शीर्षक वाचून तुमच्या मनात गोंधळ उडालेला दिसतोय मला. :)
त्याचं काय झालं, मागच्या शनिवार-रविवारी माझे सासू-सासरे आमच्याकडे आले होते. आम्ही दोघेही सुट्टी असल्यामुळे घरी होतो. २ दिवस काय काय करायचं याचे मनसुबे १ आठवडा आधीपासूनच मनात घोळत होते. शेवटी त्या दोघांना विचारून एक छोटीशी ट्रीप काढायचं नक्की झालं. पुण्यापासून ४० एक किलोमीटर अंतरावर "हाडशी" नावाचं एक ठिकाण आहे. आम्ही आधी तिथे जाऊन आलेलो असल्यामुळे ते छान आहे हे तर माहित होतंच. तसंच तिथून लोणावळ्याकडे जायच्या रस्त्यावर "दुधिवरे" म्हणून एक छोटंसं गाव आहे, ते आणि सध्या पर्यावरणवाद्यांनी भयंकर गाजवलेलं "लवासा" अशी ठिकाणं नक्की झाली.
जे कोणी बाहेरून पुण्यात येतात, त्यांच्यात जर कोणी बायका असतील तर त्यांना आल्या आल्या तुळशीबागेत जायचे वेध लागतात. त्यात सध्या संक्रांतीच्या हळदीकुंकवाची धूम चालू असल्यामुळे लुटायच्या विविध वस्तूंनी तुळशीबाग अगदी बहरलेली आहे. त्यामुळे शनिवार हा तिथेच भटकण्यात गेला होता. साहजिकच रविवारी ही ट्रीप करायचं ठरलं.
रविवारी सकाळी ८ ला सुमारास आम्ही बाहेर पडलो. सासू-सासरे गाडी घेऊनच आलेले होते, त्यामुळे कसं जायचं हा प्रश्न नव्हताच. आधी हाडशीला जायचं म्हणून आम्ही पिरंगुट मार्गे मुळशीच्या रस्त्याला लागलो. पौड गावाच्या बसथांब्यावरून उजवीकडे वळलं की हाडशीला जायचा रस्ता लागतो. थोडसं पुढे गेल्यावर डाव्या हाताला "महिंद्र क्लब रिसोर्ट" चा एक त्रिकोणी आकाराचा डोंगर दिसला. एकंदर दृश्य पाहून तिथे एकदा जायला हवं अशी मनाने नोंद करून ठेवली. तसंच त्याच रस्त्यावर "गिरीवन" म्हणून एक हॉलिडे रेसोर्ट आहे डोंगराच्या कुशीत. तेही खूप सुंदर आहे असं ऐकलं होतं. तिथेही जायचंय एकदा. पुढची ट्रीप मनात पक्की करतच आम्ही हाडशीला पोचलो. मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ता थोडा खराब झाला होता, पण गाडी असल्यामुळे विशेष जाणवलं नाही.
 |
मंदिराकडे जायचा रस्ता |
मुख्य कमानीतून आत शिरल्यावर एकदम सगळा नूरच पालटून गेला. सुरेख वळणावळणाचा चढाचा रस्ता, दोन्ही बाजूला नारळ, आंबा अशी हिरवीगार गर्द झाडे, आणि एका बाजूला छान असं छोटंसं तळं. वा, दिल खुश हो गया. "आंब्याच्या बागेत जाऊ नये, व झाडांना हात लावू नये, अन्यथा ५०० रुपये दंड आकारण्यात येईल" अश्या आंब्याच्या झाडावर लावलेल्या खास पुणेरी शैलीतल्या पाट्या पाहून मनोरंजन पण झाले. ती छोटीशी घाटी चढून वर पोचलो. उत्तम पार्किंगची सोय होती. अपंग व वयोवृद्ध लोकांसाठी व्हीलचेअर आणि मंदिरात जाण्यासाठी छोटीशी लिफ्ट याचीही सोय होती.
अरे हो, महत्वाचं सांगायचंच राहिलं, की हाडशीला नक्की आहे तरी काय. तर, तिथे एक विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, ज्याची प्रतिष्ठापना परमपूज्य सत्यसाईबाबा यांनी केली आहे. हे मंदिर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मेहुण्याने बांधले आहे, त्यांचं नाव श्री. जाधव. तसं २-३ वर्षांपूर्वीच मंदिर बांधून झालं होतं, पण सत्यसाई बाबांनीच मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करावी म्हणून २ वर्ष वाट पाहून मागच्या वर्षी कार्तिकी एकादशीला मंदिर खरया अर्थाने भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.
 |
विठ्ठल रखुमाई मंदिर, हाडशी |
सुंदर हसरा निसर्ग, चहूकडे हिरवीगार लॉन्स, २ पवनचक्क्या, कारंजी, त्यात व आजूबाजूच्या फुलांच्या ताटव्यात सोडलेले दिवे हे सगळं पाहून आपल्या येण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. आधी गणपती मंदिर आहे, तिथे श्री गणेशाचं दर्शन घेऊन आम्ही विठ्ठल मंदिरात गेलो. मंदिरात अतिशय शांतता आणि स्वच्छता आहे. सर्वत्र श्री. सत्यसाईबाबांची वचने, भजने आणि संदेश लिहिलेले फलक आहेत. काही फोटो आहेत उदघाटनाच्या कार्यक्रमाचे. सुंदर आखीव रेखीव अश्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत. आपले हात आपसूकच जोडले जातात या सगळ्या वातावरणाने भारुन. प्रसन्न वाटलं तिथे. तसंच मंदिराच्या खाली एक ध्यान मंदिर आहे, तिथे भजन, प्रवचन इ. चालू असतं. मंदिराच्या मागे थोडंसं चालत गेलं की एक महालासारखी वास्तू दिसते. ते सत्यसाईबाबांचे निवासस्थान आहे. आजूबाजूला खोल दरी आणि चित्र काढावं असं वाटेल इतकं छान दृश्य दिसतं.
 |
लॉन आणि विश्रांतीस्थळ |
 |
सत्यसाईबाबा निवासस्थान |
हे सगळं पाहिल्यावर मंत्रमुग्ध होऊन आणि देवाला नमस्कार करून सगळे खाली आलो. खाली एक कॅन्टीन आहे, जिथे पोहे, भेळ, भजी, चहा, कॉफी असे पदार्थ मिळतात. तिथे बसून पोहे, भेळ,कांदाभजी यावर ताव मारून गाडीत बसलो.
 |
प्रतीपंढरपूर, दुधिवरे |
आता जायचं होतं दुधिवरेला. वाटेत "तिकोणा" हा शिवाजी महाराजांचा किल्ला लागतो. अगदी किल्ल्याशेजारूनच रस्ता जातो. तिथेही एकदा जायला हवं. (असं करत करत या एकाच रस्त्यावरच्या ३ ठिकाणांची नोंद करून ठेवलेली आहे मी) दुधिवरेलाही विठ्ठल रखुमाई मंदिरच आहे. ते बाबामहाराज सातारकर यांनी स्थापन केलं आहे, पंढरपूर सारखंच मंदिर बांधलं आहे आणि मूर्तीही पंढरपूर सारख्याच आहेत. अगदी "प्रतीपंढरपूरच". छान, रेखीव अश्या काळ्या पत्थरामध्ये घडवलेल्या मूर्ती पाहिल्यावर अगदी भरून आलं. सगळे सात्विक भाव मनभर झाले, प्रसन्न वाटलं. तिथेही खाली मंत्र मंदिर आहे. समोर, श्री बाबामहाराज सातारकर यांचा संगमरवरी पुतळा आहे. आणि त्यासमोर मस्त विस्तीर्ण अशी बाग आहे.
इथे जवळपास खायला प्यायला काही मिळत नाही. :( त्यामुळे दर्शन झाल्यावर टंगळमंगळ न करता पुढच्या प्रवासाला निघालो.)
गेल्या काही दिवसांपासून "लवासा" वरच्या चर्चेला अगदी उत आला आहे ना? नेमका हाच विचार केला आम्ही पण. म्हणलं बघूया तरी नक्की हे प्रकरण आहे तरी काय ते. इतका वाद, चर्चा, कोर्टाच्या स्थगिती मुळे गाजणारं लवासा पहायची एक उत्सुकता निर्माण झाली होती. त्यामुळे आमची गाडी लवासा कडे वळली. पिरंगुट मधून लवासा कडे एक रस्ता जातो. पिरंगुट चा रस्ता बघितला तर फारसा चांगला नाही, पण लवासा कडे एकदा वळलं की चकाचक रस्ते. (बारामतीकरांची कृपा, दुसरं काय?)तसं अंतर ३२ कि.मी. आहे पिरंगुट पासून. १५ एक कि.मी. झाले की टेमघर धरण लागतं मुठा नदीवर. धरणाची भिंत एका हाताला ठेवून एक घाट आहे. त्या घाटातली वळणं म्हणजे काय सांगू महाराजा... इतकी तीव्र वळणं आहेत ना, की कधी कधी घाबरायला होतं. पण आजूबाजूचा निसर्ग, मस्त उंच डोंगर आणि मध्ये धरणाचं पाणी, हे सगळं पाहून भीती नाहीशी होते आणि तिची जागा लवासाबद्दलच्या उत्सुकतेने घेतली जाते.
 |
टेमघर जलाशय |
धरण मागे पडलं आणि कणीस, पेरू विकायला बसलेली माणसं दिसली. अशा ठिकाणी थांबून काहीतरी घेतलं जातंच. २ स्वीट कॉर्न आणि ३-४ पेरू घेऊन परत गाडीत बसलो. लवासाची प्रवेशद्वाराची कमान आता दिसायला लागली होती. एकदम लक्षात आलं की हीच कमान फ्रेम मध्ये ठेवून आय बी एन लोकमत चा तो (आगाऊ) निखील वागळे लोकांच्या कागाळ्या करत असतो. (त्याने फार वात आणलाय!! टिव्ही पाहत असताना तो Channel मधे आला, की मी पटकन पुढचा लावते) कमानीतून आत गेल्यावर एकदम सगळा चकचकीतपणा जाणवला. दर १०० मीटर वर दिव्याचे खांब, खालची दरी पाहायला सज्जे, एक बाजूला डोंगरावर मोठ्ठी फुलपाखरं, गोगलगाय, लेडी बर्ड यांचे छोटेखानी मॉडेल्स, आणि त्यात सोडलेले दिवे. एकदम छान वाटत होत. मध्ये मध्ये छोट्या छोट्या बागा, त्यामध्ये व्यवस्थित कचरापेट्या ठेवलेल्या (आपल्या लोकाना कागद, प्लास्टिकच्या पिशव्या कुठेही रस्त्यात टाकायची सवय आहे, हे गृहीत धरून केलेली सोय). चढण उतरायला लागलो, तशी छपरं दिसायला लागली. एक वळण घेतलं आणि सगळे टुमदार बंगले एकदम दृष्टीपथात आले. हेच ते गाजलेले काही करोडचे बंगले.


एक छानसं हॉटेल एका टेकडीवर दिसलं. नाव होतं एकांत. ज्याला कुणाला निसर्गाच्या सान्निध्यात एकटं राहून आत्मपरीक्षण करायचं असेल, त्यांच्यासाठी उत्तम जागा. (मला अजून तरी ती गरज नाहीये वाटलेली, म्हणून-) आम्ही खालच्या बाजूला दिसणाऱ्या पुलाकडे जायला निघालो. वाटेल एक टपरी सारखं काहीतरी दिसलं आणि भूक लागल्याची घंटा वाजली डोक्यात. पण जरा फिरून मग खायचं असा सर्वानुमते निर्णय झाला.
समोर एकदम छान दृश्य दिसत होतं. पाणी, त्यावरचा टुमदार पूल आणि पुलाच्या दोन बाजूला पंपिंग स्टेशन्स.
 |
लवासाला वेढणारे ७ डोंगर |
पुलावरून समोर सात डोंगर आणि एका बाजूला धरणाचे पाणी यामध्ये वसलेलं लवासा, दिसायला तरी छान दिसत होतं. तिथे अजून थोडेफार बांधकाम चालू आहे. सगळं काम पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे अजून फिनिश्ड वाटत नाही ते. थोडेफार फोटो काढले, एक चक्कर मारली, आणि खायला थांबलो. तिथे साधे साधे पदार्थ पण खूप महाग.. काय करणार, २-३ करोड च्या बंगल्यांच्या शहरात आलो होतो ना आम्ही, मग मोजले रुपडे. :(
परतीच्या प्रवासाला लागलो. येतानाचा उत्साह जाताना कमी झालेला असतोच. त्यामुळे सगळे शांत होते. मला मात्र एक कळत नव्हतं, एवढं छान शहर वसतंय, तर त्याला पर्यावरणवाद्यांचा एवढा कट्टर विरोध का? वृक्षतोड, डोंगर फोडणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धरणाच्या पाण्याचा वापर, यावरून वादंग उठणं साहजिक आहे. पण हे सगळं त्यांनी आधीच, म्हणजे जेव्हा हे काम सुरु झालं तेव्हाच करायला हवं होतं. जवळपास ९०% काम पूर्ण झाल्यावर, आता या इमारती पाडा, या म्हणण्याला काय अर्थ आहे? जो काही पर्यावरणाचा ऱ्हास व्हायचा तो तर आधीच झालाय ना, मग आता इमारती पडल्याने तो थोडाच भरून निघणार आहे?
कदाचित हा लवासावाल्यांचा पब्लिसिटी स्टंटही असू शकतो. कारण मी कुठेतरी ऐकलं, की लवासाच्या मार्केटिंग साठी जेवढा खर्च येणार होता त्याच्या १०% बजेटमध्येच इतकी जाहिरात झाली आहे आता, की लवासा पहायला येणारयांचा ओघ उत्सुकतेपोटी का होइना पण वाढतोच आहे. त्यामुळे, या शक्यतेला थोडासा तरी वाव आहेच. दुसरं असं की या प्रकरणात सगळ्या बड्या धेंडांचे हात अडकलेले असल्यामुळे, आपलं नागडेपण झाकण्यासाठी तेही उत्सुक असणारच. त्यामुळे बघूया आता ही मारामारी कुठेपर्यंत चालते ते.
असो, आमची ट्रीप तरी छान झाली. काय म्हणतात ते, ट्रीप अगदी "साठा उत्तरी सुफळ संपूर्ण" झाली... निसर्ग अगदी डोळे भरून पाहिला, देव देव केले, पुण्य गाठीला बांधले, आणि राजकारणामुळे प्रकाशझोतात आलेले लवासाही पाहिले. अजून काय हवं एका फटक्यात. नाही का? (तुम्हीही अशी एखादी ट्रिप करावी अणि मस्त भटकावं या उद्देशाने हो पोस्ट टाकलीय बरं का, तेव्हा जाउन आलात की सांगा मला)