कुरकुरीत..खुसखुशीत...

>> शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१२

आज कितीतरी दिवसांनी ब्लॉगकडे फिरकले आहे. मध्यंतरी काही ना काही कारणाने अजिबात वेळ होत नव्हता. कधी काम म्हणून, कधी कंटाळा आला म्हणून तर कधी नेटचा स्पीड चांगला नाही म्हणून.  पण आज मात्र अगदी ठरवून ब्लॉग उघडला. सहज आधीच्या पोस्ट्स चाळत होते आणि एकदम लक्षात आलं की गेल्या काही पोस्ट्स या खादंती वरच्याच आहेत. फूड ब्लॉग होत चाललाय की काय मुक्तछंद ?
असा विचार डोक्यात यायचं कारण म्हणजे आजही मी त्यासाठीच हा रस्ता चुकलेय :)


काल सहज काही रेसिपीज चाळत होते ज्यात फारसे तेलसदृश  घटक नसतील, ते पदार्थ पोषकही  असतील व  चवीलाही चांगले लागतील. आणि हो कमी वेळात पण होतील। ( हे म्हणजे  "आखूड शिंगी, बहुदुधी, कमी खाणारी आणि जास्त दूध देणारी गाय" मागण्यासारखंच झालं) पण  नशिबानं (आणि जगभरातल्या असंख्य अन्नपूर्णांच्या कृपेने) मला एक सोप्पी पाककृती सापडली  पण महाराष्ट्रीयन.. एकदा करून बघायची आणि त्याहून महत्वाचं म्हणजे खायची इच्छा झाल्यावर थांबायचं काही कारणच नाही.
ती काल  लगेच करून बघितली आणि आज इथे टाकायची म्हणून हा प्रपंच..

  बेक्ड खारी शंकरपाळी:


साहित्य :
१ १/२ कप कणीक
१/२ कप मैदा
१/२ कप तूप
१ टी स्पून मीठ
१/२ टी स्पून बेकिंग पावडर
१/२ टी स्पून ओवा
(आणि हो एक ओव्हन देखील :) )

कृती: 
१. कणीक , मैदा व बेकिंग पावडर एकत्र करून घ्या.
२. तूप  घट्ट  असेल  तर थोडेसे पातळ करून ते वरील पिठात घाला व हाताने चुरून पिठात व्यवस्थित
     मिसळून घ्या.
३.  त्यात मीठ व ओवा घाला आणि लागेल  तसे पाणी घालून गोळा मळून घ्या.
४. १५ ते २० मिनिटे तो  गोळा झाकून बाजूला ठेवा.
५. मधल्या काळात ओव्हन २०० डिग्री ला प्रीहीट करून घ्या (दोन्ही कॉईल चालू करून)
६. पिठाच्या पोळ्या लाटून कातण्याने कापून घ्या.
७.  ओव्हन च्या ट्रे मध्ये एक alluminium ची foil ठेवून तिला तेलाचा हात लावून घ्या व शंकरपाळ्या थोडे थोडे अंतर ठेवून त्यावर लावून घ्या.
८. ट्रे जाळीच्या मांडणी वर ठेवून १५ मिनिटे बेक करा. गार झाल्यावर या कुरकुरीत शंकरपाळ्या खायला काहीच नाही :)


Read more...

होळीच्या खूप खूप शुभेच्छा!

>> बुधवार, ७ मार्च, २०१२कुठल्यातरी सणाचं निमित्त साधल्याशिवाय मी काही चार ओळी लिहायचा प्रयत्न करत नाही. होळी हा माझा आवडता सण, कारण होळी आणि पुरणपोळीचं समीकरण डोक्यात अगदी पक्कं बसलेलं. आणि पुरणपोळी म्हणजे जीव की प्राण. त्यामुळे होळी दिवशी कविता सुचणार असं वाटत होतंच मला.आता हिला कविता म्हणणं म्हणजे विनोदच.पहा बरं ठीक ठाक जमलीय का ते-

शिशिराच्या पानगळीला,
निरोप द्यायची वेळ झाली!
वसंताच्या नव्या धुमार्यांना,
सवें घेऊन होळी आली!

घरोघरी दरवळले,
पुरणपोळीचे सुगंध!
टिमक्यांच्या नादामुळे,
वातावरण झाले धुंद!

दुष्ट प्रवृत्तींना आळा घालून,
होळीत त्यांचे दहन करू!
होलीकामातेची पूजा करून,
चैत्रमासाचे स्वागत करू!

नवनवीन रंगांनी भरो तुमचे आभाळ,
हीच मनी सदिच्छा!
सर्व मित्र मैत्रिणींना,
होळीच्या खूप खूप शुभेच्छा!

Read more...

पहिल्यांदाच...

>> मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०११कुठलाही सण जवळ यायला लागतो तसे त्याचे संकेत फेसबुक, जीमेल वर स्टेटस अपडेट्स च्या रुपात झळकायला लागतात. कुठला तरी सुविचार, मराठी गाण्याच्या ओळी, कविता अश्या विविध रुपात प्रत्येक जण आपला आनंद व्यक्त करत असतो. मी ही करते. दर वर्षी एखाद्या कवितेतल्या ओळी घ्यायच्या आणि लावायच्या स्टेटस मेसेज म्हणून, ही नेहमीची सवय. या वर्षी म्हणलं, बघू तरी आपल्याला चार ओळी तरी स्वत: करता येतात का ते.. आणि चक्क १० मि.त जमल्या पण. चार ओळी नाही तर चांगली ३ कडवी.. कशी झालीय माहित नाही, पण म्हणलं पहिलावहिला प्रयत्न आहे, छापून तरी बघू.. पहा तुम्हाला कशी वाटते ते..

धन पूजिता त्रयोदशीला,
उदंड लक्ष्मी व्यापाऱ्याला.
श्रीकृष्णाने वधिला हो,
नरकासुर तो चतुर्दशीला.

अवसेला लक्ष्मीचे पूजन करता,
मंगलमय हो परिसर झाला,
पाडवा येई वाजतगाजत,
साक्षी पती-पत्नी प्रेमाला.

भाऊ-बहिणीचे नाते हळवे,
सुखावून जाते भाऊबीजेला,
अशी दिवाळी साजरी होता,
सौख्य लाभे घराघराला..

-----केतकी Read more...

बटाट्याचा शिरा:

>> बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

शिरा म्हणलं की रव्याचा शिरा हे समीकरण आपल्या डोक्यात पक्कं बसलेलं असतं. पण मला मात्र बऱ्याचदा शिरा खाल्ला की जळजळतं.  अजून कशापासून वेगळ्या प्रकारचा शिरा बनवता येईल याचा शोध घेत असताना मला बटाट्याचा शिरा सापडला. रताळ्याचाही असाच करता येतो. नक्की करून पहा.

बटाट्याचा शिरा:
साहित्य:
१ उकडलेला बटाटा (मोठा)
१/४ वाटी साखर
१ मोठा चमचा तूप
१/२ चमचा वेलदोडा पावडर
बेदाणे, बदामाचे काप

कृती:
१. बटाटा सोलून कुस्करून घ्या.
२. कढईत तूप गरम करून घ्या, व त्यात बटाटा गुलाबी रंगावर परतून घ्या.
३. साखर व  वेलदोडा पूड घाला व २ मि. झाकण ठेवून मंद आंचेवर शिजू द्या.
४. वरून बदामाचे काप व बेदाणे घालून वाढा.Read more...

ताक साबुदाणा

श्रावण म्हणलं की उपासांची रेलचेल असते अगदी. आणि उपास म्हणलं की "आता काय बरं करावं खायला?" असा प्रश्न मनात येणं अगदी साहजिकच. मग रुचिरा उघडलं जातं, निरनिराळे कुकिंग शोज पहिले जातात, रेसिपीची पुस्तके चाळली जातात आणि बनतात नवनवे पदार्थ. अशीच एक साधी सोप्पी रेसिपी इथे देते आहे. खरं म्हणजे श्रावण संपून बरेच दिवस झाले, पण पोस्ट टाकता टाकता राहूनच गेली. तर ती गोड मानून घ्या.

ताक साबुदाणा:
साहित्य:
एक वाटी भिजवलेला साबुदाणा
१/२ वाटी ताक किंवा दही
२ चमचे तूप
जिरे, मीठ,साखर
बारीक चिरलेली कोथिंबीर
२ हिरव्या मिरच्या
२ चमचे दाण्याचे कूट

कृती:
१. साबुदाणा मीठ, साखर घालून सारखा करून घ्या.
२. एका पसरट भांड्यात तूप, जिरे,मिरच्या घालून फोडणी करून घ्या व त्यात साबुदाणा घाला.
३. त्यात ताक/दही घालून मंद आंचेवर झाकण ठेवून २-३ मि. शिजू द्या.
४. घट्ट झाले असल्यास त्यात आवडीप्रमाणे थोडेसे ताक घाला व दाण्याचे कूट घाला व अजून २ मि. शिजू द्या.
४. वरून कोथिंबीर घालून गरम गरम खा. 
Read more...

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP