कुरकुरीत..खुसखुशीत...

>> शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१२

आज कितीतरी दिवसांनी ब्लॉगकडे फिरकले आहे. मध्यंतरी काही ना काही कारणाने अजिबात वेळ होत नव्हता. कधी काम म्हणून, कधी कंटाळा आला म्हणून तर कधी नेटचा स्पीड चांगला नाही म्हणून.  पण आज मात्र अगदी ठरवून ब्लॉग उघडला. सहज आधीच्या पोस्ट्स चाळत होते आणि एकदम लक्षात आलं की गेल्या काही पोस्ट्स या खादंती वरच्याच आहेत. फूड ब्लॉग होत चाललाय की काय मुक्तछंद ?
असा विचार डोक्यात यायचं कारण म्हणजे आजही मी त्यासाठीच हा रस्ता चुकलेय :)


काल सहज काही रेसिपीज चाळत होते ज्यात फारसे तेलसदृश  घटक नसतील, ते पदार्थ पोषकही  असतील व  चवीलाही चांगले लागतील. आणि हो कमी वेळात पण होतील। ( हे म्हणजे  "आखूड शिंगी, बहुदुधी, कमी खाणारी आणि जास्त दूध देणारी गाय" मागण्यासारखंच झालं) पण  नशिबानं (आणि जगभरातल्या असंख्य अन्नपूर्णांच्या कृपेने) मला एक सोप्पी पाककृती सापडली  पण महाराष्ट्रीयन.. एकदा करून बघायची आणि त्याहून महत्वाचं म्हणजे खायची इच्छा झाल्यावर थांबायचं काही कारणच नाही.
ती काल  लगेच करून बघितली आणि आज इथे टाकायची म्हणून हा प्रपंच..

  बेक्ड खारी शंकरपाळी:


साहित्य :
१ १/२ कप कणीक
१/२ कप मैदा
१/२ कप तूप
१ टी स्पून मीठ
१/२ टी स्पून बेकिंग पावडर
१/२ टी स्पून ओवा
(आणि हो एक ओव्हन देखील :) )

कृती: 
१. कणीक , मैदा व बेकिंग पावडर एकत्र करून घ्या.
२. तूप  घट्ट  असेल  तर थोडेसे पातळ करून ते वरील पिठात घाला व हाताने चुरून पिठात व्यवस्थित
     मिसळून घ्या.
३.  त्यात मीठ व ओवा घाला आणि लागेल  तसे पाणी घालून गोळा मळून घ्या.
४. १५ ते २० मिनिटे तो  गोळा झाकून बाजूला ठेवा.
५. मधल्या काळात ओव्हन २०० डिग्री ला प्रीहीट करून घ्या (दोन्ही कॉईल चालू करून)
६. पिठाच्या पोळ्या लाटून कातण्याने कापून घ्या.
७.  ओव्हन च्या ट्रे मध्ये एक alluminium ची foil ठेवून तिला तेलाचा हात लावून घ्या व शंकरपाळ्या थोडे थोडे अंतर ठेवून त्यावर लावून घ्या.
८. ट्रे जाळीच्या मांडणी वर ठेवून १५ मिनिटे बेक करा. गार झाल्यावर या कुरकुरीत शंकरपाळ्या खायला काहीच नाही :)


  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP