घर पहावं बांधून
>> गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०
नमस्कार मित्र-मैत्रीणीनो,
बराच मोठा ब्रेक घेतल्यानन्तर आज ज़रा वेळ मिळालाय.आणि हात तर कधीपासून शिवशिवतायत लिहिण्यासाठी (म्हणजे किबोर्ड बडवण्यासाठी :) ). खरं सांगायचं तर लिहिण्यासारख काहीतरी घडायची वाट पहात होते.
शीर्षक पाहून चतुर वाचकांच्या लक्षात आलं असेलच की अस्मादिक "घर" नावाच्या मूलभूत गरजेची पूर्तता करता करता कुठेतरी अडकून बसले होते. अगदी बरोबर. हा हा, थांबा.. बांधून हा शब्द वाचून असं तर वाटलं नाही ना तुम्हाला, की मी बंगला वगैरे बांधलाय? तेवढी लायकी पण नाही आणि ऐपत तर नाहीच नाही. या पुण्यनगरीत बंगला बिंगला बांधणे म्हणजे काय खाऊ आहे का राव? पु.लं च्या भाषेत, जन्मदात्याने तरी ही बंगल्याची सोय केलेली हवी किंवा नवरयाच्या तिर्थरुपानी तरी. नाहीतर आपल्यासारख्या पामरांचा काय पाड लागणार इथे.
तर बंगला वगैरे नाही, पण एक छानसा २ BHK फ्लैट घेतला. आणि आत्ता कुठे त्या गडबड़ीतून जरा मोकळा श्वास घेतेय. त्या बिल्डर ने फार पकवल आम्हाला. हे लोक ना पुढ़ारयांसारखे असतात. नुसती आश्वासने द्यायची. नाही कळल ? सांगते..
आम्ही जेव्हा घर बुक केलं तेव्हा ते जवळ जवळ ९०% बांधून पूर्ण झालेलं होतं. तेव्हा आम्हाला सांगण्यात आले, की बस २ महिन्यात नक्की ताबा देणार. (आश्वासन १) त्याच्या पुढे ५-६ महिने झाल्यावर आणि आम्ही त्याच्या पूर्वजांच्या भुतासारखे त्याच्या मानगुटीवर बसल्यावर कसंतरी उरकाउरक करून पझेशन दिलं. काही जास्तीच्या गोष्टी करून घ्यायच्या होत्या, जस की सर्व्हिस ओटा, जास्तीच बेसिन इ.इ. त्या ही करून द्यायला सांगितल्या. २ दिवसात होइल असे आश्वासन २ मिळालं.
पण कसचं काय! त्यात गेले २ महिने. वस्तुशांतिची तारीख १५ दिवसांवर आली. मग मात्र बिल्डर ऑफिस ला जाउन सज्जड दम भरला. (हो हो मीच. हे काम बरं जमतं मला) शेवटी सगळी पेंडिंग कामे होउन आम्ही पूजा करून घेतली.
बिल्डर कड़ून तर सगळं काम झालं. पण आता नातेवाईक, घरचे लोक या सगळ्यांकडून वेगवेगळी मते यायला लागली. आधीच फर्नीचर करून घ्या, नंतर घर घाण होतं हा सल्ला महत्वाचा होता. चला एवढे पैसे घालतोच आहोत तर हे पण करून टाकू, असा ठराव सर्वानुमते पास झाल्यावर परत २ महिन्यांची निश्चिंती झाली.
मग आर्किटेक्ट कड़े जा, डिझाइन्स फायनल करा, स्वत:ची अक्कल पाजळा, काहीतरी बदल सुचवा, यांव रंग, त्यांव सनमाईका असले उद्योग सुरु झाले. १०० वेळा तिथे जाउन सुतार, पेंटर याना सूचना करणं ओघाने आलंच. त्यात घराचा हप्ता सुरु झालेला. आम्ही भाड्याच्या घरात. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ घालण हेही एक मोठ्ठ काम होतं. पण स्वत:चं घर असं छान आपल्या नजरेसमोर साकार होताना स्टेप बाय स्टेप पहाण्यातली मजा काही औरच असते आणि ती आम्ही पुरेपुर अनुभवली.
प्रत्येकाने हे उद्योग कधी ना कधी केलेले असतील, ज्यानी नाही केले, ते नजीकच्या भविष्यकाळात यातून जातील यात काही शंका नाही. पण प्रत्येकाचे अनुभव नवीन असतील आणि ते अनुभवण्यातल सुख खरंच अवर्णनीय असतं हे मी नक्की सांगेन.
आता १५ दिवस झाले आम्ही नव्या घरी रहायला येउन. आजकाल Movers and Packers मुळे सामान हलवणे एकदम सोप्पे झालेय. त्यामुळे २ दिवसात सगळ्या वस्तू जागच्या जागी विराजमान झाल्या. खूप छान वाटतंय, आपल्या स्वकष्टाच्या कमाईच्या घरात राहताना. नवीन नवीन स्वप्ने पहाताना. आणि त्या स्वप्नांना साकार होताना बघताना.
तुम्हा सगळ्याना नवीन नवीन वास्तू/घरे घेण्यासाठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा!!!
ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफ़ळ सम्पूर्ण!! (श्रावण चालू आहे ना, शेवटच वाक्य लिहिल्याशिवाय कहाणी संपत नाही चातुर्मासात :) )
Labels:
माझिया मना जरा सांग ना
3 comments:
घर सजवताना आपल्या सोयींचा विचार करावा ही विनंती. इतरांसाठी सोय
ठरणारी व्यवस्था आपल्याला अडचण ठरू शकते.
@अनामित-बरोबर आहे. ऐकावे जनाचे करावे मनाचे. पण ज्याना आपली सोय काय आहे ते माहीत आहे, आणि त्याप्रमाणे त्यानी सल्ला दिला असेल, तर तो मानण्यात काहीच हरकत नसते. नाही का?
I have also recently gone through the same thing. Finally shifted a week ago. You are very correct and nicely put things.
टिप्पणी पोस्ट करा