आम्ही वेंधळी वेंधळी
>> गुरुवार, २३ डिसेंबर, २०१०
मी लहानपणापासून स्वत:मध्ये रमण्यात जास्त धन्यता मानत आलेली आहे. घरी एकटी असले तरी मी निवांत असते अगदी. कधी मित्र-मैत्रीणींमध्ये कल्ला करते तर कधी स्वत:ला वेळ देते. आता अश्या स्वभावाला "ती व्यक्ती जर हुशार असेल" तर "एककल्ली" स्वभाव असे म्हणतात, आणि "ती व्यक्ती जर बावळट असेल" तर "मंदबुद्धी" म्हणतात. या दोन्ही विशेषणांच्यामध्ये एक पुसटशी सीमारेषा आहे. त्या सीमारेषेवर मी असावी असे मला वाटतं , कारण मी "वेंधळेपणा" करते असे खूप लोकांचं मत आहे. (अगदीच चुकीच नाहीये ते). अश्या काही गोष्टी घडतात आणि नंतर माझं मलाच खूप हसू येतं.
आज, आत्ता, अर्ध्या तासापूर्वी मी असा एक हिट आयटम दिलाय. म्हणलं चला, ही मजा लोकांना सांगून त्यांना पण हसवूया थोडंस. जसं आपण आपल्या चांगल्या गोष्टी लोकांना सांगतो आणि वाहवा मिळवतो, तसंच आपली गंमतशीर बाजू पण कळू दे लोकांना, काय?
तर झालं असं---
मागच्या महिन्यात आमच्या कंपनी मध्ये "ऑनलाईन लीव्ह अप्लिकेशन सिस्टीम" चालू झाली. म्हणजे आधी होतीच पण "Manual" पण रेकॉर्ड्स ठेवले जायचे. आता पूर्णपणे ऑनलाईन करून टाकली. आम्हाला सगळ्यांना जानेवारी पासून च्या सुट्ट्या या नव्या सिस्टीम मध्ये भरायला सांगितल्या. आणि आम्ही तत्परतेने भरल्या. अहो सुट्ट्या हा किती जिव्हाळ्याचा विषय असतो हे मी काय वेगळं सांगायला हवं का? तुम्ही माझी "आमचा बॉस आणि आम्ही" ही पोस्ट वाचली असेलच. तर त्या सणकी बॉसने तितक्याच तत्परतेने त्या सुट्ट्या "Disapprove" करून टाकल्या. का तर त्या वेळी ते आमच्या ग्रुपचे इनचार्ज नव्हते म्हणे. आता आली ना पंचाईत. तसं पाहायला गेलं तर या सगळ्या सुट्ट्या वेगळ्या आणि वरच्या Authority कडून आधीच मान्य झालेल्या होत्या, आणि या माणसाच्या "Disapprove " करण्याने त्यात काही फरक पडणार नव्हता. तरीपण त्याने आपला हुद्दा दाखवलाच. आणि आमच्या घेतलेल्या सगळ्या सुट्ट्या परत आमच्या वर्षाच्या balance मध्ये जमा झाल्या.
झालं, HR वाले पण हैराण. त्यांच्या सिस्टीमच्या मुस्कटात मारल्यासारखं झालं त्यांना. त्यांनी एक तोडगा शोधून काढला. वरच्या लोकांशी बोलून , ज्या Authority ने आमच्या सुट्ट्या मान्य केल्या होत्या त्याचं नाव आमचा इनचार्ज म्हणून सिस्टीम मध्ये बदललं आणि आम्हाला परत सगळ्या सुट्ट्या भरायला सांगितल्या.
आता तसं वर्ष संपायला १ च आठवडा राहिलाय. आणि त्यात उद्याचा दिवस म्हणजे नाताळच्या पूर्वसंध्येला आम्हाला एक सुट्टी घेता येऊ शकते. ("Restricted holiday- RH" या नावाचा एक रजेचा प्रकार सरकारी कंपन्यांमध्ये असतो, ज्या हक्काच्या असतात आणि वर्षात अश्या २ दाच घेता येतात, त्याही सरकारच्या लिस्ट मध्ये असलेल्या दिवशीच.) त्यावर माझ्या २ सहकारी मैत्रिणी आणि मी चर्चा करत होतो. उद्याची RH घेतली की सगळ्या सुट्ट्या संपतात, त्यामुळे आपण सर्व सुट्ट्या वापरून घेतल्या या आनंदात आम्ही असतानाच, एक मैत्रीण म्हणाली, "माझ्याकडे एक "Casual leave-CL" शिल्लक आहे, ती सोमवारी घ्यावी काय". आम्ही तिला ३१ डिसेंबर ला घे असा सल्ला दिला. त्या नंतर पुढच्या काही मिनिटात घडलेलं हे संभाषण:
मैत्रीण: वा, माझ्याकडे एक CL शिल्लक आहे अजून.
मी: मस्त, घेऊन टाक, सोडू नकोस.
मैत्रीण: पण मी ती कधी घेऊ? सोमवारी की ३१ ला?
मी. अगं, ३१ ला घे, तशीही उद्या RH घेतल्यावर ३ दिवस मिळतायतच, ३१ ला शुक्रवार आहे, तेव्हा पण ३ दिवस होईल मस्त.
मैत्रीण: पण तू घेणार का तेव्हा सुट्टी?
मी: आं? आता माझा काय संबंध? माझ्या सगळ्या CL आधीच संपल्यात बरंका. तुझी तू घे ना.
(ही मैत्रीण आणि मी, आम्ही एकमेकींकड़े पाठ करून बसतो)
हे मी बोलले आणि आजुबाजूला जोरदार हास्याचे फवारे उडाले. मला कळेना, काय झालं. "बरोबर आहे ना मी म्हणते ते, हिने सुट्टी घेण्याशी माझ्या सुट्टीचा काय संबंध?" असे म्हणून मागे फिरले आणि मग मला कळलं काय झालं ते. एक नंबर वेंधळेपणा केला होता मी. "ती मैत्रीण तिच्या नवऱ्याशी फोन वर बोलत होती, आणि तिने त्याला विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तरे दिली होती."
2 comments:
हा हा.. वेंधळेपणा आवड्या ..
पाठीला डोळे नसतात आणि कान बंद करता येत नाहीत... :D सहीच!
टिप्पणी पोस्ट करा