बंद पडलीये आपली गाडी, चल रे मारू थोडा धक्का!

>> गुरुवार, ६ जानेवारी, २०११

"गाडी बंद पडणे" किती कॉमन गोष्ट आहे ना?  आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ही गोष्ट भरपूर वेळा घडलेली असते. पण ती "वेळ" खराब असते हे मात्र खरं. कारण आपली ही स्वामिभक्त आणि एकनिष्ठ गाडी नको त्या वेळी आणि नको त्या ठिकाणी बंद पडते, आणि आपला घात करते. (हे वाक्य सर्वसाधारण लोकांचा अनुभव गृहीत धरून लिहिलेले आहे.)

घरातून एकदम जोशात निघालेला एखादा माणूस "काय छान आहे माझी गाडी, अजिबात त्रास देत नाही कधी आणि बंद पण नाही पडली घेतल्यापासून" अशी आपल्या गाडीची मनोमन स्तुती करत असतो, आणि ते जणू ऐकत असल्यासारखं "तथास्तु भगवान" "तथास्तु" म्हणतात आणि गचके खात, आचके देत आपले ते प्रिय वाहन ऐन रहदारीच्या वेळी, भल्या मोठ्ठ्या रस्त्याच्या मधोमध भूश्श...करत बंद पडते. (अशा वेळी कदाचित तुम्हाला देव लोकांचा हेवा वाटू शकतो, त्यांची वाहने उदाहरणार्थ उंदीर, सिंह, रेडा इ.इ.निदान बंद तरी पडत नाहीत-- :) )

एखादा कॉलेज ला जायच्या घाईत असतो, कुणाला ऑफिसला उशीर होत असतो, कुणाचे कोणीतरी दवाखान्यात असू शकते ज्याला भेटायला तो जात असतानाच नेमकी गाडी बंद पडलेली असते. अश्या वेळी त्या "तथास्तु भगवान" ला 'विचार करून तथास्तु म्हणायला हवं' हे कळायला नको का?

गाडी बंद पडण्याची सगळ्यात वाईट जागा म्हणजे सिग्नल. आपण सिग्नलला थांबलेल्या गर्दीच्या तोंडाशी किंवा मधेच. आणि... अश्या वेळी गाडी बंद पडली तर अतिशय शरमिंदं व्हायला होतं आणि त्याच वेळी राग पण यायला लागतो. कारण सिग्नल हिरवा झालेला असतो, लोकांना पुढे जाण्याची घाई असते आणि आपण मधेच थांबून किक मारत असतो, त्यामुळे त्यांचा रस्ता अडलेला असतो. विचित्र परिस्थिती असते ती.

जर तुमच्याकडे चारचाकी असेल तर अजूनच चमत्कारिक प्रकार. तिला काय झालंय हे तिचं बॉनेट उघडल्याशिवाय कळत नाही. ना तिला पटकन बाजूला घेता येते, ना जोरजोरात किक मारून चालू करण्याचा प्रयत्न करता येतो. किल्ली फिरवून इग्निशन मध्ये कितीही वेळा आणली तरी गाडी जागच्या जागी ढिम्म उभीच. त्यासाठी आपल्याला आपल्या आसनावरून पायउतार व्हावं लागतं. एखादा जवळचा "Mechanic" आणायचा म्हणजे आधी तो शोधावा लागतो. मग तो येणार आपल्यावर उपकार केल्यासारखं, ५० भानगडी सांगणार, आपल्याला घाबरवणार आणि शेवटी भरभक्कम पैसे घेऊन काहीतरी खाटखुट करून गाडी चालू करणार. एक तर आपण मधेच थांबलोय ही एक अपराधीपणाची भावना असतेच मनात त्यात या सगळ्यामध्ये असंख्य शिव्याशाप घेतलेले असतात आपण. मागे उभ्या असलेल्या गाडीवाल्यांचे, दुचाकी वाल्यांचे(४ चाकी असली म्हणून काय झाल, मधेच काय थांबवलीय? माज फार या चारचाकीवाल्याना अशा अर्थी ), पादचार्यांचे आणि जिथे जायला आपल्याला उशीर झाला तिथे आपली वाट पाहणार्यांचे.        

अश्या वेळी कुणी आपल्या मदतीला येईल अशी विशेष अपेक्षा न ठेवलेलीच बरी. कारण जो तो आपापल्या तब्येतीप्रमाणे आणि स्वभावाप्रमाणे अस्तन्या सरसावून "याला किती शिव्या घालायच्या, मनात की उघड" या विचारात मग्न असतो. लोक तर खूप असतात आजुबाजुला, एखाद्याने धक्का मारला गाडीला, तर सगळ्यांचाच फायदा होणार असतो.म्हणावंसं वाटतं ---

"बंद पडलीय आपली गाडी, 
चल रे मारू थोडा धक्का,
मी ही जातो रे पुढे अन,
तुलाही देतो तोच मोका"

दोन गोष्टी एकदम साध्य---स्वार्थही (आपली गाडी तर चालू होणारच) अन परमार्थही (अहो, दुसर्यांच्या गाड्यांना रस्ता नाही का मोकळा होणार?)

तात्पर्य: गाडी बंद पडण्यासारख्या डोक्याला ताप गोष्टींमुळे  त्रास जरी होत असला, तरी पुण्यही मिळू शकते.   :P  :P1 comments:

सिद्धार्थ १२ जानेवारी, २०११ रोजी ११:३५ म.पू.  

हो एकदा माझ्या धांदरटपणामुळे मला सिग्नल सुटला तरी बाइक सुरुच करता येईना. मागे बस होती. नशीब नेहमीप्रमाणे बसला हॉर्न वैगरे नव्हता. ड्राइवर बोंबलत होता मागून. सिग्नलसारख्या ठिकाणी लोकं आपल्याकडे अशी "अपेक्षेने" पाहू लागली की फार खजिल व्हायला होते.

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP