हसरा निसर्ग, देव देव आणि लवासा.

>> शुक्रवार, २८ जानेवारी, २०११


शीर्षक वाचून तुमच्या मनात गोंधळ उडालेला दिसतोय मला. :)
त्याचं काय झालं, मागच्या शनिवार-रविवारी माझे सासू-सासरे आमच्याकडे आले होते. आम्ही दोघेही सुट्टी असल्यामुळे घरी होतो.  २ दिवस काय काय करायचं याचे मनसुबे १ आठवडा आधीपासूनच मनात घोळत होते. शेवटी त्या दोघांना विचारून एक छोटीशी ट्रीप काढायचं नक्की झालं. पुण्यापासून ४० एक किलोमीटर अंतरावर "हाडशी"  नावाचं एक ठिकाण आहे. आम्ही आधी तिथे जाऊन आलेलो असल्यामुळे ते छान आहे हे तर माहित होतंच. तसंच तिथून लोणावळ्याकडे जायच्या रस्त्यावर "दुधिवरे" म्हणून एक छोटंसं गाव आहे, ते आणि सध्या पर्यावरणवाद्यांनी भयंकर गाजवलेलं "लवासा" अशी ठिकाणं नक्की झाली.

जे कोणी बाहेरून पुण्यात येतात, त्यांच्यात जर कोणी बायका असतील तर त्यांना आल्या आल्या तुळशीबागेत जायचे वेध लागतात. त्यात सध्या संक्रांतीच्या हळदीकुंकवाची धूम चालू असल्यामुळे लुटायच्या विविध वस्तूंनी तुळशीबाग अगदी बहरलेली आहे. त्यामुळे शनिवार हा तिथेच भटकण्यात गेला होता. साहजिकच रविवारी ही ट्रीप करायचं ठरलं.

रविवारी सकाळी ८ ला सुमारास आम्ही बाहेर पडलो. सासू-सासरे गाडी घेऊनच आलेले होते, त्यामुळे कसं जायचं हा प्रश्न नव्हताच. आधी हाडशीला जायचं म्हणून आम्ही पिरंगुट मार्गे मुळशीच्या रस्त्याला लागलो. पौड गावाच्या बसथांब्यावरून उजवीकडे वळलं की हाडशीला  जायचा रस्ता लागतो. थोडसं पुढे गेल्यावर डाव्या हाताला "महिंद्र क्लब रिसोर्ट" चा एक त्रिकोणी आकाराचा डोंगर दिसला. एकंदर दृश्य पाहून तिथे एकदा जायला हवं अशी मनाने नोंद करून ठेवली. तसंच त्याच रस्त्यावर "गिरीवन" म्हणून एक हॉलिडे रेसोर्ट आहे डोंगराच्या कुशीत. तेही खूप सुंदर आहे असं ऐकलं होतं. तिथेही जायचंय एकदा. पुढची ट्रीप मनात पक्की करतच आम्ही हाडशीला पोचलो. मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता थोडा खराब झाला होता, पण गाडी असल्यामुळे विशेष जाणवलं नाही.

मंदिराकडे जायचा रस्ता
मुख्य कमानीतून आत शिरल्यावर एकदम सगळा नूरच पालटून गेला. सुरेख वळणावळणाचा चढाचा रस्ता, दोन्ही बाजूला नारळ, आंबा अशी हिरवीगार गर्द झाडे, आणि एका बाजूला छान असं छोटंसं तळं. वा, दिल खुश हो गया. "आंब्याच्या बागेत जाऊ नये, व झाडांना हात लावू नये, अन्यथा ५०० रुपये दंड आकारण्यात येईल" अश्या आंब्याच्या झाडावर लावलेल्या खास पुणेरी शैलीतल्या पाट्या पाहून मनोरंजन पण झाले. ती छोटीशी घाटी चढून वर पोचलो. उत्तम पार्किंगची सोय होती. अपंग व वयोवृद्ध लोकांसाठी व्हीलचेअर आणि मंदिरात जाण्यासाठी  छोटीशी लिफ्ट याचीही सोय होती.

अरे हो, महत्वाचं सांगायचंच राहिलं, की हाडशीला नक्की आहे तरी काय. तर, तिथे एक विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, ज्याची प्रतिष्ठापना परमपूज्य सत्यसाईबाबा यांनी केली आहे. हे मंदिर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मेहुण्याने बांधले आहे, त्यांचं नाव श्री. जाधव. तसं २-३ वर्षांपूर्वीच मंदिर बांधून झालं होतं, पण सत्यसाई बाबांनीच मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करावी म्हणून २ वर्ष वाट पाहून मागच्या वर्षी कार्तिकी एकादशीला मंदिर खरया अर्थाने भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.
विठ्ठल रखुमाई मंदिर, हाडशी
सुंदर हसरा निसर्ग, चहूकडे हिरवीगार लॉन्स, २ पवनचक्क्या, कारंजी, त्यात व आजूबाजूच्या फुलांच्या ताटव्यात सोडलेले दिवे हे सगळं पाहून आपल्या येण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आधी गणपती मंदिर आहे, तिथे श्री गणेशाचं दर्शन घेऊन आम्ही विठ्ठल मंदिरात गेलो. मंदिरात अतिशय शांतता आणि स्वच्छता आहे. सर्वत्र श्री. सत्यसाईबाबांची वचने, भजने आणि संदेश लिहिलेले फलक आहेत. काही फोटो आहेत उदघाटनाच्या कार्यक्रमाचे. सुंदर आखीव रेखीव अश्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. आपले हात आपसूकच जोडले जातात या सगळ्या वातावरणाने भारुन. प्रसन्न वाटलं तिथे. तसंच मंदिराच्या खाली एक ध्यान मंदिर आहे, तिथे भजन, प्रवचन इ. चालू असतं. मंदिराच्या मागे थोडंसं चालत गेलं की एक महालासारखी वास्तू दिसते. ते सत्यसाईबाबांचे निवासस्थान आहे. आजूबाजूला खोल  दरी आणि चित्र काढावं असं वाटेल इतकं छान दृश्य दिसतं.
लॉन आणि विश्रांतीस्थळ
सत्यसाईबाबा निवासस्थान
हे सगळं पाहिल्यावर मंत्रमुग्ध होऊन आणि देवाला नमस्कार करून सगळे खाली आलो. खाली एक कॅन्टीन आहे, जिथे पोहे, भेळ, भजी, चहा, कॉफी असे पदार्थ मिळतात. तिथे बसून पोहे, भेळ,कांदाभजी यावर ताव मारून गाडीत बसलो.

प्रतीपंढरपूर, दुधिवरे
आता जायचं होतं दुधिवरेला. वाटेत "तिकोणा" हा शिवाजी महाराजांचा किल्ला लागतो. अगदी किल्ल्याशेजारूनच रस्ता जातो. तिथेही एकदा जायला हवं. (असं करत करत या एकाच रस्त्यावरच्या ३ ठिकाणांची नोंद करून ठेवलेली आहे मी) दुधिवरेलाही विठ्ठल रखुमाई मंदिरच आहे. ते बाबामहाराज सातारकर यांनी स्थापन केलं आहे, पंढरपूर सारखंच मंदिर बांधलं आहे आणि मूर्तीही पंढरपूर सारख्याच आहेत. अगदी "प्रतीपंढरपूरच". छान, रेखीव अश्या काळ्या पत्थरामध्ये घडवलेल्या मूर्ती पाहिल्यावर अगदी भरून आलं. सगळे सात्विक भाव मनभर झाले, प्रसन्न वाटलं. तिथेही खाली मंत्र मंदिर आहे. समोर, श्री बाबामहाराज सातारकर यांचा संगमरवरी पुतळा आहे. आणि त्यासमोर मस्त विस्तीर्ण अशी बाग आहे.
इथे जवळपास खायला प्यायला काही मिळत नाही. :( त्यामुळे दर्शन झाल्यावर टंगळमंगळ न करता पुढच्या प्रवासाला निघालो.)

गेल्या काही दिवसांपासून "लवासा" वरच्या चर्चेला अगदी उत आला आहे ना? नेमका हाच विचार केला आम्ही पण. म्हणलं बघूया तरी नक्की हे प्रकरण आहे तरी काय ते. इतका वाद, चर्चा, कोर्टाच्या स्थगिती मुळे गाजणारं लवासा  पहायची एक उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे आमची गाडी लवासा कडे वळली. पिरंगुट मधून लवासा कडे एक रस्ता जातो. पिरंगुट चा रस्ता बघितला तर फारसा चांगला नाही, पण लवासा कडे एकदा वळलं की चकाचक रस्ते. (बारामतीकरांची कृपा, दुसरं काय?)तसं अंतर ३२ कि.मी. आहे पिरंगुट पासून. १५ एक कि.मी. झाले की टेमघर धरण लागतं मुठा नदीवर. धरणाची भिंत एका हाताला ठेवून एक घाट आहे. त्या घाटातली वळणं म्हणजे काय सांगू महाराजा... इतकी तीव्र वळणं आहेत ना, की कधी कधी घाबरायला होतं. पण आजूबाजूचा निसर्ग, मस्त उंच डोंगर आणि मध्ये धरणाचं पाणी, हे सगळं पाहून भीती नाहीशी होते आणि तिची जागा लवासाबद्दलच्या उत्सुकतेने घेतली जाते.
टेमघर जलाशय
धरण मागे पडलं आणि कणीस, पेरू विकायला बसलेली माणसं दिसली. अशा ठिकाणी थांबून काहीतरी घेतलं जातंच. २ स्वीट कॉर्न आणि ३-४ पेरू घेऊन परत गाडीत बसलो. लवासाची प्रवेशद्वाराची कमान आता दिसायला लागली होती. एकदम लक्षात आलं की हीच कमान फ्रेम मध्ये ठेवून आय बी एन लोकमत चा तो (आगाऊ) निखील वागळे लोकांच्या कागाळ्या करत असतो. (त्याने फार वात आणलाय!! टिव्ही पाहत असताना तो Channel मधे आला, की मी पटकन पुढचा लावते) कमानीतून आत गेल्यावर एकदम सगळा चकचकीतपणा जाणवला. दर १०० मीटर वर दिव्याचे खांब, खालची दरी पाहायला सज्जे, एक बाजूला डोंगरावर मोठ्ठी फुलपाखरं, गोगलगाय, लेडी बर्ड यांचे छोटेखानी मॉडेल्स, आणि त्यात सोडलेले दिवे. एकदम छान वाटत होत. मध्ये मध्ये छोट्या छोट्या बागा, त्यामध्ये व्यवस्थित कचरापेट्या ठेवलेल्या (आपल्या लोकाना कागद, प्लास्टिकच्या पिशव्या कुठेही रस्त्यात टाकायची सवय आहे, हे गृहीत धरून केलेली सोय). चढण उतरायला लागलो, तशी छपरं दिसायला लागली. एक वळण घेतलं आणि सगळे टुमदार बंगले एकदम दृष्टीपथात आले. हेच ते गाजलेले काही करोडचे बंगले.

एक छानसं हॉटेल एका टेकडीवर दिसलं. नाव होतं एकांत. ज्याला कुणाला निसर्गाच्या सान्निध्यात एकटं राहून आत्मपरीक्षण करायचं असेल, त्यांच्यासाठी उत्तम जागा. (मला अजून तरी ती गरज नाहीये वाटलेली, म्हणून-) आम्ही खालच्या बाजूला दिसणाऱ्या पुलाकडे जायला निघालो. वाटेल एक टपरी सारखं काहीतरी दिसलं आणि भूक लागल्याची घंटा वाजली डोक्यात. पण जरा फिरून मग खायचं असा सर्वानुमते निर्णय झाला.
समोर एकदम छान दृश्य दिसत होतं. पाणी, त्यावरचा टुमदार पूल आणि पुलाच्या दोन बाजूला पंपिंग स्टेशन्स.
लवासाला वेढणारे ७ डोंगर
पुलावरून समोर सात डोंगर आणि एका बाजूला धरणाचे पाणी यामध्ये वसलेलं लवासा, दिसायला तरी छान दिसत होतं. तिथे अजून थोडेफार बांधकाम चालू आहे. सगळं काम पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे अजून फिनिश्ड वाटत नाही ते. थोडेफार फोटो काढले, एक चक्कर मारली, आणि खायला थांबलो. तिथे साधे साधे पदार्थ पण खूप महाग..  काय करणार, २-३ करोड च्या बंगल्यांच्या शहरात आलो होतो ना आम्ही, मग मोजले रुपडे. :(

परतीच्या प्रवासाला लागलो. येतानाचा उत्साह जाताना कमी झालेला असतोच. त्यामुळे सगळे शांत होते. मला मात्र एक कळत नव्हतं, एवढं छान शहर वसतंय, तर त्याला पर्यावरणवाद्यांचा एवढा कट्टर विरोध का? वृक्षतोड, डोंगर फोडणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धरणाच्या पाण्याचा वापर, यावरून वादंग उठणं साहजिक आहे. पण हे सगळं त्यांनी आधीच, म्हणजे जेव्हा हे काम सुरु झालं तेव्हाच करायला हवं होतं. जवळपास ९०% काम पूर्ण झाल्यावर, आता या इमारती पाडा, या म्हणण्याला काय अर्थ आहे? जो काही पर्यावरणाचा ऱ्हास व्हायचा तो तर आधीच झालाय ना, मग आता इमारती पडल्याने तो थोडाच भरून निघणार आहे?
कदाचित हा लवासावाल्यांचा पब्लिसिटी स्टंटही असू शकतो. कारण मी कुठेतरी ऐकलं, की लवासाच्या मार्केटिंग साठी जेवढा खर्च येणार होता त्याच्या १०% बजेटमध्येच इतकी जाहिरात झाली आहे आता, की लवासा पहायला येणारयांचा ओघ उत्सुकतेपोटी का होइना पण वाढतोच आहे. त्यामुळे, या शक्यतेला थोडासा तरी वाव आहेच. दुसरं असं की या प्रकरणात सगळ्या बड्या धेंडांचे हात अडकलेले असल्यामुळे, आपलं नागडेपण झाकण्यासाठी तेही उत्सुक असणारच. त्यामुळे बघूया आता ही मारामारी कुठेपर्यंत चालते ते.

असो, आमची ट्रीप तरी छान झाली. काय म्हणतात ते, ट्रीप अगदी "साठा उत्तरी सुफळ संपूर्ण" झाली... निसर्ग अगदी डोळे भरून पाहिला, देव देव केले, पुण्य गाठीला बांधले, आणि राजकारणामुळे प्रकाशझोतात आलेले लवासाही पाहिले. अजून काय हवं एका फटक्यात. नाही का? (तुम्हीही अशी एखादी ट्रिप करावी अणि मस्त भटकावं या उद्देशाने हो पोस्ट टाकलीय बरं का, तेव्हा जाउन आलात की सांगा मला)      Read more...

चटका..

>> बुधवार, १९ जानेवारी, २०११

एक १० -१२ वर्षांची चिमुरडी. प्राण्यापक्षांची तिला खूप आवड. घरात एक गोजिरवाणे कुत्रे, एक छोटसं मांजराचं पिल्लू आणि सतत वटवट करणारा एक बोलका राघू. या सगळ्यांनी तिचं आयुष्य अगदी व्यापून टाकलेलं. हे मुके जीव तिच्या लहानश्या विश्वाचा अविभाज्य भाग होते. अशातच तिचा तो प्राणप्रिय मोत्या कुत्रा आजारी पडला. काही खाईना-पिईना, सतत मलूल असा पडून राहायचा. ती शाळेला जाताना तिच्या अंगावर उड्या मारून, "मला पण घेऊन चल" असे मुक्याने विनवणारा मोत्या तिला जाताना पाहून फक्त मान वर करून परत मरगळून झोपू लागला. हे सगळं जाणवून की काय, मोत्याला भयानक टरकून असणारं ते मनीमाऊचं पिल्लू देखील मोत्याच्या आसपास वावरून आपलं त्याच्यावर असणारं प्रेम व्यक्त करू लागलं. राघू ची सतत चालू असणारी वटवट फक्त " टीर्र! मोत्या उठ! टीर्र" एवढीच मर्यादित झाली. पण कसल्याश्या आजाराने थकलेला मोत्या या सगळ्या गोतावळ्याला सोडून गेलाच. त्याला जवळच असणाऱ्या प्राण्याच्या दफनभूमीत पुरण्यात आलं.

त्या एका दिवसाने त्या मुलीचं अवघं आयुष्यच बदलून गेलं. तिला जिथे तिथे मोत्याच दिसू लागला. वेड्यासारखंच काहीतरी करायला लागली ती. मोत्या मेला, हेच पटायला तयार नाही तिला. तिला वाटलं तो तिला सोडून गेला दूर कुठेतरी. आपली मनी आणि राघू पण आता आपल्याला सोडून जाणार या धास्तीने त्यांना सतत जवळ घेऊन बसू लागली. जेवताना, झोपताना सगळीकडे मनी आणि राघू. शाळेत जायला तयार होईना, का तर ती शाळेत गेल्यावर मनी आणि राघू तिला सोडून गेले तर?

घरचे लोक  थोडेसे धास्तावलेच. त्यांना आधी वाटलं होतं की काही दिवस ही असे करेल, पण एकदा शाळा, अभ्यास सुरु झाला, की विसरेल सगळं. पण कसलं काय, मोत्या जाऊन ३ महिने लोटले तरी तिचं हे सगळं चालूच होतं. तिच्या बाबांनी तिला नवा मोत्या आणूया असं सांगून समजावयाचा प्रयत्न केला, पण तिला काही केल्या तोच मोत्या हवा होता. आता मोठं कुत्रं तर आणू शकत नव्हते ते. ते बरं अचानक या सगळ्यांना आपलंसं करेल. त्याला सगळ्यांची सवय तर लागायला हवी. या विचाराने तिच्या बाबांनी अगदी तसंच दिसणारं त्याच जातीचं एक पिल्लू आणलं. तिने ते स्वीकारलं पण "तो मोत्याच", हे काही तिला पटलं नव्हतं. ती त्याच्यावर मोत्याइतकं प्रेम करायची नाही, त्याला दूर दूर करायची. त्याला दिलेली ताजी पोळी आणि दूध मनीला द्यायची. फक्त मनी आणि राघुशी प्रेमाने वागायची. कितीही नाही म्हणलं तरी प्राण्यांनाही कळतंच, कोण त्यांच्यावर प्रेम करतं आणि कोण नाही ते. त्या बिचाऱ्या पिल्लालाही जाणवलं की ही त्याचा राग राग करतेय, तिला आपण आवडत नाही. ते पण तिच्यापासून दूर पळू लागलं, ती येताना जरी दिसली तरी कर्कश्श ओरडू लागलं. तिला जवळपास देखील फिरकू देईना.

तशातच त्या मुलीला स्वप्नात देखील मोत्याच दिसू लागला. झोपेतून ओरडत उठायची, "मोत्या मला बोलावतोय, त्याला कुणीतरी खूप मारलंय,मी जाते त्याच्याकडे" असं म्हणून घरातून दाराच्या दिशेने चालू लागायची. घरच्यांना आता थोडी थोडी भीती वाटायला लागली. हिच्या मनावर काही परिणाम तर नाही ना झाला, या विचाराने त्यांचं डोकं गरगरायला लागलं. लवकरात लवकर एका चांगल्या मानसोपचार तज्ञांकडे जायचं असा विचार पक्का झाला.

एक दिवस सकाळी ती मुलगी उठली. कधी नव्हे ते छान आवरून, एकदम शांतपणे, शहाण्या मुलीसारखी जिना उतरून खाली आली, आणि वडिलांना म्हणाली, "बाबा, आपला मोत्या परत आलाय, बाहेर दारात आपल्या सगळ्यांची वाट पाहतोय, पण त्याला ना आपण आवडलो नाही, त्याने दुसऱ्या मालकांकडे रहायचं ठरवलयं. तर मी त्याला सोडून येते त्यांच्या कडे." घरचे संभ्रमात. बोलतेय तर शहाण्यासारखी, पण मोत्या बाहेर आलाय, म्हणजे काय? सगळे तिच्या मागून बाहेर गेले. अर्थातच बाहेर कुणी नव्हतं. अचानक  एका दिशेला बोट करून ती बोलायला लागली "तो पहा मोत्या, किती छान गब्बू झालाय ना आता. मीच त्याला कदाचित नीट खाऊ देत नसेन, म्हणून तो मला सोडून गेला. नव्या मालकांकडे त्याची तब्येत छान सुधारलीय, ते त्याच्यावर खूप प्रेम करतात."  तिच्या आईच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहायला लागले. आपली मुलगी अशी भान हरपून काल्पनिक जगात वावरतेय या जाणीवेने तिच्या आई-वडिलांच्या पोटात धस्स झालं.

ती बोलतच होती, "बाबा, त्याला त्याचं नवीन घर सापडत नाहीये, मी त्याच्याबरोबर जाऊन त्याला सोडून येते". तिच्या आईने काही बोलायच्या आत, ती जोरात धावत सुटली.

"मोत्या मोत्या, अरे थांब, किती जोरात पळतोस? मी पडेन ना! आपण शोधूया तुझं नवं घर, पण जाता जाता माझ्याशी खेळशील ना? तिथे गेल्यावर मला विसरू नकोस हा, मला भेटायला येत जा!!"

धप्प!!
इतका वेळ स्तिमित होऊन तिला पाहणारे सगळे, काहीतरी आवाज आला म्हणून एकदम संमोहन सुटावं तसे भानावर आले.  त्यांची मुलगी कुठेच दिसत नव्हती. अचानक तिच्या आजीच्या लक्षात आलं, मोत्याला पुरलेल्या प्राण्यांच्या दफनभूमीच्या पाठीमागे एक दलदल आहे आणि तिची नात काल्पनिक मोत्याच्या मागे धावत धावत त्याच दिशेने गेली आहे. आजी सर्व शक्ती एकवटून ओरडली, वाचवा रे तिला, ती तिकडे गेलीय.

पण.... ती परत कुणालाच दिसणार नव्हती, कारण जेव्हा तिचे घरचे तिथे पोचले तेव्हा एक हात दलदलीत रुतत रुतत नाहीसा होत होता!!!!...

पुन्हा कधीच न दिसण्यासाठी!!

.
आयुष्यभर झोंबत राहील असा चटका सगळ्यांना देऊन..

             

Read more...

ढील दे ढील दे दे रे भैय्या

>> शुक्रवार, १४ जानेवारी, २०११

उद्या संक्रांत- आणि शनिवार पण. अर्थात सुट्टीचा दिवस. म्हणजे कंपनीतले सगळे सहकारी आपापल्या घरी असणार. मग कशी काय एकत्र साजरी करायची ती... आजच केली तर?"

हे विचार आमच्या कंपनीच्या मानव संसाधन (HR) चमूचे. हे लोक नुसते विचार करत नाहीत. लगेच त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला चालू करतात. अर्थात सर्व राज्यातले लोक इथे एकत्र आले असल्याने "तिळगुळ वाटणे आणि गोड बोला म्हणणे" याही पलीकडे जाऊन काहीतरी वेगळी कल्पना येणार याची खात्री होतीच सगळ्यांना. अपेक्षेप्रमाणे आज सकाळी सकाळी एक मेल आली, की 'आज आपण "पतंग महोत्सव" साजरा करणार आहोत. पतंग बनवणे आणि उडवणे अशी एक छोटीशी स्पर्धा असेल. उत्सुक मंडळीनी आपापली नावे नोंदवावीत. दुपारी २-४ या वेळेत सगळ्यांनी जवळच्या पटांगणावर जमावे. तिथेच सर्वांना पतंग बनवण्याचे समान देण्यात येईल. ज्याचा पतंग आकर्षक आणि उंच उडणारा बनेल, त्याला कंपनीच्या कल्चरल क्लब कडून बक्षीस'

हुर्रे...सर्व पब्लिक खुश. बरेच दिवसात काही नवीन कल्पना आल्याच नव्हत्या त्यामुळे जरासे कंटाळलेले चेहेरे उत्साहाने नावे द्यायला सरसावले.
पाहता पाहता २ वाजले. आमचा ५ जणांचा कंपू तयारीने पटांगणावर पोचला. 
साहित्य मिळवण्यासाठी एकच झुंबड उडालेली होती. तिथून साहित्य मिळेपर्यंत २० मि. गेलेली होती. आम्ही सगळे घाईघाईने डोकी लढवायला लागलो. अरेच्च्या, पण येतोय कुणाला पतंग बनवता? मी गुगलिंग करून थोडीशी लेखी माहिती जमवली होती, पण एक जण पुढे सरसावला, मी करतो म्हणून. सर्वांना जरा हायसं वाटलं.
२ काठ्या मापात कापून वगैरे कामाला सुरुवात झाली. चिरमुरे कागद (शाळेत असताना कार्यानुभव हा विषय ज्यांना होता, त्यांना हा कागदाचा प्रकार माहित असेलच) दिलेला होताच. आम्ही थोडेसे जिलेटीन कागद, गोटीव कागद आणले होतेच.
त्यातल्या त्यात अनुभवी मंडळीनी पतंग बांधायला घेतला.आम्ही फारसे ज्ञान नसणारे लोक चुटपूट हातभार लावत होतोच. 
एकीने शेपटी बनवायला घेतली. एकाने त्या पतंगाला नाक, तोंड, डोळे असे अवयव बनवले. असे करत करत मांजा बांधायची वेळ झाली. तेही काम त्या अनुभवी कार्यकर्त्यानेच पार पाडले. वेळ संपल्याची घंटा पण वाजली होतीच. आमचा छान छान तयार झालेला पतंग घेऊन परीक्षकांना दाखवण्यासाठी आम्ही रांगेत उभे राहिलो आणि एका फेरीतून सुळकन पुढे गेलो पण.
 आता खरी परीक्षा होती.... तयार झालेला पतंग उडवून दाखवणे. आम्ही २-३ मुली होतो, त्यांना विशेष ज्ञान नव्हतं पतंग उडवण्याचं.त्यामुळे हे काम मुलांनी स्वत:वर घेतलं. मांजा वगैरे
 बांधून एकजण दूर जाऊन उभा राहिला पतंग हातात धरून, आणि दुसऱ्याने ढील दिल्यावर  झू ssss मकन उडाला आमचा पतंग. सगळ्यांनी एकाच जल्लोष केला. काय मस्त दृश्य होतं ..आहा..

पण हाय रे देवा.. काहीतरी गडबड झाली आणि हळू हळू खाली यायला लागला तो. पाहतो तर लक्षात आलं की त्याचे ते दिमाखदार पुछछ गायब होते. आम्ही त्याची शेपटी नीट चिकटवलीच नव्हती, ती पडली कुठेतरी. असो, जेव्हा उडायला पाहिजे तेव्हा तर उडाला होता तो. आता बघू निकाल कधी लागतो ते. आमच्यापेक्षा मस्त मस्त पतंग बनवलेत लोकांनी, पण अपेक्षा ठेवायला काय हरकत आहे, नाही का?

अरे हो, सर्वाना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!! तीळगुळ घ्या आणि (थोड़े दिवस तरी) गोड बोला :)
Read more...

बंद पडलीये आपली गाडी, चल रे मारू थोडा धक्का!

>> गुरुवार, ६ जानेवारी, २०११

"गाडी बंद पडणे" किती कॉमन गोष्ट आहे ना?  आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ही गोष्ट भरपूर वेळा घडलेली असते. पण ती "वेळ" खराब असते हे मात्र खरं. कारण आपली ही स्वामिभक्त आणि एकनिष्ठ गाडी नको त्या वेळी आणि नको त्या ठिकाणी बंद पडते, आणि आपला घात करते. (हे वाक्य सर्वसाधारण लोकांचा अनुभव गृहीत धरून लिहिलेले आहे.)

घरातून एकदम जोशात निघालेला एखादा माणूस "काय छान आहे माझी गाडी, अजिबात त्रास देत नाही कधी आणि बंद पण नाही पडली घेतल्यापासून" अशी आपल्या गाडीची मनोमन स्तुती करत असतो, आणि ते जणू ऐकत असल्यासारखं "तथास्तु भगवान" "तथास्तु" म्हणतात आणि गचके खात, आचके देत आपले ते प्रिय वाहन ऐन रहदारीच्या वेळी, भल्या मोठ्ठ्या रस्त्याच्या मधोमध भूश्श...करत बंद पडते. (अशा वेळी कदाचित तुम्हाला देव लोकांचा हेवा वाटू शकतो, त्यांची वाहने उदाहरणार्थ उंदीर, सिंह, रेडा इ.इ.निदान बंद तरी पडत नाहीत-- :) )

एखादा कॉलेज ला जायच्या घाईत असतो, कुणाला ऑफिसला उशीर होत असतो, कुणाचे कोणीतरी दवाखान्यात असू शकते ज्याला भेटायला तो जात असतानाच नेमकी गाडी बंद पडलेली असते. अश्या वेळी त्या "तथास्तु भगवान" ला 'विचार करून तथास्तु म्हणायला हवं' हे कळायला नको का?

गाडी बंद पडण्याची सगळ्यात वाईट जागा म्हणजे सिग्नल. आपण सिग्नलला थांबलेल्या गर्दीच्या तोंडाशी किंवा मधेच. आणि... अश्या वेळी गाडी बंद पडली तर अतिशय शरमिंदं व्हायला होतं आणि त्याच वेळी राग पण यायला लागतो. कारण सिग्नल हिरवा झालेला असतो, लोकांना पुढे जाण्याची घाई असते आणि आपण मधेच थांबून किक मारत असतो, त्यामुळे त्यांचा रस्ता अडलेला असतो. विचित्र परिस्थिती असते ती.

जर तुमच्याकडे चारचाकी असेल तर अजूनच चमत्कारिक प्रकार. तिला काय झालंय हे तिचं बॉनेट उघडल्याशिवाय कळत नाही. ना तिला पटकन बाजूला घेता येते, ना जोरजोरात किक मारून चालू करण्याचा प्रयत्न करता येतो. किल्ली फिरवून इग्निशन मध्ये कितीही वेळा आणली तरी गाडी जागच्या जागी ढिम्म उभीच. त्यासाठी आपल्याला आपल्या आसनावरून पायउतार व्हावं लागतं. एखादा जवळचा "Mechanic" आणायचा म्हणजे आधी तो शोधावा लागतो. मग तो येणार आपल्यावर उपकार केल्यासारखं, ५० भानगडी सांगणार, आपल्याला घाबरवणार आणि शेवटी भरभक्कम पैसे घेऊन काहीतरी खाटखुट करून गाडी चालू करणार. एक तर आपण मधेच थांबलोय ही एक अपराधीपणाची भावना असतेच मनात त्यात या सगळ्यामध्ये असंख्य शिव्याशाप घेतलेले असतात आपण. मागे उभ्या असलेल्या गाडीवाल्यांचे, दुचाकी वाल्यांचे(४ चाकी असली म्हणून काय झाल, मधेच काय थांबवलीय? माज फार या चारचाकीवाल्याना अशा अर्थी ), पादचार्यांचे आणि जिथे जायला आपल्याला उशीर झाला तिथे आपली वाट पाहणार्यांचे.        

अश्या वेळी कुणी आपल्या मदतीला येईल अशी विशेष अपेक्षा न ठेवलेलीच बरी. कारण जो तो आपापल्या तब्येतीप्रमाणे आणि स्वभावाप्रमाणे अस्तन्या सरसावून "याला किती शिव्या घालायच्या, मनात की उघड" या विचारात मग्न असतो. लोक तर खूप असतात आजुबाजुला, एखाद्याने धक्का मारला गाडीला, तर सगळ्यांचाच फायदा होणार असतो.म्हणावंसं वाटतं ---

"बंद पडलीय आपली गाडी, 
चल रे मारू थोडा धक्का,
मी ही जातो रे पुढे अन,
तुलाही देतो तोच मोका"

दोन गोष्टी एकदम साध्य---स्वार्थही (आपली गाडी तर चालू होणारच) अन परमार्थही (अहो, दुसर्यांच्या गाड्यांना रस्ता नाही का मोकळा होणार?)

तात्पर्य: गाडी बंद पडण्यासारख्या डोक्याला ताप गोष्टींमुळे  त्रास जरी होत असला, तरी पुण्यही मिळू शकते.   :P  :PRead more...

संकल्पाला मारो गोली...

>> बुधवार, ५ जानेवारी, २०११

चला, एक वर्ष कमी झालं आपल्या आयुष्यातलं. [मी दु:खी, निराश वगैरे आहे आणि म्हणून मी हे इतकं निराशावादी वाक्य लिहिलंय, असे अजिबात समजू नका वाचकहो :)  ही सत्य परिस्थिती आहे की नाही, सांगा बरं]

तर सर्वांना नवीन इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

२०१० कसं संपलं ते कळायच्या आत २०११ ने हळूच प्रवेश केला. म्हणजे माझ्यासाठी तरी हळूच. कारण मी विशेष वेगळ्या प्रकारे ते "सेलिब्रेट" केलं नाही. पार्टी, औटींग, केक कापणे, ड्रिंक्स घेणे असे काहीच प्रकार घरी कुणी केले नाहीत. घरीच अंडाकरी, पुलाव असा बेत केला. नेहमीसारखे ठरलेल्या वेळी जेवलो आणि नेहमी १२ ला झोपतो तसेच ३१ डिसेंबर लाही झोपलो. थोडेफार फटाके ऐकू आले बाहेरून एवढच! म्हणून म्हणलं, की माझ्यासाठी हळूच होता २०११ चा प्रवेश.

असो. हे सगळं सांगायचा उद्देश नाहीच्चे. नवीन वर्ष सुरु झालं की एक  प्रश्न वारंवार  विचारला जातो सगळीकडे, "काय मग, नवीन वर्षाचा संकल्प काय तुमचा?" So called "New year resolution" .

मला एक कळत नाही, आपण मराठी माणसं. आपण जानेवारी पासून का बरं सोडायचा संकल्प? आपल्याला चांगली २-२ वेळेला आहे ना संधी संकल्प सोडायला, गुढीपाडवा, आणि दिवाळी पाडवा. आपली नवीन वर्षं तेव्हा सुरु होतात ना? अर्थात आपण जरी सर्व गोष्टींसाठी इंग्लिश नवीन वर्ष गृहीत धरत असलो, तरी आपल्या मराठी प्रथेनुसार हेच दोन आपले नवीन वर्षाचे पहिले दिवस आहेत. सोडायचा असेल तर या दिवशी सोडावा एखादा संकल्प.

दुसरा मुद्दा हा, की संकल्प सोडायला एखादा ठराविक दिवसच का बरं असावा? आलं मनात, आणि सोडला संकल्प असं झालं समजा तर बिघडलं कुठे? तसाही १ जानेवारीला सोडलेला संकल्प, मंडळी २ जानेवारीला विसरलेली असतात, हे एक "general observation" आहे.

आपल्याकडे "Days" चं फार पेव फुटलंय गेल्या काही वर्षात-  
प्रेम व्यक्त करायला काय तर म्हणे, "Valentine's day",
मैत्री व्यक्त करायला " Friendship day",
"Mother's day ",
"Father's day"
एक नी दोन. इतके सगळे डेज साजरे करतो आपण, पण Valentine's day ला जुळलेले प्रेम हे अभेद्य असतंच असं कुठे लिहिलयं? Friendship day ला झालेली मैत्री कधीच तुटणार नाही याची खात्री ब्रम्हदेव तरी देईल का हो? Mother's day, Father's day साजरे करणारे पब्लिक "आई वडील आता कायमचे गाव सोडून आपल्याकडे राहायला येणार" असं कळल्यावर "माझी प्रायव्हसी जाणार आता" असा विचार करताना दिसतं. मग काय उपयोग या Days चा? भावना व्यक्त करायला अश्या Days चा दुबळा आधार का घेतला जावा?असो, विषय इतर Days चा नाही. विषयांतर न करता नवीन वर्षाच्या संकल्पांबद्दलच बोलणं चालू ठेवू आपण.

तर या संकल्प प्रकरणाची लागण कंपनीत झाली नाही तर नवलच म्हणावं लागेल. माझा बॉस एक महा गंडलेला प्राणी आहे. तो कशावरही मीटिंग घेऊ शकतो. "नवीन वर्षाचे संकल्प" यावर मीटिंग झाली आमची मधे. लोक काय काय पतंग उडवत  होते माहितीय? एक काय म्हणे तर "मी नवीन प्रोजेक्ट आणेन" , एक म्हणाला, "आहे हा पूर्ण करेन", तर तिसरा म्हणाला, " इतकं काम करेन की तुम्हाला नको असलं तरी मला प्रमोशन द्यावंच लागेल"
ही सगळी मंडळी कामचुकार म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांचे संकल्प ऐकून बॉस ला अगदी भरून आलं असेल त्या दिवशी. आणि ते पूर्ण होणार नाहीयेत ह्याची खात्री पण झाली असेल. :)

असे प्रश्न मला कुणी विचारले तर मी अतिशय निरुपद्रवी अशी उत्तरे देते. अर्थात माझ्यासाठी निरुपद्रवी. :) जसे की कार चालवायला शिकणे, एखादी नवीन भाषा शिकणे-फ्रेंच, जपानी इ.इ., किंवा मग वर्षभरात एकही चप्पल, पर्स न घेणे वगैरे. जे मोडले समजा तरी मला काही तोटा नसतो. आणि ते मोडतात म्हणण्यापेक्षाही सुरूच होत नाहीत कधी!

तर असं कुणी समजा मला विचारलंच तर या वर्षीचं माझ उत्तर आहे, "संकल्प न करण्याचा संकल्प". आणि ते पाळण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे, असं म्हणतेय तरी. पाहू काय होतं ते. 

Read more...

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP