गो गोवा..भाग ३

>> शुक्रवार, १५ एप्रिल, २०११

भाग १ इथे वाचा..
सकाळी आम्हाला ३ नवीन भिडू जॉईन होणार होते, माझ्या २ नणंदा आणि एक दीर. त्यांना ६ वाजता मडगाव स्टेशन वर आणायला गेलो. समुद्रकिनाऱ्यावरच्या गावात पहाटे पण हवा गरमच असते. भयंकर उकडत होतं. त्या तिघांना घेऊन परत हॉटेलवर आलो. आता कुणी झोपणं शक्यच नव्हतं. चहा कॉफी झाली. आणि लगेच बीच वर जायचं ठरलं. ७ च वाजले होते. आणि अजिबात गर्दी दिसत नव्हती. कॅमेरे सज्ज करून बीच वर गेलो. गेल्या गेल्याच स्टार फिश आणि उलटे पडलेले खेकडे दिसले किनाऱ्यावर. स्टार फिश मी पहिल्यांदाच पाहात होते, म्हणजे पुस्तकात पाहिलंय पण प्रत्यक्षात पहिल्यांदाच. त्यामुळे फोटो काढणं ओघानं आलंच. 
 तिथेच चप्पल काढून आम्ही शिरलो पाण्यात. अहाहा. कितीही वेळा समुद्रात खेळलं तरी प्रत्येक वेळी मस्तच वाटतं. खूप खेळलो, खूप फोटो काढले.
साधारण ९ वाजता, "वॉटर स्पोर्ट्स" वाले लोक यायला लागले. आम्हाला स्पीडबोट राईड करायचीच होती. पहिल्यांदा जे दोघेजण गेले, त्यांचा अनुभव ऐकल्यावर थोडीशी भीती वाटली, पण उत्सुकताही वाढली. मी आणि माझी नणंद बसलो. आणि पहिल्याच लाटेवर ती बोट जी काही उचलली गेली की बस.. तिथून खाली आलो तर दुसरी लाट खूप मोठी आली. तोंडावर आपटली सप्पकन.. आम्ही किंचाळायला लागलो. त्यानंतर त्या चालवणाऱ्याने बोट एकदम शार्प टर्न घेऊन वळवली. बापरे. कसलं टेन्शन आलं माहितीय.. त्यात मला पोहायला पण येत नाही. जाम टरकले होते. आम्ही घाबरलोय हे समजल्यावर त्या माणसाला चेव आला, त्याने अजून २-३ वेळा वळवली. आणि शेवटी किनार्याला आणली. उतरले तरी पाण्यात हलतोय आपण, असं वाटत होतं कितीतरी वेळ. पण झक्कास अनुभव होता तो. उतरल्यावर वाटलं का घाबरलो आपण एवढं..
बांगडा 

तितक्यात काही कोळी जाळ्यात मासे घेऊन येताना दिसले. पाण्यात धुण्यासाठी. आणि दिल चाहता हैं मधला अमीर खान चा सीन आठवला. तोंडात मासा टाकण्याचा. फोटो साठी तसं करून बघायला काय हरकत आहे, म्हणून त्याला विचारलं, तर एका फोटोसाठी ५० रुपये म्हणाला. बेत कॅन्सल... अहो अजून थोडे पैसे घातले की खायला मिळेल मासा...
 
पॅराग्लायडींग पण करायचं होतं, पण ते लोक अजून आलेच नव्हते. आणि आम्हाला बीच वर येऊन जवळजवळ ४ तास झाले होते. अजून बरंच काही पाहायचं होतं गोव्यात. त्यामुळे आटोपतं घेतलं. हॉटेल वर गेलो, तर स्विमिंग पूल मध्ये काही लोक पोहत होते. आता एवीतेवी ओले झालोच आहोत, तर तिथेही डुंबू, म्हणून त्यात उतरलो. आमचं ८ जणांचं टोळकं उतरलेलं बघून, जे काही ३-४ फॉरेनर्स होते पूल मध्ये, सगळे पळाले. पोहायला येणारे मस्त पोहत होते, मी आपली कडेकडेने चालत होते पाण्यात. ५ फुटात बाकीचे कसे काय पोहत होते काय माहित. जरा अर्धा तास पोहलो असू, तेवढ्यात मॅनेजर सांगत आला, स्विमिंग सूट शिवाय पोहू नका म्हणून. आलो सगळ्याजणी बाहेर. तशीही वेळ झालीच होती आवरायची. आणि हॉटेलचा काँप्लिमेंटरी ब्रेकफास्ट पण चुकवायचा नव्हता. त्यामुळे सगळेच बाहेर आले. अंघोळी वगैरे करून उप्पीट, टोस्ट बटर जॅम, ऑम्लेट, चहा यावर ताव मारला आणि गोवा भटकायला बाहेर पडलो.

आधी देवदर्शन करून मग आम्ही बीच पाहणार होतो. आधी शांतादुर्गा मंदिरात गेलो. 
शांतादुर्गा, मंगेशी  
गोव्यातल्या मंदिरांचं एक वैशिष्ठ्य आहे, ते म्हणजे प्रत्येक देवळासमोरचं छान बांधीव तळं. शांतादुर्गा मंदिरासमोरचं तळं अतिशय स्वच्छ आहे. मंदिरही खूप सुंदर आहे. दीपमाळ, प्रमुख मंदिर आणि आजूबाजूची छोटी मंदिरं मिळून मंदिराचा परिसर बनलेला आहे. मूर्तीही अतिशय तेजस्वी. देवीला नमस्कार करून आम्ही बाहेर आलो. त्या ठिकाणी फोटो काढण्याचा मोह होणार नाही, असं होऊच शकत नाही.
 
तिथून मंगेशी मंदिरात गेलो. पार्किंग पासून मंदिरात जाण्यासाठी थोडं चालावं लागतं. पण हे चालणं आजूबाजूला असलेल्या छोट्या दुकानांमुळे लक्षातपण आलं नाही. खास गोवा ज्वेलरी विकणाऱ्या त्या दुकानात चुटपूट खरेदी तर झालीच. काचेची कानातली, खड्यांच्या माळा, ब्रेसलेट्स इ. खरेदी करत करत आम्ही मंदिरात कधी पोचलो कळलंच नाही. हे ही देऊळ खूप छान आहे. दर्शन घेऊन इथेही थोडे फोटो काढले.

आता सगळ्यांना भूक लागली होती. (प्रत्येक मंदिरात जाण्यासाठी चालायचे कष्ट झाले होते न सगळ्यांना.) आमच्यापैकी आधी गोव्याला जाऊन आलेल्यांनी मिरामार बीच जवळचं "मिरामार रेसिडन्सी" हे हॉटेल सुचवल्यामुळे, आम्ही मिरामार बीच कडे वळलो. इथे परत फिश फ्राय, गोवन करी झालीच. जेवण झाल्यावर मिरामार बीच कडे जाणार इतक्यात कोणीतरी म्हणलं, उन्ह खूप आहे, आपण बीच स्किप करू, बीच सारखा तर बीच.. :) आधीच सगळे फार उत्साहात, त्यामुळे बीच कडे वळलेली पाउलं लगेच मागे वळली. मग गेलो कलंगुट बीचला. पण तिथे एवढी भाऊगर्दी होती, की बस.. पाण्याकडे जायची सुद्धा इच्छा झाली नाही. बागा बीच लाही तेच.. फक्त बरोबरच्या लग्नाळलेल्या मंडळींना हिरवा (आणि गोरा पण) निसर्ग तेवढा पाहायला मिळाला इथे. . ६ वाजत आलेलेच होते, त्यामुळे गेलो परत हॉटेल वर. "बॅसिलिका ऑफ बॉम जिझस" हे चर्च पाहायचं होतं मला, कारण इथे सेंट झेविअर चे अवशेष जपून ठेवलेले आहेत. या चर्चचं बांधकाम जुन्या काळातल्या बरोक शैलीचं आहे. तसंच दोनापाउला बीच वरही जायचं होतं, पण बाकीच्यांना काहीच इंटरेस्ट नसल्यामुळे तिथे गेलो नाही. नेक्स्ट टाईम..

रात्री त्या अन्टोनिओच्या शॅकवर जायचं ठरलं होतंच. पण हॉटेलचं मागचं दार बंद झालेलं होतं, त्यामुळे हॉटेलपासून साधारण ५००मि. वर असलेल्या एका खोपच्यातून आम्ही किनाऱ्यावर उतरलो. रात्रीच्या वेळी मिट्ट अंधारात सांडलेल्या चांदणचुऱ्यात चालताना मस्त वाटत होतं. अधून मधून विजा होत होत्या. आम्ही त्या शॅकवर पोचलो आणि तिथला फ्युज गेला. म्हणलं ठीकाय, कॅण्डल लाईट मध्ये डिनर करू आज. ऑर्डर वगैरे दिली. आता बारीक पाउस चालू झाला होता. बीच वरच्या वाळूतल्या टेबलांवर बसलेले  फॉरेनर्स पळत आत आले. माझ्या डोक्यात चक्र सुरु झालं की आता हॉटेल वर भिजत जायला लागणार. सगळ्यांनी वेड्यात काढलं मला, शांतपणे जेवायचं सोडून कसले विचार करत बसतेस म्हणून. पण समुद्रकाठच्या पावसाबद्दल ऐकून होते मी. बघता बघता भयानक रूप धारण करतो हा पाउस. आणि तसंच झालं. आमच्या ऑर्डर मधलं सूप यायच्या आधीच धुवांधार पावसाला सुरुवात झाली. जोराचा वारा सुटला. इतका की मला वाटल आता शॅकवरचं छप्पर जातंय उडून. मेणबत्त्या विझून गेल्या होत्या कधीच.लाईट चा पत्ता नाही. विजा कडाडायला लागल्या. माझा २ वर्षाचा भाचा घाबरला त्या आवाजाने, तो रडायला लागला. खूप थंडी वाजायला लागली. दूर कुठेतरी वीज पण पडली असावी, कारण खूप जोरात आवाज येत होते अधून मधून. ते यडे  फॉरेनर्स मात्र खुशीत होते, कधी पाउस न बघितल्यासारखे टाळ्या बिळ्या देत सुटले होते. इकडे भाच्याचा सूर चढायला लागला होता. शेवटी ऑर्डर कॅन्सल करून हॉटेलवर जायचं ठरवलं. पण जाणार कसं. दार तर बंद. आमच्यातल्या दोघांनी कसंबसं पळत जाऊन वॉचमनला बोलावून विचारलं दार उघडण्याबद्दल, तो तयारच नाही. शेवटी कशीतरी समजूत घालून, मॅनेजरला मस्का लावून ते दार उघडलं आणि आम्ही जे काही धूम पळालो की सांगता सोय नाही. हा अनुभव मात्र कधीही न घेतलेला होता. खोलीत पोचल्यावर हुश्श झालं अगदी. काहीतरी नूडल्स वगैरे मागवले खोलीतच आणि खाऊन झोपून टाकलं.

दुसरे दिवशी निघायचं होतं परतीच्या प्रवासाला. ३ दिवस खूप मजा झाली होती आणि परत बॅक टू रुटीन जायला खूप कंटाळा आला होता. पण काम कुणाला चुकलंय का..
निघताना मात्र मनात म्हणावंसं वाटलं , मी परत येईन तुझ्या भेटीला, नव्या उत्साहाने.. तोपर्यंत "I miss you Goa..."    

Read more...

गो गोवा..भाग २

भाग १ इथे वाचा                                                                                                    

प्रवासाने तशी दमणूक झाली होती. त्यामुळे लगेच त्याच दिवशी पाण्यात खेळायचा विचार नव्हताच. पण चौपाटीची मजा मात्र आम्ही घेणार होतो. आमच्या हॉटेलच्या मागे बीच वर जाण्यासाठी एक दार होते, आणि ते सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंतच उघडे असणार होते. आम्ही पावणे सातला तयार असल्यामुळे  त्या दारातून थेट किनाऱ्यावर गेलो. थोडासा अंधार पडायला सुरुवात झाली होती. फारसे पाण्यात न जाता "बीच वॉक" घेऊ असा विचार करून पावले बुडतील अश्या पाण्यातून रमत गमत चालत होतो. आमच्या हॉटेल च्या मागेच काही "शॅक" होते.
शॅक म्हणजे समुद्र किनार्यावर जमिनीपासून ३-४ फुटावर उभारलेला स्टेज सारखा एक "Platform". त्याला उंच बांबूचा आधार देऊन वर कुडाचं किंवा झापांचं छप्पर असतं. एखाद्या मोठ्या झोपडीसारखं. किनार्यावरचं गोवन हॉटेल.
संधीप्रकाशात समुद्राच्या लाटा समोरच्या किनाऱ्यावर आपटताना पाहात,  किंवा रात्री कॅण्डल लाईट मध्ये मस्त जेवण घेताना या शॅक मध्ये एकदम वेगळा फील येतो.

तर यापैकी अन्टोनिओ च्या  शॅक वर जाऊन खास गोवन फिश करी, रोटी आणि सोबतीला थंडगार बियर प्यायचा आमच्या बरोबरच्या मंडळींचा विचार होता. तशी चौकशी तिकडे करून आम्ही वाळूतून चालत चालत चौपाटीवर गेलो. महेंद्रकाकांच्या  ब्लॉगवर त्यांच्या गोवा ट्रीप बद्दल वाचलं होतं. कोलवा बीच वरच्या "चिकन शवारमा" चं त्यांनी केलेलं वर्णन आणि स्तुती वाचून ते खाणे हे एक प्रमुख आकर्षण होतं माझ्यासाठी. (वाचा इथे.. चिकन शवारमा) बरोबरच्या सगळ्या मांसाहारी पब्लिकला पण मी केलेल्या वर्णनामुळे फारच उत्सुकता लागली होती ते खायची.
त्यामुळे सगळ्यांची पावलं पटापट पडत होती. बीच वर पोचलो, पण ती गाडी काही कुठे दिसेना.  अंधार पण झाला होता बराच. पण जरा शोधल्यावर एका छोट्या पुलाच्या ( पूल म्हणजे बागेत वगैरे ओढा ओलांडण्यासाठी छोटासा अर्धवर्तुळाकार पूल असतो ना तसा.)  पलीकडे ती गाडी दिसली एकदाची. हुश्श!!!

त्याचा लुक, वास, आणि बनवण्याची पद्धत इतकी झकास होती की सगळ्यांनी २-२ तरी खाल्ले असतील. उद्या पुन्हा संध्याकाळी यायचं असं लगेच ठरवून टाकलं मंडळींनी.
समुद्रकिनार्यावर मिळणारं "बुढढी के बाल" मला प्रचंड आवडतं. आजकाल रस्तोरस्ती काठीला लटकावून फेरीवाले विकतात ते, पण बीच वर खाण्यात वेगळी मजा आहे. त्या खारट हवेत गोडमिट्ट कापूस खायला भारी वाटतं अगदी. तो माणूस दिसल्यावर मोर्चा तिकडे वळला. मी ते खाणार हे कळल्यावर बरोबरच्या माझ्याहून १-२ वर्षांनीच मोठ्या असलेल्या लोकांनी "लहान मुलांसारखं काय करतेय?" अशा प्रतिक्रिया लगेच व्यक्त केल्या.(अहो पुण्याचे ते, बोलण्यात ऐकणार नाहीत, आणि बोलायचं थांबणार नाहीत) पण माझ्या तोंडाकडे बघत बसण्यापेक्षा त्यांनीही ते एन्जॉय केलं नंतर.

हे होतंय तोवर कुणाला तरी "गरम कुत्ता" (हॉट डॉग) ची पाटी दिसली. तिथे धडक मारून झाली. मी "चिकन हॉट डॉग विथ मेक्सिकन साल्सा आणि मस्टर्ड सॉस" घेतला  पण फारसा आवडला नाही तो प्रकार. बरा होता.

आता एवढ हाणल्यावर कुणाला जेवायचा विचार मनात येऊ शकेल का? पण नाही, आता काय जेवायचं ही चर्चा सुरु झाली. तिथेच "सबवे" होतं, पण नुसत्या रोल ने कसं काय पोट भरेल म्हणून सगळा मोर्चा आम्ही राहिलेल्या हॉटेल कडे वळला. या हॉटेल मध्ये राहायची सोय ठीकठाक आहे, पण जेवणाच्या नावाने नुसता शंख आहे.. मेनुकार्ड वर विशेष डिशच नाहीयेत. काहीतरी सटरफटर मागवलं. गोव्यात येणारयाला मुख्य आकर्षण असतं ते मासे आणि दारू. पैकी, मी मासे खाते. पण फार आवडीने नाही. पण बरोबरच्या मंडळींना खाणे आणि पिणे या दोन्हीत इंटरेस्ट होता. (बिचारा माझा नवरा. तो पक्का शाकाहारी आहे. ३ दिवस चायनीज वरच होता तो.) इथे मी पहिल्यांदा अल्कोहोलिक पेय प्यायले. फार नाही, ब्रीझर घेतली थोडीशी. बरी होती चव. लोकांना दारूची चव कशी काय आवडते देव जाणे. झेंडेवालं हॉटेल असल्यामुळे जेवण अर्थातच महाग होतं. त्या ब्रीझर मुळे  मला फार झोप यायला लागली होती, त्यामुळे मी फक्त डेझर्ट खाल्लं, कॅरामल पुडिंग, आपल्या गुडलक मध्ये मिळतं तेच. पण किंमत दुप्पट. चालायचंच. स्थलमहात्म्य!!  जेवणं झाल्यावर दुसरे दिवशी सकाळी समुद्रात खेळायला जायचा बेत पक्का करून आम्ही आपापल्या खोल्यात गेलो. समुद्राच्या वाळूत चालणं अवघड असतं. त्यात ११ तास प्रवास झालेला. त्यामुळे आणि वाळूत पाय ओढत चालून चालून पायाचा पार बुकणा पडला होता. कधी झोपलो कळलंच नाही. 
                                                                                                                                          भाग ३ 

Read more...

गो गोवा.. भाग १..

>> बुधवार, १३ एप्रिल, २०११

रोजचंच काम, तेच ते रुटीन आणि बरेच दिवसात कुठेही टवाळक्या करायला न गेल्यामुळे आलेला कंटाळा.. या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग.. तो म्हणजे २-३ दिवस कुठेतरी भटकंती करून येणे. माझ्यासारखे बरेच जण होते जे जाम पकले होते त्याच त्या दिनक्रमाला. काय करावं असा विचार करता करता शेवटी, "एक ट्रीप काढू" हा विचार पक्का झाला आणि ट्रीपची ठिकाणं एकेकाच्या सुपीक मेंदूतून बाहेर यायला लागली. आम्ही ७-८ जण होतो, आणि सगळ्यांनी त्यांच्या लहानपणी कधीतरी गोवा पाहिलेलं होतं, त्यामुळे गोवा फायनल केलं. ९-१०-११ एप्रिल चा विकेंड ठरला. 

९ एप्रिल, शनिवार.. सकाळी ६ वाजता "बाप्पा मोरया" करून आम्ही "पुणे टू गोवा" या आमच्या सफरीला आरंभ केला. आमच्या ग्रुप मध्ये माझ्या नणंदेचा २ वर्षाचा मुलगा होता. त्यामुळे  मस्त टाईमपास होता सगळ्यांना. त्याच्याशी बडबड करत आणि त्याच्या बोबड्या बोलण्याचे अर्थ काढत आमचा प्रवास सुरु झाला.
आमच्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे प्रवास सुरु करून एखाद-दोन तास झाले की सगळ्यांना तहान, भूक लागायला सुरुवात होते. त्यामुळे आम्ही जेमतेम खंबाटकी घाट उतरलो असू, इतक्यात माझ्या दिराला तहान लागली.. नवऱ्याला भुकेची जाणीव झाली तर कुणाला मळमळायला लागलं. २ तास एका जागी बसल्यामुळे आपल्याला वाळवी लागेल की काय ही भीती वाटत असावी बहुतेक . तसंच सगळ्यांना दामटून बसवून शेवटी साताऱ्याजवळच्या "अतीत" या गावातल्या बस स्थानकावर गाडी थांबवली. या अतीत स्थानकावर वडापाव फार छान मिळतो. पुणे-सांगली विनाथांबा एशियाड ने जाताना बस इथेच फक्त थांबते. त्यामुळे आम्हाला इथल्या वडापावाची ख्याती माहीत आहेच. इथला वडापाव न खाता पुढे गेलो तर त्या कॅन्टीनवाल्याला किती वाईट वाटेल असा विचार करून आम्ही सगळ्यांनी फक्त वडापावच नाही तर तिथे तयार असणाऱ्या सर्व नाश्ता आयटम्स वर ताव मारला. उदा. उप्पीट, पोहे, भजी, इडली, शिरा इ इ. मग चहा झाला. निसर्गाच्या हाकेला "ओ" देऊन झाली. आणि अर्धा पाऊण तास खाण्यापिण्यात गेल्यावर आम्ही सगळे परत गाडीत बसलो. 

गोव्याला जायला २ मार्ग आहेत, एक कोल्हापूर-गगनबावडा मार्गे तर दुसरा आंबोली मार्गे. आंबोली मार्गे गेलं तर मधेच थोडासा कर्नाटकाचा भाग येतो. आणि त्या ५० किमी साठी इन-आउट चेकिंग आणि एन्ट्री टोल भरायचे उपद्व्याप करावे लागतात. म्हणून आम्ही "महाराष्ट्र देशा"तूनच जायचं ठरवलं. कोल्हापूर पास करून गगनबावड्याच्या मार्गाला लागलो. गगनबावडा जंगल शिकारीसाठी प्रसिध्द आहे. तिथे वाघ, तरस, रानडुक्कर असे जंगली प्राणी खूप आहेत. गगनबावड्याला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणतात इतका पाउस पडतो तिथे. पावसाळ्यात ५ फुटावरचं सुद्धा दिसत नाही. घाटाचा रस्ता अगदी व्यवस्थित आहे पण वळणं मात्र अवघड आहेत. हा घाट उतरला की लगेच कोकण सुरु होतं. आम्हा सगळ्यांनाच हा रस्ता नवीन होता, त्यामुळे सगळे एकदम शांत बसून निरीक्षण करत होतो. अचानक आमच्यातल्या ज्यूनिअरला काहीतरी दिसलं आणि त्याचं "प्पा प्पा" सुरु झालं. त्याला माकडांची मोठ्ठी टोळी दिसली होती. (प्पा = हुप्प्या, समजून घ्यायचं आपणच) मग त्याला त्याचे (म्हणजे सगळ्यांचेच) पूर्वज दाखवण्यासाठी आम्ही थांबलो. समोर सह्याद्रीच्या मस्त रांगा दिसत होत्या त्यामुळे खास गोवा ट्रीप साठी घेतलेल्या कॅमेरयाचं उदघाटन मी तो देखावा टिपून केलं.

त्या माकडांच्या टोळीमध्ये एक लेकुरवाळी माकडीण होती. ती कठड्यावर मस्त पोज देऊन बसली होती पिल्लाला कुशीत घेऊन. तिचा फोटो काढल्याशिवाय पुढे जाववेना. तिला कॅमेऱ्यात बंद करून आणि अजून २-३ फोटो मारून परत गाडीत बसलो. 
कणकवली मागे टाकून सावंतवाडीच्या मार्गाला लागलो. आता पोटात कावळे झिम्मा खेळायला लागले होते. त्यामुळे सावंतवाडीत जेवायचं पक्कं केलंच होतं. सावंतवाडी बस स्थानकापासून ३-४ किमी वरच एक छानसं हॉटेल दिसलं. "शिवास" नावाचं (आमच्यातल्या "पेयपान करणाऱ्या" लोकांना ते नाव इतकं आवडलं की त्यांनी तिथेच जेवायचं आग्रह धरला) . त्या हॉटेलचं प्रथमदर्शनच इतकं छान होतं की जेवण पण चांगलं असेल, असं उगीचच वाटलं. आणि खरचं आमचा विश्वास सार्थ ठरला. जेवण अप्रतिम होतं. खास कोंकणी मसाल्यातील फिश करी, सुरमई फ्राय, मलई कोफ्ता आणि दाल खिचडी वर ताव मारून आणि हॉटेलच्या आजूबाजूच्या बागेतल्या झाडांना लगडलेले आंबे, फणस बघून पुढच्या प्रवासाला लागलो.

आम्ही मडगावला राहणार होतो. सावंतवाडी-मडगाव साधारण ९० किमी आहे. मध्ये महाराष्ट्र सरकारची हद्द संपताना एक चेकपोस्ट आहे. तिथे ड्रायव्हरचा लायसन्स वगैरे तपासणी झाली. थोडं पुढं जातोय तोच गोवा सरकारचं चेक पोस्ट आहे. तिथेही तोच उद्योग झाला. असं सगळं होऊन आम्ही पणजीत प्रवेश केला. मांडवी नदीत विहरणाऱ्या  असंख्य बोटी पाहून खऱ्या अर्थाने गोव्यात आल्यासारखं वाटलं. विजय मल्ल्याची बोट पण तिथे नांगरून ठेवलेली होती. मनात विचार केला, असेल काय "दीपिका" आत? असो बापडी..   आपल्याला काय...

आमचं हॉटेल कोलवा बीच वर होतं. खोल्या पण सी-फेसिंग होत्या. बाल्कनी उघडली आणि समोर समुद्र दिसल्यावर काय भारी वाटलं म्हणून सांगू... अहाहा.
मला दर वेळी समुद्र पाहिला की वाटतं सांगलीला, किंवा पुण्याला (मी इथे राहते म्हणून ही दोन शहरं बरं का) का नाही समुद्र? पण मग त्या दमट हवामानाची आठवण झाली की वाटतं बरंय जे आहेत ते... जेव्हा समुद्रावर खेळावंसं वाटेल तेव्हा जाऊ असंच कुठेतरी..    
इथेही हवा गरम होती, पण त्या किनाऱ्यावर झेपावणाऱ्या लाटा पाहिल्या, ती गाज ऐकली आणि माफ केलं त्या हवेला..

फ्रेश होऊन समुद्रावर चक्कर मारून यायचं असं ठरवलं. तिथे काही खास आकर्षणं होती.. त्या साठी मला जायचंच होतं. गैरसमज करून घेऊ नका. आम्हाला आपलं खाण्यापिण्याच्या ठिकाणांचं आकर्षण आहे. तुमचं काय आहे ते बघा बुवा तुम्हीच..

कोलवा बीच वर काय केलं, गोव्यात काय काय पाहिलं, काय काय खाल्लं ते पुढच्या भागात लिहीनच. तोपर्यंत बाय बाय!! 

                                                                                                                                          भाग २

Read more...

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP