बालपण देगा देवा

>> शुक्रवार, २० ऑगस्ट, २०१०

 

  
"शेजारयाची बायको जास्त सुंदर वाटते "ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. शब्दश: जाऊ नका. :) त्याचा अर्थ आहे, जे आपल्याकडे नाही ते माणसाला हवं हवंस वाटतं (ती डोळे मिचकावणारी स्माइली काढायची आहे मला..कशी काढू...) तुम्हाला वाटेल, ही मुलगी वेडी तर नाही ना?, वर शीर्षक आहे बालपण वगैरे, आणि सुरुवात काय, तर शेजारयाची बायको? काळजी नसावी. म्हणूनच त्या म्हणीचा अर्थ पण लिहिला मी. आणि पुढे सांगणार पण आहे का लिहिलय ते. 

मी शाळेत असताना एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. विषय होता, "बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" 
मला हे "मुंगी साखरेचा रवा" म्हणजे काय ते तेव्हाही नव्हतं कळलं आणि अजूनही ते अज्ञान दूर झालेलं नाही. 
असो, अर्थातच तेव्हा ते भाषण माझ्या आजोबांनी मला लिहून दिलं होतं (आता जरा तरी लिहिता येतंय मला, तेव्हा काहीच अक्कल नव्हती)  आणि मी मस्त पैकी रट्टा मारला होता. पण त्यातला "बालपण देगा देवा" हा भाग मात्र तेव्हा कळला होता. लहानपण कसं छान असतं, मोठ्ठ झाल्यावर ती सगळी मजा नाहीशी होते अश्या अर्थाचं भाषण होतं ते. मला इतका राग आला होता ना तेव्हा. म्हणे लहानपण छान असतं...काहीतरीच.. उलट सगळे लोक उगीचच मागे लागायचे... पाढे म्हणून दाखव,  श्लोक म्हण, अभ्यास कर, मार्क कमी का पडले,  शाळेला उशीर का झाला, गृहपाठ का केला नाही...एक ना दोन, हजारो प्रश्न..   खेळायला जाऊ का असं म्हणलं तरी आईच्या कपाळावर सतराशे साठ आठ्या पडायच्या. तेव्हा वाटायचं, शी, काय वैताग आहे, लवकर मोठ्ठं व्हावं आणि पळून जावं इथून.
(हा राग तेव्हा लगेच मावळला , जेव्हा मला ह्या भाषणासाठी पहिलं बक्षिस मिळालं :) )   

आज या घडीला मात्र ती उक्ति पुरेपूर पटते आहे. जेव्हा रोज सकाळी लवकर उठून, स्वयंपाक करून, ९ ला ऑफिस मधे पोहोचावं लागतं, जेव्हा दमून भागून घरी परत आल्यावर देखील स्वयंपाकघर वाट पाहत असतं आणि जेव्हा तोच सगळा संसाराचा रामरगाडा अहोरात्र ओढून थकून जायला होतं, तेव्हा खरंच वाटतं, की का मोठ्ठे झालो आपण?  

अगदी शाळेत असताना फ़क्त अभ्यास करणे, आणि चांगले मार्क मिळवणे एवढच तर काम असतं. खाणे-पिणे, कपडे-लत्ते वगैरे पहायला आई-बाबा असतातच. खर्च करायचाय तर पैसा आपणच मिळवला पाहिजे ही चिंता ही नसते. ११ वी आणि १२ वी जरा धामधुमीत जातात, कारण चांगल्या कॉलेज ला प्रवेश हवा असेल तर आपणच सिंसियरली अभ्यास करतो. तेव्हाही तसे आपले लाडच होतात. "करुदे अभ्यास करतेय तर, उठवू नका तिला (कधी नव्हे ते बसलीय एका जागी - मनातल्या मनात )" असे म्हणत खायची डिश, चहा आपल्या हातात आणून  दिला जातो. 

कॉलेज मधे गेल्यावर आपल्यालाच शिंगे फुटतात, आणि पहिली २ वर्षे टाईमपास मधे जातात (माझी तरी गेली आहेत हा). मग मात्र  कॉलेज मधे campus recruitment साठी कंपन्या यायला लागल्या की धावपळ सुरु होते आणि तिथेच आपण या "Rat race" चे शिकार होतो. अपेक्षांचं ओझं पेलता पेलता, आपण कधी मोठ्ठे झालो, आणि ते रम्य बालपण मुठीतून वाळूच्या कणांसारखं कधी निसटून गेलं हे ही कळत नाही.

मग अचानक एका प्रसन्न सकाळी कुठेतरी वर्तमानपत्रात तीच ओळ दिसते, आणि मग आठवणींची पाने वाऱ्याच्या झुळकीसरशी आपोआप उलटत जातात. मग आठवते ती शाळा, ते भाषण, ते बक्षीस, आणि ते हरवलेलं बाल्य-जे आता आपल्याकडे नसतं व पुन्हा अनुभवावंस वाटतं (आठवा-शेजारयाची बायको वाली म्हण आणि तिचा वर लिहिलेला अर्थ)  आणि पुन्हा पुन्हा देवाला सांगावंस वाटतं, बालपण देगा देवा.....               

6 comments:

अनिकेत २० ऑगस्ट, २०१० रोजी ४:३० म.उ.  

छान लिहीलं आहे, पण कधी कधी असंही वाटतं की "बालपणीचाच काळ का सुखाचा?" ह्याबाबत मी एक पोस्ट फार आधी लिहीली होती, वेळ मिळाला तर जरुर वाच -

http://manatale.wordpress.com/2009/05/21/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/

अभिलाष मेहेन्दळे २७ ऑगस्ट, २०१० रोजी १०:२१ म.पू.  

आयला काय योगायोग आहे! मी अगदी याच्या उलटी पोस्ट लिहिली आहे. तुमचा पहिला परिच्छेद वाचून माझ्यावर पोस्ट चोरीचा आळं येतो की काय असं वाटलं. छान लिहिलं आहे.

bhaanasa २२ नोव्हेंबर, २०१० रोजी ७:४१ म.पू.  

आवडली ग पोस्ट. :)

मुक्तछंद २२ नोव्हेंबर, २०१० रोजी ९:५८ म.पू.  

@ भानस: धन्यवाद! :)
तुमचा ब्लॉग खूप छान आहे. नुकतीच फॉलो करायला लागले आहे.

aniket १४ जानेवारी, २०११ रोजी ९:१२ म.उ.  

लहानपणीच्या परिच्छेदामधे आज्जीचा उल्लेख नाही!! या Blogचा निशेध असो.

मुक्तछंद १७ जानेवारी, २०११ रोजी १०:४१ म.पू.  

@ andya: aji la kahi problem nahi tar tula ka re? :P

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP