गो गोवा.. भाग १..

>> बुधवार, १३ एप्रिल, २०११

रोजचंच काम, तेच ते रुटीन आणि बरेच दिवसात कुठेही टवाळक्या करायला न गेल्यामुळे आलेला कंटाळा.. या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग.. तो म्हणजे २-३ दिवस कुठेतरी भटकंती करून येणे. माझ्यासारखे बरेच जण होते जे जाम पकले होते त्याच त्या दिनक्रमाला. काय करावं असा विचार करता करता शेवटी, "एक ट्रीप काढू" हा विचार पक्का झाला आणि ट्रीपची ठिकाणं एकेकाच्या सुपीक मेंदूतून बाहेर यायला लागली. आम्ही ७-८ जण होतो, आणि सगळ्यांनी त्यांच्या लहानपणी कधीतरी गोवा पाहिलेलं होतं, त्यामुळे गोवा फायनल केलं. ९-१०-११ एप्रिल चा विकेंड ठरला. 

९ एप्रिल, शनिवार.. सकाळी ६ वाजता "बाप्पा मोरया" करून आम्ही "पुणे टू गोवा" या आमच्या सफरीला आरंभ केला. आमच्या ग्रुप मध्ये माझ्या नणंदेचा २ वर्षाचा मुलगा होता. त्यामुळे  मस्त टाईमपास होता सगळ्यांना. त्याच्याशी बडबड करत आणि त्याच्या बोबड्या बोलण्याचे अर्थ काढत आमचा प्रवास सुरु झाला.
आमच्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे प्रवास सुरु करून एखाद-दोन तास झाले की सगळ्यांना तहान, भूक लागायला सुरुवात होते. त्यामुळे आम्ही जेमतेम खंबाटकी घाट उतरलो असू, इतक्यात माझ्या दिराला तहान लागली.. नवऱ्याला भुकेची जाणीव झाली तर कुणाला मळमळायला लागलं. २ तास एका जागी बसल्यामुळे आपल्याला वाळवी लागेल की काय ही भीती वाटत असावी बहुतेक . तसंच सगळ्यांना दामटून बसवून शेवटी साताऱ्याजवळच्या "अतीत" या गावातल्या बस स्थानकावर गाडी थांबवली. या अतीत स्थानकावर वडापाव फार छान मिळतो. पुणे-सांगली विनाथांबा एशियाड ने जाताना बस इथेच फक्त थांबते. त्यामुळे आम्हाला इथल्या वडापावाची ख्याती माहीत आहेच. इथला वडापाव न खाता पुढे गेलो तर त्या कॅन्टीनवाल्याला किती वाईट वाटेल असा विचार करून आम्ही सगळ्यांनी फक्त वडापावच नाही तर तिथे तयार असणाऱ्या सर्व नाश्ता आयटम्स वर ताव मारला. उदा. उप्पीट, पोहे, भजी, इडली, शिरा इ इ. मग चहा झाला. निसर्गाच्या हाकेला "ओ" देऊन झाली. आणि अर्धा पाऊण तास खाण्यापिण्यात गेल्यावर आम्ही सगळे परत गाडीत बसलो. 

गोव्याला जायला २ मार्ग आहेत, एक कोल्हापूर-गगनबावडा मार्गे तर दुसरा आंबोली मार्गे. आंबोली मार्गे गेलं तर मधेच थोडासा कर्नाटकाचा भाग येतो. आणि त्या ५० किमी साठी इन-आउट चेकिंग आणि एन्ट्री टोल भरायचे उपद्व्याप करावे लागतात. म्हणून आम्ही "महाराष्ट्र देशा"तूनच जायचं ठरवलं. कोल्हापूर पास करून गगनबावड्याच्या मार्गाला लागलो. गगनबावडा जंगल शिकारीसाठी प्रसिध्द आहे. तिथे वाघ, तरस, रानडुक्कर असे जंगली प्राणी खूप आहेत. गगनबावड्याला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणतात इतका पाउस पडतो तिथे. पावसाळ्यात ५ फुटावरचं सुद्धा दिसत नाही. घाटाचा रस्ता अगदी व्यवस्थित आहे पण वळणं मात्र अवघड आहेत. हा घाट उतरला की लगेच कोकण सुरु होतं. आम्हा सगळ्यांनाच हा रस्ता नवीन होता, त्यामुळे सगळे एकदम शांत बसून निरीक्षण करत होतो. अचानक आमच्यातल्या ज्यूनिअरला काहीतरी दिसलं आणि त्याचं "प्पा प्पा" सुरु झालं. त्याला माकडांची मोठ्ठी टोळी दिसली होती. (प्पा = हुप्प्या, समजून घ्यायचं आपणच) मग त्याला त्याचे (म्हणजे सगळ्यांचेच) पूर्वज दाखवण्यासाठी आम्ही थांबलो. समोर सह्याद्रीच्या मस्त रांगा दिसत होत्या त्यामुळे खास गोवा ट्रीप साठी घेतलेल्या कॅमेरयाचं उदघाटन मी तो देखावा टिपून केलं.

त्या माकडांच्या टोळीमध्ये एक लेकुरवाळी माकडीण होती. ती कठड्यावर मस्त पोज देऊन बसली होती पिल्लाला कुशीत घेऊन. तिचा फोटो काढल्याशिवाय पुढे जाववेना. तिला कॅमेऱ्यात बंद करून आणि अजून २-३ फोटो मारून परत गाडीत बसलो. 
कणकवली मागे टाकून सावंतवाडीच्या मार्गाला लागलो. आता पोटात कावळे झिम्मा खेळायला लागले होते. त्यामुळे सावंतवाडीत जेवायचं पक्कं केलंच होतं. सावंतवाडी बस स्थानकापासून ३-४ किमी वरच एक छानसं हॉटेल दिसलं. "शिवास" नावाचं (आमच्यातल्या "पेयपान करणाऱ्या" लोकांना ते नाव इतकं आवडलं की त्यांनी तिथेच जेवायचं आग्रह धरला) . त्या हॉटेलचं प्रथमदर्शनच इतकं छान होतं की जेवण पण चांगलं असेल, असं उगीचच वाटलं. आणि खरचं आमचा विश्वास सार्थ ठरला. जेवण अप्रतिम होतं. खास कोंकणी मसाल्यातील फिश करी, सुरमई फ्राय, मलई कोफ्ता आणि दाल खिचडी वर ताव मारून आणि हॉटेलच्या आजूबाजूच्या बागेतल्या झाडांना लगडलेले आंबे, फणस बघून पुढच्या प्रवासाला लागलो.

आम्ही मडगावला राहणार होतो. सावंतवाडी-मडगाव साधारण ९० किमी आहे. मध्ये महाराष्ट्र सरकारची हद्द संपताना एक चेकपोस्ट आहे. तिथे ड्रायव्हरचा लायसन्स वगैरे तपासणी झाली. थोडं पुढं जातोय तोच गोवा सरकारचं चेक पोस्ट आहे. तिथेही तोच उद्योग झाला. असं सगळं होऊन आम्ही पणजीत प्रवेश केला. मांडवी नदीत विहरणाऱ्या  असंख्य बोटी पाहून खऱ्या अर्थाने गोव्यात आल्यासारखं वाटलं. विजय मल्ल्याची बोट पण तिथे नांगरून ठेवलेली होती. मनात विचार केला, असेल काय "दीपिका" आत? असो बापडी..   आपल्याला काय...

आमचं हॉटेल कोलवा बीच वर होतं. खोल्या पण सी-फेसिंग होत्या. बाल्कनी उघडली आणि समोर समुद्र दिसल्यावर काय भारी वाटलं म्हणून सांगू... अहाहा.
मला दर वेळी समुद्र पाहिला की वाटतं सांगलीला, किंवा पुण्याला (मी इथे राहते म्हणून ही दोन शहरं बरं का) का नाही समुद्र? पण मग त्या दमट हवामानाची आठवण झाली की वाटतं बरंय जे आहेत ते... जेव्हा समुद्रावर खेळावंसं वाटेल तेव्हा जाऊ असंच कुठेतरी..    
इथेही हवा गरम होती, पण त्या किनाऱ्यावर झेपावणाऱ्या लाटा पाहिल्या, ती गाज ऐकली आणि माफ केलं त्या हवेला..

फ्रेश होऊन समुद्रावर चक्कर मारून यायचं असं ठरवलं. तिथे काही खास आकर्षणं होती.. त्या साठी मला जायचंच होतं. गैरसमज करून घेऊ नका. आम्हाला आपलं खाण्यापिण्याच्या ठिकाणांचं आकर्षण आहे. तुमचं काय आहे ते बघा बुवा तुम्हीच..

कोलवा बीच वर काय केलं, गोव्यात काय काय पाहिलं, काय काय खाल्लं ते पुढच्या भागात लिहीनच. तोपर्यंत बाय बाय!! 

                                                                                                                                          भाग २

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP