वळीव

>> शुक्रवार, १० जून, २०२२

 आपण भर दुपारी टळटळीत उन्हात प्रवासाला निघालो आहोत आणि तो फारच कंटाळवाणा चालू आहे. 
खरं तर आता सगळ्यांना वळीवाच्या पावसाची आस लागली आहे, पण त्याच्या आगमनाचं काही म्हणल्या काही चिन्ह नाही. आणि अशात एखाद्या बोगद्यातून गाडी बाहेर येते आणि डोंगराच्या पल्याड एक अभूतपूर्व दृश्य दिसतं..
आग ओकणाऱ्या त्या महाशक्तिमान सूर्याला एका मोठ्याशा शामरंगी ढगाने चक्क झाकून टाकलंय. आणि छान शामल सावली सगळीकडे पडली आहे. हवा एकदम कुंद आणि थंड झाली आहे, पक्षी किलबिलाट करत आपापल्या घरट्याच्या ओढीने परतू लागले आहेत. मातीचा कण न कण त्या एका अमृत बिंदूची
 आसुसून वाट बघतो आहे, आणि अशातच उघड्या खिडकीतून एक चुकार थेंब आपल्या चेहऱ्यावर पडतो. काया थरारून उठते आणि नजर वेध घेऊ लागते त्या सरसरणाऱ्या थंडगार सरींची. निळ्या सावळ्या गार गार अनुभूतीची..
मनात एक कल्पना आकार घेऊ लागते, शब्द जुळू लागतात व एक अलवार रचना त्या टपटपणाऱ्या मोत्यांच्या लडीसम उलगडत जाते, काहीशी अशीच...


शाम सावळ्या मेघांत तू,
भ्रमराच्या गुंजारवात तू,
गोपालांच्या अलगुजात तू,
तुझेच सूर मनात आळवतो आहे।

ओलेत्या पानांत तू,
बरसणाऱ्या धारांत तू,
ओल्या मातीच्या गंधात तू,
भिजल्या रंध्रातून तुला अनुभवतो आहे।

सोसाट्याच्या वाऱ्यात तू,
कडाडणाऱ्या विजांत तू,
वर्षावणाऱ्या गारांत तू,
आठवणींचे कण कण वेचतो आहे।

असं वाटतं की एकदम झाकोळून यावं,
आणि पाऊस बरसून गेल्यावर
लख्ख उन्ह पडावं, 
त्या चमकत्या प्रकाशावर स्वार होऊन तुझ्यापाशी यावं
आणि मनातलं गुज अलगद तुझ्या मनी रुजवावं।

या मनीचे त्या मनाला
उमगेल सारे काही
निःशब्द तू अन निस्तब्ध मी,
एकरूप होऊन जावे।

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP