मोदक" प्रथमेशने त्याच्या नेहमीच्या स्टाइल पेक्षा चांगलच वेगळ "डिपाडी डिपांग" उत्तम रितीने सादर केल. रोहित ने तर "मोरया मोरया" हे गाण खरच "चाबुक" गायल हो. बरेच चढ़ उतार असुनही ओरिजनल वाटाव अस झाल अगदी. तसाही परफॉर्मेंस देण्यात रोहित भन्नाट च आहे...

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत जितक्या महाअंतिम फेरया झाल्या त्यामधे सारखे सारखे sms किती आले ते वाचून लोकांची उत्सुकता ताणणारया पल्लवीबाईनी एकदाही सांगितले नाही की कुणाला किती sms आले आणि कोण किती पुढे आहे. मुले येतायत, गातायत आणि जातायत. जरा विचित्र वाटल होत बघताना.

शेवटची फेरी झाली आणि झाsल.... संपली स्पर्धा...बघणार्यांच्या पोटात हाs भला मोठा गोळा. निकाल सांगण्यासाठी खळेकाकाना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले. त्यानी प्रस्तावानेखातर छोटस भाषण केल, की तुम्ही सगळ्या मुलानी शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास करा वगैरे... आणि एवढे बोलून लोकांच्या पोटातला गोळा फोडला. महागायिका कोण तर म्हणे "कार्तिकी गायकवाड"
अर्ररर. माझा अशक्य भ्रमनिरास झाला हो. मी प्रथमेश ,आर्या किंवा रोहित यांच्या पैकी कुणाच्या तरी नावाची अपेक्षा केली होती. या सगळ्या ज्यूरीना हिच्या गाण्यात कुठे शास्त्रीय संगीत दिसल देव जाणे. नुसते अभंग तर गायली. कधीतरी आपल एखाद भावगीत, भक्तिगीत, लोकगीत. तिच्या त्या "नवरी नटली" ने तर माझ फारच डोक उठल होत राव. बर त्यात तिचे उच्चार स्पष्ट, शुद्ध नाहीत. बाकीचे चौघे कितीतरी पटीने कार्तिकी पेक्षा चांगले आहेत. पण.......... असो। त्यातल्या त्यात एक चांगल झाले की संगीत शिक्षणासाठी सगळ्याना सारखच बक्षिस मिळालय.
सारेगमपच्या पहिल्या सेशन च्या वेळी असच झाल होत. आठवतय का? ३ जण अंतिम फेरीत गेले होते. अभिजित कोसंबी, मंगेश बोरगावकर आणि अनघा ढोमसे. तेव्हाही sms चा काहीतरी घोळ झाला होता. अंतिम फेरी आधी कधीही sms मधे पहिला नसलेला कोसंबी अंतिम फेरीत एकदम महागायक च बनला(आणि हिंदी सारेगमप च्या पहिल्या १-२ राउंड्स मधेच उडाला पण). तेव्हा देखिल मंगेश आणि अनघा कित्येक पटीने उत्कृष्ट गायक होते.
चालायचच. असे धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल काही नविन राहिले नाहीत. आता सवय करून घ्यायला हवी आणि पुढच सारेगमप बघायला तयार ही व्हायला हव. नाही का?

(वि.सु : वरील लेख वाचून कुणाला वाईट वाटल असेल किंवा कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व: )

Read more...

तरुणाइला - भुलवणारा कवी.आणि डोलवणारा संगीतकार

>> मंगळवार, ३ फेब्रुवारी, २००९

ही तरुणाई ...
आभाळाची निळाइ ॥ सागराची गहराई।
हरेक क्षणाच्या डोळ्यातली रोषणाइ...

आजच्या तरुण पिढीच प्रतिनिधित्व करणार्‍या या कवितेचे शिल्पकार आहेत "तरुण" कवी "संदीप खरे".
तुम्हा आम्हा सामान्यांना सुचेल का हो, "तरुणाई" ला आभाळाइतक अथांग, समुद्राइतक खोल असे काही म्हणायला? नाही. आपली धाव कुम्पणापर्यंतच।

"जे न देखे रवि ते देखे कवी" असे म्हणतात. खरच तर आहे. उत्कृष्ट कविता जन्माला येण्यासाठी, जे पाहिल नाही ते शब्दात साकारण्याच सामर्थ्य हव. आणि जे पाहिल, त्याला हवा तसा आकार देऊन कवितेच्या साच्यात बसवता यायला हव.

संदीप खरे ला (मी एकवचन वापरते आहे कारण हा कवी अगदी आपल्यातलाच आणि आपल्यासारखाच तरुणाइने बहरलेला आहे) या दोन्ही गोष्टी सहजगत्या आणि उत्तम अवगत आहेत.
इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेला संदीप मनापासून कवितेला मानतो। हा कधी असतो एक रोमॅंटिक प्रेमवीर तर कधी असतो एक विरह्ग्रस्त असफल प्रेमिक. मधेच तो छोट्यांबरोबर छोटा होतो तर थोरांबरोबर थोर। तो शब्दातूनच एखाद्या घटनेचे वर्णन असे काही उभं करतो की बस...आपल्याला वाटत की मी प्रत्यक्ष बघतोय की काय...त्याच उत्तम उदाहरण म्हणजे "कसे सरतील सये" ही कविता. नुसती ऐकली तरी असे वाटत की आपल्या प्रियकराच्या काही काळाच्या त्या विरहाने ती मुलगी आपल्या गुलाबासारख्या २ नेत्रातुन टप टप आंसू वाहते आहे। वाह वाह, काय कल्पना आहे. हे असे विचार कवीच करू जाणे.

लहान मुलांचा "अग्गोबाई ढग्गोबाई" हा अल्बम तर खुपच छान जुळून आलाय. सगळी गाणी एका पेक्षा एक.
"दूरदेशी गेला बाबा " तर खुप "touching" आहे तर "सुपरमॅन" मधे चक्क सुपरमॅन आणि हनुमान यांची ओळख आहे , माहितीय?

"कधी हे कधी ते", "मी गातो एक गाणे", "दिवस असे की", "आयुष्यावर बोलू काही", "नामंजूर", "सांग सख्या रे", "अग्गोबाई ढग्गोबाई" इतके सगळे अल्बम्स आत्तापर्यंत प्रदर्शीत झालेले आहेत। तसेच "मौनाची भाषांतरे" आणि "नेणिवेची अक्षरे" हे कविता संग्रह ही त्याच्या खात्यावर जमा आहेत.

त्याच्या सर्व गाण्याना सुमधुर संगीत देणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. सलिल कुलकर्णी। अतिशय गोड पण तितकाच खणखणित आवाज ही दैवी देणगी असलेला हा गृहस्थ M.B.B.S. आहे। पण संगीत हेच कार्यक्षेत्र मानलेला सलिल "आयुष्यावर बोलू काही" या कार्यक्रमात संदीप ची पुरेपूर साथ देतो।

सलिल ची मला आवडलेली काही गाणी म्हणजे "पाउस असा रुणझुणता", "हे भलते अवघड असते" आणि "संधिप्रकाशात"। अप्रतिम गाणी....

खरया अर्थाने आजच्या तरुण पिढीला आपल्या शब्दानी भुलविणारया आणि संगीताने डोलविणारया या जोड़गोळीला भविष्यात देखिल असच भरभरून यश मिळो हीच देवाकडे प्रार्थना।

Read more...

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP