साहित्य दिवाळी!!
>> मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०१०
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
संपली... दिवाळी संपली... माहित्येय मला. पण मी अजून साहित्य दिवाळी या सणात रमलेली आहे. तुम्हाला वाटेल, काय बडबड लावलीय? साहित्य दिवाळी म्हणे.. फराळात झिंग येणारं काहीच नसत तरी पण हिला फराळ चढला बहुतेक...
हो हो.. झिंगच आलीय मला. साहित्यिक झिंग... तरीही मी जे काही लिहीन ते "अगदीच कामातून गेलेले" असे न मानता वाचावे, ही नम्र विनंती.
कसंय, काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी परवा परवाच, "ब्लॉग माझा" या स्टार माझा ने आयोजित केलेल्या स्पर्धेबद्दल वाचनात आलं. वाचनात आलं म्हणजे सरळ निकालच वाचला मी. ट्विटर वर भुंगा चा ट्विट वाचताना ही नोंद आढळली. सहज म्हणून त्या दुव्यावर गेले तर ५-६ पारितोषिक विजेते आणि खूप सारे उत्तेजनार्थ अशी मोठ्ठी यादी. आनंदाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ब्लॉगरचं नाव आणि त्याच्या ब्लॉग चा पत्ता अशी व्यवस्थित यादी पाहून तर अगदी म्हणतात ना, "मन थुई थुई नाचू लागले" तश्या भावना आल्या मनात.
मग मी सपाटाच लावला, प्रत्येक ब्लॉग ला भेट देण्याचा. त्यातून जे जे लेख मला माझ्या टाईप चे वाटले, म्हणजे माझ्या सारख्या पामराला सहज कळतील, उमगतील असे, त्या त्या ब्लॉग ना मी सरळ अनुसरत गेले. (म्हणजे शिम्पल म्हराटीत follow केलं हो.. काय आहे, आपल्याला सवय झालेली असते ना शिम्पल बोलायची, लिहायची, मग अशी अवघड(?) भाषा झेपत नाही) शनिवार - रविवार असे अगदी सत्कारणी लागल्यासारखे वाटतायत त्यामुळे.
ऑफिस मधे सुध्दा वेळात वेळ काढून मी हे अनुसरण केलेले ब्लॉग पाहतेय, वाचतेय. आणि त्यातून जो काही बुद्धीला म्हणा अगर मनाला म्हणा खुराक मिळतोय ना, त्यामुळे ही बौद्धिक नशा आलीय मला. रोज काहीतरी नवीन वाचायला मिळतंय. मधून मधून शाब्दिक फटाक्यांची आतशबाजी आहेच मनोरंजनासाठी. आधीचे काही लेख रूपी खादयही पोटात जातंय simultaneously. (याला मराठी शब्द समांतर होऊ शकतो, पण तो इथे जरा बरोबर वाटला नाही.) तर तुम्हाला आता कळलं असेल की मी वर काय काय बडबड केली ती सगळी या शतपक्वान्नांमुळेच. (पंचपक्वान्न कसं म्हणू? पाच पेक्षा जास्त ब्लोग्स आहेत ते :) )
म्हणून म्हणलं की माझी दिवाळी- साहित्यिक दिवाळी.अजून संपायचीय!!. चालत राहील पुढच्या दिवाळीपर्यंत.
सर्वाना याही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
Labels:
माझिया मना जरा सांग ना
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा