अकस्मात होणार होऊनी जाते..

>> बुधवार, १८ मे, २०११


अचानक, नकळत, अकस्मात या शब्दांना आपल्या सारख्या पामरांच्या लेखी किती महत्व आहे, हे वेळ आल्याशिवाय कळत नाही हेच खरे..

काल बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे आम्हाला सुट्टी होती. त्यात मंगळवार म्हणजे आठवड्याचा मधला वार.. अश्या दिवशी सुट्टी मिळाल्याचा आनंद वेगळाच.. सकाळी नेहमीसारखी उठले तेव्हाच ठरवलं होतं की आज सगळी पेंडिंग कामं संपवून टाकायची. आराम करायचा. बाहेर खायचं. त्यामुळे खुशीत होते. पण... देव पण असा आहे ना, एखाद्याला सुखी करतो तेव्हा दुसऱ्या एखाद्यावर त्याने दुखा:चे डोंगर कोसळवायचं ठरवलेलं असतं.

मला कुठे माहित होतं की आजचा दिवस माझ्यासाठी कसा ठरणार आहे ते. सकाळी सगळं आवरून बाहेर पडले ठरवलेली कामं उरकायला, आणि इतक्यात फोन वाजला. मी गाडी चालवताना शक्यतो फोन घेत नाही, पण काल का कुणास ठाऊक घ्यावासा वाटला.
फोनवर नाव होतं माझ्या कंपनीतल्या मैत्रिणीचं. "आज, सुट्टीदिवशी का बरं आला असेल हिचा फोन"  असा विचार करताच फोन घेतला, आणि तिनं सांगितलेल्या बातमीनं अक्षरश: सुन्न झाले. डोकं पूर्ण बधीर.. काय सांगतेय तेच कळेना झालं मला.
"सुंदराजन सर एक्स्पायर झाले?" काय बोलतेय ही.. मी जोरात किंचाळले "काय?
अगं शुक्रवारी तर दिसले होते मला, हसले पण माझ्याकडे बघून, आणि तू काय सांगतेस ते गेले म्हणून..."
तिचीही तीच अवस्था होती, तेवढ्या त्या ५ मिनिटात ३ जणींचे मला फोन आले, पण कुणाचाच नीट विश्वास बसत नव्हता यावर..दुर्दैवानं बातमी खरी होती.

"डॉ. व्ही. सुंदराजन"  आमच्या कंपनीतले एक प्रसिध्द व्यक्तिमत्व. शांत, मितभाषी, सर्वांशी प्रेमाने वागणारे, आपला समोरच्याशी काहीही संबंध नसला, तरी तितक्याच आपुलकीने त्याला हवी ती मदत करणारे, एखाद्या बाबतीत योग्य ती दिशा दाखवणारे, सर्वांचे हितचिंतक आणि "Human resource" टीम सर्वेसर्वा असे सुंदराजन सर आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच कशीतरी वाटली. कितीतरी PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत. MS करणाऱ्या लोकांचे "प्रोजेक्ट गाईड" म्हणून By Default  सरांचं नाव पुढे येत असे. हे सगळे लोक काय करतील आता? ते ज्या टीमचे प्रमुख होते, त्या सर्वाना ती रिकामी खुर्ची बघून काय वाटेल रोज?

माझा त्यांच्याशी प्रत्यक्ष असा संबंध नव्हता, म्हणजे मी त्यांच्या बरोबर कुठल्याही प्रोजेक्ट मध्ये काम करत नव्हते, की ते माझे गाईड पण नव्हते. पण कुठलीही गोष्ट बरोबर होत नाहीये आपल्या बाबतीत, असं जरा जरी वाटलं की त्यांच्याकडे धाव घ्यायचो आम्ही. आणि तेही काहीतरी सल्ला, एखादा उपाय, किंवा वरच्या लोकांशी बोलून काहीतरी करण्याचं आश्वासन दिल्याशिवाय कधीच विन्मुख पाठवायचे नाहीत कुणालाच. HR चेच प्रमुख असल्यामुळे आम्ही त्यांना कधीही कुठेही गाठायचो, पण ते न चिडता, न वैतागता, हसऱ्या चेहेऱ्याने आम्हाला उत्तर द्यायचे.
आता कुणाकडे जायचं आम्ही?

ते मूळचे चेन्नईचे. पण बऱ्याच वर्षांपासून पुण्यात स्थायिक झालेले. घरी पत्नी, आणि २ मुले. मोठी मुलगी १२ वीत आणि मुलगा १० वीत. पहिल्यांदा त्यांचेच चेहेरे आले डोळ्यासमोर. काय अवस्था झाली असेल त्यांची..

सकाळी ८. किती प्रसन्न वेळ. दिवसाची सुरुवात. अश्या वेळी देवाला एखाद्याच्या आयुष्याचा शेवट करावा असं का वाटलं असेल? बास.. छातीत एक जोरदार कळ, आणि रुग्णवाहिका बोलावेपर्यंत खेळ खलास?? कुठलीही हृदयरोगाची तक्रार नसणाऱ्या, नियमित योगा करून स्वत:ला तंदुरुस्त ठेवणाऱ्या, नेमाने पूजा अर्चा करणाऱ्या आणि कुणाचं कधी वाईट न चिंतणाऱ्या या माणसाबद्दल देवानं असा न्याय करावा?

आपल्या आसपास कितीतरी वाईट कृत्य करणारे, दुसऱ्याला पाण्यात पाहणारे, स्वत:च्या सख्या नातेवाईकांशी सावत्र वागणूक करणारे आणि सर्रास खून, दरोडे पडणारे दुरात्मे असताना एका चांगल्या माणसाला जेव्हा असा मृत्यू येतो, तेव्हा देवावर तरी कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न पडतो.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, आणि त्यांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करून त्यातून लवकर बाहेर पडून कणखर बनण्याची शक्ती देवो, हीच त्या परमात्म्याकडे प्रार्थना...

पण एक मात्र खरं, आम्हाला तुमची खूप आठवण येत राहील सर.... 

 
 

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP