माझा न बोलणारा मित्र

>> मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०१०


१० वर्षं झाली त्या गोष्टीला. आम्ही चहुबाजूनी गजबजलेल्या अशा शहराच्या मध्यवर्ती भागातून, म्हणलं तर गावात आणि म्हणलं तर गावाबाहेर अश्या ठिकाणी नवीन बंगल्यात राहायला जाणार होतो. आधी वाडा मग अपार्टमेंट अशा "आजूबाजूला खूप माणसे असलेल्या आणि त्याच वातावरणात रमणाऱ्या" आम्हा सगळ्यांना थोडं विचित्र वाटत होतं. बंगल्यात आपण एकटंच रहायचं , शेजारी पाजारी सगळे कंपाऊंड च्या पलीकडे, पाहिजे तेव्हा कुणाकडेही जाऊन गप्पा टाकत बसता येणार नाही ही कल्पना पचनी पडत नव्हती. विशेषत: माझी आई आणि आजी तर सुरुवातीला बाबांच्या विरोधातच होत्या म्हणा ना. तिथे त्यांना सुरक्षित वाटणार नाही असे त्यांचं म्हणणं. घर बांधून पूर्ण झालं तरी त्या दोघींचा हेका कायम होता. शेवटी आपण एक कुत्रा पाळू असे कबूल करून त्यांना कसंबसं तयार केलं.

माझी १२ वी परीक्षा झाल्यावर आम्ही तिकडे राहायला गेलो. प्रचंड मोठ्ठं पोर्च, मागे पुढे बाग आणि मधोमध छानसा टुमदार बंगला बघून मी आणि माझा भाऊ तर एकदम हरखून गेलो होतो. पण माझ्या आई-आजी ला मात्र आपण अश्या एकलकोंड्या जागी कसे काय राहणार याची चिंता सतावत होती. आणि त्या दोघी लवकरात लवकर कुत्रा आणण्यासाठी बाबांच्या मागे लागल्या होत्या. मी आणि भाऊ वेगळ्याच चिंतेत होतो. आम्हाला कुत्र्याची प्रचंड भीती वाटायची. मग तो आपल्याच घरात आणायचा म्हणल्यावर आमची काय अवस्था झाली असेल!

पण तो दिवस आलाच... एके दिवशी बाबा आणि आमच्या दवाखान्यातला एक कंपौंडर एक छोटंस काळं बंडल घेऊन गाडीतून उतरले. मला वाटलं काहीतरी असेल फाइलचा गठ्ठा वगैरे, म्हणून मी ते घ्यायला बाहेर गेले. पाहते तर एक गोंडस पिटुकलं जर्मन शेफर्ड जातीचं कुत्र्याचं पिल्लू. काळ्या लोकरीचा गुंडाच जणू. बाबांनी खाली सोडताच ते इकडे तिकडे निवांत फिरायला लागलं आणि माझी पळता भुई थोडी झाली. मी आणि भाऊ आम्ही एका खोलीत कडी लावून बसलो, कारण हे महाराज त्याच्या बापाचं घर असल्यासारखे हुंदडत होते. बरं ते इतकं छोटं होत कि त्याला बांधून ठेवायची काही सोय नव्हती. घरात शिरल्या शिरल्या त्याने एक फ्लॉवरपॉट फोडला, मिठाचं भांडं सांडलं आणि कोपर्यात ठेवलेल्या टेबलावरून एक टॉवेल ओढून तो चावत चावत सोफ्याखाली बसकण मारली.

आईने एका भांड्यात दुध - भाकरीचा काला करून त्याच्या समोर ठेवला. पण बेट्याला कळेचना की हे खायचंय. त्याने त्यावर पाय मारून भांडं उपडं केलं. पाणी दिलं तरी हीच गत. 2-3 दिवस असेच गेले. काही खायचं नाही आणि रात्री कुई कुई करत बसायचं. चौथ्या दिवशी त्याला कळलं कि कसं खायचं आणि कसं प्यायचं. आईच्या पायात पायात फिरायचा. स्वयंपाकघरात कट्ट्याखाली मुटकुळं करून बसायचा नाहीतर चारी पाय पसरून ताणून द्यायचा. आम्ही त्याचं नाव Jacky ठेवलं.

त्याचे दात छोटे छोटे पण टोकदार होते. दिसेल त्यात तोंड घालणे आणि सापडेल ते चावणे, चोथा करणे, एवढेच काम त्यांना. एक दिवस माझा पाय पकडला. माझं हार्टफेल व्हायचं बाकी होतं फक्त. पण तो मला चावला नाही, नुसता पाय पकडून ठेवला. याचा अर्थ तो मला त्या घरातला एक मेंबर म्हणून ओळखायला लागला होता. आणि या घटनेनंतर मात्र माझी भीती पूर्ण गेली. आम्ही एकमेकांचे मस्त दोस्त झालो.

जसा जसा तो मोठ्ठा होत गेला तसेतसे त्याचे कारनामे वाढतच चालले. आम्ही त्याला आमच्या खोलीशेजारच्या गच्चीत ठेवायला लागलो होतो. तिथून सगळ्यात वरच्या गच्चीत जाण्यासाठी जिना होता. हे साहेब एक दिवस खालच्या गच्चीत दिसेचनात. अचानक वरून कसलीतरी खसफस ऐकू आली म्हणून वर गेले, तर Jacky खाली येण्याचा प्रयत्न करत होता, आणि पायऱ्या उतरता येत नाहीत म्हणून नखाने जमीन खरवडत होता. कसाबसा त्याला खाली आणला, तर हा सरळ बेडरूम मध्ये जाऊन मस्त बेडवर झोपला.
                                  
मी आणि माझा भाऊ एकमेकांशी चढ्या आवाजात बोलत असलो, किंवा भांडत असलो, की हा शेजारच्या गच्चीतून गुरगुरायचा आणि नखाने खिडकीवर ओरखडे काढायचा. मोठी माणसे समोर असतील तर लहान लोकांकडे दुर्लक्ष्य करायचा. कुणाला महत्त्व द्यायचं आणि कुणाला नाही हे लॉजिक कुठून आलं होतं त्यालाच माहित.


एके दिवशी त्याला नाक जमिनीला लावून स्वत: भोवती गोल गोल फिरताना माझ्या आजोबांनी पाहिलं. त्यांना वाटलं याला काहीतरी लागलं. पाहायला गेले तर हा एका माशीला पकडायच्या प्रयत्नात होता. माशी अशी सापडते काय कधी, पण हे त्याला कुठलं कळायला. असाच तो कबुतर, कावळे यांच्या मागे धावायाचा. आमची भाषा त्याला कशी काय समजायची कोण जाणे, पण "माशी पकड", "Jacky , ते बघ कबूतर" "बिस्कीट देऊ?" यासारख्या वाक्यांना तो अपेक्षित प्रतिसाद द्यायचा.

गेट समोरून कुणी जात असेल तर एकदा clockwise आणि एकदा anticlockwise असा गोल गोल फिरत भुंकायचा. ही काय पद्धत होती काय माहित. त्याच्या या गोल फिरत भुंकण्यामुळे अख्या गल्लीत प्रसिध्द होते "Jacky गद्रे"

संध्याकाळी पोर्च मधल्या कट्ट्यावर मी कधी कधी बसायचे. मी बसले की हा आलाच. आल्या आल्या मांडीवर डोके ठेउन प्रेमात यायचा. अशावेळी समजून घ्यावं लागायचं, की मिस्टर Jacky  याना त्यांचे डोके थोपटून, गळ्याखाली खाजवून पाहिजे आहे. मग एकदम समाधी लागल्यासारखा, डोळे मिटून कान पाडून शांत बसून असायचा.

दोन गोष्टींना तो भयंकर घाबरायचा. एक डॉक्टर आणि एक त्याचा स्प्रे. एकदा त्याच्या पाठीला एक जखम झाली. त्यावर मारायला डॉक्टरनी एक आयुर्वेदिक स्प्रे दिला होता. कदाचित तो मारल्यावर त्याला झोंबत असेल. त्या स्प्रे च्या बाटलीला सुद्धा तो घाबरायचा. नुसतं स्प्रे हा शब्द जरी कुणाच्या तोंडातून आला तरी स्वत: च्या पिंजर्यात जाऊन बसायचा. कित्ती तरी दिवस त्याला कंट्रोल करायचं असलं की आम्ही ती स्प्रे ची बाटली दाखवायचो त्याला.चुकून जर एखाद्याचा त्या जखमेच्या जागी हात लागला, की भयंकर प्रकारे दात विचकायचा.  

त्याची फिरायला जायची वेळ झाली की मागच्या बागेतला त्याचा खास फिरायचा पट्टा तोंडात घेऊन स्वारी आमच्या पुढे मागे घुटमळत असायची. फिरून परत घरी आणलं की हाताला हिसका मारून त्या पट्ट्याचं दुसरं टोक स्वत: च्या तोंडात घेऊन आपापला चालता व्हायचा. हे शहाणपण कुठून आलं होतं कोण जाणे. 

अंघोळ घालून घ्यायला त्याला आवडत नसे. गरम गरम पाणी अंगावर ओतलं की डोळे बिळे मिटून शहाण्या बाळासारखा बसायचा, पण शाम्पू लावला रे लावला, की फडफड करून अंग झटकून टाकायचा की समोरचा ओला आणि फेसमय झालाच पाहिजे. एवढं करूनही कमी असल्यासारखं तिरका तिरका आमच्या अंगाला घासायचा. त्याच ते एवढं मोठ्ठं धूड पेलवणे म्हणजे सोप्पं काम नव्हतं.

कुत्रे इमानदार असतात तसेच आपल्या मालकाबाबत Possessive ही असतात. एकदा शेजार्यांनी एक पिल्लू आणलं म्हणून मी त्यांच्याकडे पाहायला गेले. ते सुद्धा Jacky शी मी खेळत असताना मधेच गेले. मी परत येईपर्यंत हा प्राणी नुसता मधल्या भिंतीलगत येरझाऱ्या घालत भुंकत होता.तिकडे उडी मारून यायचा प्रयत्न करत होता. जर का तो तिकडे आला असता तर त्या बिचार्या पिल्लाचं काही खरं नव्हतं. त्या शेजार्यांच्या कुत्र्याशी किती तरी दिवस दुश्मनी होती त्याची.


आम्ही नवीन कपडे घालून बाहेर आलो, की स्वत: हून आपल्या पिंजर्यात जायचा. तरीपण आम्ही तसेच थांबलो तर आत बाहेर चालू असायचं. असं वाटायचं की याला जर बोलता येत असतं तर म्हणाला असता, किती वेळ घालवताय, जा की पटकन, आणि मला मोकळं करा. पण तरीपण आम्ही जाणार म्हणून चिडून भुंकायचा .

असा हा आमचा Jacky ३ महिन्यांपूर्वी आम्हाला सोडून गेला. वय झाल होतं तसं. खात पीत नव्हता,  नुसता पडून असायचा. जवळ गेलं की आपणहून पाय आपल्या हातात द्यायचा.  माझा खूप जीव होता त्याच्यावर, आणि तो गेल्याचं कळल्यावर मला खूप वाईट वाटेल म्हणून  म्हणून आईने मला २-३ दिवस सांगितलंच नव्हतं. अजून आठवण येते त्याची. घरी गेलं की घर शांत शांत वाटतं. "Jacky" म्हणून हाक मारल्यावर पळत येऊन आपल्या अंगावर तो उडी मारणार नाही ही जाणीव झाली की नको नकोसं वाटतं.

किती जीव लावतात ना हे मुके जीव. आपल्या कुटुंबाचा एक सदस्य होऊन जातात. आणि मग त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला सवय होऊन गेल्यावर एक दिवस आपल्याला सोडून निघून जातात. त्यापेक्षा कधी कधी वाटतं नकोच पाळायला कुत्रा वगैरे. नकोच ते प्रेम लावणं आणि नकोच ते गेल्याच दु:ख. पण मग रिकामा पिंजरा बघून वाटतं, पाहिजेच  नवा दोस्त. परवा गेले होते सांगलीला तेव्हा बाबांना सांगून आलेय, नवीन पिल्लू आणायला जाल तेव्हा मी येईन तिकडे, नाहीतर ते मला लक्षात कसं ठेवेल!
त्याचं नाव पण Jacky च ठेवणार आहे मी.

11 comments:

Maithili ३० नोव्हेंबर, २०१० रोजी ६:२७ PM  

खूप सही आहे पोस्ट....मला कुत्रे आवडत नाहीत खरेतर...( आणि हो भीती पण वाटते...) पण तरी....एकदम touchy वाटली पोस्ट... :-)

हेरंब ३० नोव्हेंबर, २०१० रोजी १०:२७ PM  

मलाही कुत्रे वगैरे अजिबात आवडत नाहीत.. पण ही पोस्ट खूप आवडली. !! छान लिहिलंय ..

केदार ३० नोव्हेंबर, २०१० रोजी १०:३७ PM  

खुपच छान लिहिल आहे... वाचता वाचता डोळ्यात पाणी आलं. जर जॅकिचा एखादा फोटोपण अपलोअड केला असतात तर मजा आली असती

Shraddha Bhowad १ डिसेंबर, २०१० रोजी ५:५९ AM  

केतकी, I am sorry for your loss.
तू ’टर्नर ऍंड हूच’ बघितला आहेस का? बघ. तुला आवडेल तो.

Vaishali १ डिसेंबर, २०१० रोजी १०:२२ AM  

Mastach lihil aahe...
Really touching..

Ketaki Abhyankar १ डिसेंबर, २०१० रोजी १०:२९ AM  

@ श्रध्दा: नाही पहिला मी टर्नर अँड हूच. पण पाहीन आता.
@ मैथिली, हेरंब: धन्यवाद.
@ केदार: टाकले आहेत बघ जॅकी चे फोटो

Mahendra १ डिसेंबर, २०१० रोजी १०:४८ AM  

मला पण कुत्रे खूप आवडतात. आमच्या घरी पण एक कुत्रा होता- १६ वर्ष . तो अगदी घरचा मेंबर असल्याने त्याचे जाणे मनाला चटका देऊन गेले . शेवटी तर तो मोतीबिंदू मुळे आंधळ्यासारखाच झाला होता. अजूनही आठवलं की मन भरून येतं. छान लिहिलय.

Ketaki Abhyankar १ डिसेंबर, २०१० रोजी १०:५७ AM  

Thanks kaka.

अभय परांजपे १ डिसेंबर, २०१० रोजी १:०२ PM  

फार छान लिहीलं आहेस तू केतकी. माझ्याकडे पांढरा अल्सेशियन आहे म्हणून मी तुझ्या भावना जास्त चांगल्या समजू शकतो. खूप अनौपचारीक लिहीलं आहेस. शैलीही चांगली आहे. मला आवडलं. जास्त लिहीत जा. आवडेल लोकाना आणि मलाही. - अभय परांजपे

Ketaki Abhyankar १ डिसेंबर, २०१० रोजी २:०२ PM  

@ अभय दादा: धन्यवाद. खऱ्या
घडलेल्या घटना लिहिताना आपोआप भावना उलगडत जातात बहुधा.

अपर्णा २ डिसेंबर, २०१० रोजी १२:१५ PM  

माझं आणि पाळीव प्राण्याचं जुळत नाही पण ही पोस्ट छान आहे...

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP