प्रवास- ध्येयपूर्तीचा

>> सोमवार, ७ मार्च, २०११

एक छोटंसं गाव होतं. हिरवाईनं नटलेलं. शहरीपणाचा स्पर्शही न झालेलं आणि अजूनही माणुसकी जागृत असलेलं. तिथल्या सगळ्या ग्रामस्थांच्या मनात एकमेकांबद्दल आदर होता, प्रेम होतं, आपलेपणाची भावना होती.  अजूनही एखादा माणूस गांव सोडून चालला की सगळे डोळे पाणावत असत, आणि नवा कोणी गावात राहायला आला तर त्याला मदत करण्यासाठी लोकांच्यात अहमहमिका लागत असे.

कुणाला कसलं बक्षीस मिळालं, कुणाचा मुलगा नोकरीला लागला, कुणाला अपत्य झालं की सामुदाईक समारंभ होत असत, आणि त्यांचं कौतुक केलं जात असे. कुणी एखादी कला सादर करत असेल, तर त्याचा सन्मान होत असे. अतिशय गुणग्राहक अशी गावकऱ्यांची ख्याती होती.

या गावात एक कुटुंब राहत होतं. इन मीन तीन माणसं घरात. आई-वडील आणि मुलगा. हे लोक नुकतेच म्हणजे २ एक महिन्यांपूर्वीच त्या गावात राहायला आले होते. आधी ते कुठेतरी नागपूर जवळ राहत होते, आणि बदली झाल्यामुळे इथे आले होते. त्याचं मूळ गांव मध्यप्रदेशात होतं. त्यामुळे त्यांच्या ओळखीचं, नात्याचं गावात कुणीच नव्हतं.

श्रीनिवासराव शेजारच्या गावातल्या बँकेत काम करत असत, तर अंजलीताई गावातल्याच प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. मुलगा अजून लहान असल्याने शेजारच्या काकूंकडे दिवसभर असायचा. त्या ही त्याला मायेने सांभाळायच्या. एकंदरीत काय तर सगळं सुखेनैव चाललं होतं.

एक दिवस श्रीनिवासराव कामावरून परत येत असताना त्यांना गावाबाहेरच्या मैदानावर खूप गर्दी दिसली. कसले कसले तंबू लावणं चाललं होतं. एकीकडे मोठी चूल पेटली होती. घोळके करून माणसं बसलेली दिसत होती. मधेच बारक्या पोरांचं रडणं कानावर पडत होतं. एकूण काय तर सगळीकडे धांदल, गडबड होती. त्या दिवशी श्रीनिवासरावांना बऱ्यापैकी उशीर झालेला असल्यामुळे या सर्व प्रकाराकडे लक्ष न देता ते तडक घरी निघून गेले. त्यानंतर रविवार असल्यामुळे ही गोष्ट घरी सांगायचेही विसरून गेले.

रविवारी त्यांच्या लाडक्या लेकाचा २ रा वाढदिवस. नातेवाईक जरी नसले गावात, तरी समस्त गावकरी हेच जीवाभावाचे झालेले.  त्यामुळे घरी ५-५० लोक जेवायला. अंजलीताई अतिशय गडबडीत होत्या. जेवणखाण अगदी उत्तम झालं.  रात्री दोघे गप्पा मारत बसले होते. मुलगा खेळून खेळून दमून झोपून गेला होता. "वाढदिवस किती छान झाला, सगळे किती प्रेम करतात ना आपल्यावर?" असे विचार श्रीनिवासरावांच्या मनात येत होते. तर "आपली पुण्याई म्हणून असे शेजारी आणि सखे सोबती आपल्याला मिळाले" असं अंजलीताई म्हणत होत्या.

एका बाजूला मिळालेल्या भेटवस्तू उघडून त्यावर चर्चा चालू होतीच. मुलाला आत्ता लगेच वापरता येतील अश्या वस्तू, खेळणी इ. समान बाजूला काढण्यात अंजलीताई मग्न होत्या. अचानक श्रीनिवासरावांना आठवला तो गावाबाहेरच्या मैदानावरचा गोंधळ. त्यांनी सगळं वर्णन अंजलीताईंपाशी केलं. दोघांनाही एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं, की २ दिवस हे लोक त्या मैदानावर आहेत आणि गावकरयांपैकी कुणीच हा विषय कसा काय काढला नाही. दुसऱ्या दिवशी इतरांशी या विषयावर बोलायचं असं ठरवून दोघेही झोपी गेले.

सकाळ झाली. हा विषय संध्याकाळी कामावरून आल्यावर निवांत काढावा, असा श्रीनिवासरावांचा विचार होता कारण त्यांना ८ वाजताच निघावं लागे, इतक्या सकाळी दुसऱ्यांना कशाला त्रास द्यायचा असं त्यांना वाटत होतं. अंजलीताईनी नवऱ्याचा, आपला आणि मुलाचा डबा तयार केला. श्रीनिवासराव बाहेर पडल्यानंतर मुलाला अंघोळ वगैरे घालून, स्वत:चं आवरून शेजारच्या काकूंकडे त्याला सोडायचं हा त्यांचा दिनक्रम होता. त्याप्रमाणे काम आटोपून त्याही शाळेत निघून गेल्या. श्रीनिवासरावांनी ठरवलं होतं की बँकेत जाताजाताच काय प्रकार आहे ते पाहून जायचं. त्याप्रमाणे ते गावाबाहेरच्या मैदानापाशी आले. आत्ताही तिथे तीच वर्दळ होती. त्यांना परत आश्चर्य वाटलं की गावातल्या कुणालाच कसा पत्ता नाही या लोकांचा. आता तिथे जवळजवळ ८-१० तंबू उभे होते. त्यापैकी सगळ्यात मोठ्या तंबूत जाऊन चौकशी करायचं त्यांनी ठरवलं.

आपली स्कूटर त्या मैदानात लावून श्रीनिवासराव त्या तंबूकडे निघाले. तंबूत ७-८ माणसं काहीतरी बोलत बसली होती.

त्यांना नमस्कार करून श्रीनिवासरावांनी विचारलं, "आपण कोण, कुठले, काय हेतूने इथे आलात?"

त्यांच्यातल्या एका वयस्कर दिसणाऱ्या माणसाने प्रतिनमस्कार  करून उत्तर दिलं, " आम्ही खूप लांबून आलोय, विदर्भातून. लोककलाकार आहोत आम्ही. तमाशा चालवतो. या गावाबद्दल, आणि गावातल्या लोकांच्या कलाप्रेमाबद्दल खूप ऐकलं होतं, म्हणून आमची कला सादर करायला इथे आलो आहोत."

हे सर्व ऐकल्यावर श्रीनिवासराव  जरा चिंतेत पडले. "आत्तापर्यंत तमाशा हा प्रकार त्या गावातल्या लोकांनी फक्त मराठी चित्रपटात पाहिलेला. जरी गाव कलाप्रेमी असला तरी तमाशा म्हणजे... तमाशा आला की नाचणाऱ्या बायका आल्याच. जर त्यांच्यामुळे या गावात काही गोंधळ झाला तर? गुण्यागोविंदाने राहत असलेले लोक एकमेकांच्या जीवावर उठले तर?" श्रीनिवासरावांच्या मनात विचार येत होते. ते ज्या गावातून आले होते, त्या गावात सतत भांडणं आणि मारामाऱ्या होत असत आणि त्या भांडणांना सुरुवात ही गावात नव्याने सुरु झालेल्या मुजरा कार्यक्रमातून झाली होती. एका कार्यक्रमासाठी आलेल्या कलावंतिणी जेव्हा गावातच माडी बांधून राहू लागल्या, तेव्हा तर त्या भांडणांना उत आला होता. गावातले राजकारणी, त्यांची उनाड पोरं आणि त्या कलावंतीणीची "दीदी" यांच्यातल्या राजकारणामुळे गावातली तरणीताठी कमावती मुलं त्यांच्या नादी लागून वाया गेलेली श्रीनिवासरावांनी पहिली होती.

हे सगळं चित्र झर्रकन त्यांच्या नजरेसमोरून निघून गेलं, आणि ते वास्तवात आले. समोरचा माणूस अपेक्षेने त्यांच्याकडे पाहत होता. त्याला पंचायतीला भेटायला सांगून व परवानगी मिळाली तरच पुढे जा असं सांगून  ते कामावर निघून गेले.

दिवसभर त्यांच्या डोक्यातून हा विषय जात नव्हता आणि एक कटू आठवण सारखी मन:पटलावर यायला पाहत होती.

त्यांची एकुलती एक धाकटी बहिण नर्मदा. १० वर्षांनी लहान. सगळ्यांची खूप लाडकी. अतिशय सुंदर, हुशार, अल्लड आणि अवखळ. शाळेत कायम पहिल्या क्रमांकावर असायची. नवनवीन गोष्टींचं खूप कुतूहल होतं तिला. ते शमवता शमवता घरच्यांच्या नाकी नऊ यायचे. पण एकच चिंतेची गोष्ट होती तिच्या बाबतीत. म्हणजे त्या काळी चिंतेचीच म्हणावी लागेल. नाचाची अतिशय आवड होती तिला. सतत आरश्यासमोर उभी राहून गिरक्या घेत असायची. पण एका सनातनी मध्यमवर्गीय कुटुंबात हे कसं काय खपायचं? वडिलांची सक्त ताकीद होती घरच्यांना की हिला समजावा आणि तिचं नाचणं बंद करा नाहीतर तिचं शिक्षण बंद करेन. पण आपली आवड अशी कोणी दाबून ठेऊ शकतं का? तिलाही ते जमलं नाही. ती गुपचूप एका मैत्रिणीकडे जाऊन नाचाचा सराव करत असे. त्या मैत्रिणीच्या आई बद्दल गावात फारसं चांगल मत नव्हतं, ती पुरुषांना भुलवते असं काही लोकांचं म्हणणं होतं. ती हिला नाच शिकवत असे. अर्थात हे सगळं तिच्या वडिलांना माहित नव्हतंच.

अशीच काही वर्षं गेली. नर्मदा १६ वर्षांची झाली. शिक्षण चालू होताच उत्तम प्रकारे, आणि नृत्यातही पारंगत झाली ती. त्याच सुमारास श्रीनिवासरावांना चांगल्या नोकरीची संधी मिळाल्यामुळे ते गाव सोडून नोकरीच्या गावी राहायला गेले. नुकतंच लग्न झालेलं असल्यामुळे पत्नीलाही सोबत घेऊन गेले. नोकरीच्या व्यापात इतके गुरफटले की गावी जाणं २-३ वर्षं जमलंच नाही. पण बहिणीशी त्यांचा पत्रव्यवहार चालूच होता. आई-वडिलांबद्दल खुशाली कळत होती.अधूनमधून साडी, पैसे अशी भाऊबीज, दिवाळी नसली तरी गावी पोचत होती. तिच्या पत्रांतून गावात झालेल्या मुजरा कार्यक्रमाबद्दल कळलं होतं. त्यानंतर झालेल्या मारामारयांबद्दलही उल्लेख होता. आणि अचानक एक दिवस तिची पत्रं येणं बंद झालं होतं. बरेच दिवस वाट पाहूनही काहीच कळलं नाही म्हणून त्यांनी गावी धाव घेतली होती. आणि एक खळबळजनक माहिती समोर आली होती.

नर्मदेने स्वेच्छेने त्या कलावंतीणीच्या मेळ्यात प्रवेश केला होता. आणि त्या गोष्टीची शरम असह्य होऊन  त्यांच्या आई-वडिलांनी अंथरूण धरले होते. गावकऱ्यानी त्यांना जवळजवळ वाळीत टाकल्यातच जमा होतं. त्यामुळे आई-वडील आजारी असल्याची बातमी कुणीही त्यांच्यापर्यंत पोचवली नव्हती. आपल्या गावात निर्माण झालेल्या अशांततेचे कारण तो मेळाच आहे असे (फारच उशिरा) गावकर्यांच्या लक्षात आल्यामुळे त्या कलावंतिणीनाही गाव सोडून जायला भाग पाडण्यात आले होते. त्यामुळे नर्मदेचा ठावठिकाणाही कळत नव्हता. अश्यात मुलाला समोर पाहून त्यांच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झाले होते. "नर्मदेला शोधून काढ आणि तिला त्या नरकातून सोडव" असे वचन मुलाकडून घेऊन त्या माउलीने डोळे मिटले ते कायमचेच. श्रीनिवासरावांनी पत्नीला बोलावून घेतले होते, व आईचे सर्व अंत्यसंस्कार होईपर्यंत तिथेच राहायचं त्यांनी ठरवलं. पण आईपाठोपाठ ८ दिवसांनी वडिलांनीही श्वास सोडला. सर्व विधी आटोपून, दोघे परत आले तेच मुळी त्या गावाची नाळ तोडून.

हे सगळं दृश्य एखाद्या चित्रपटासारखं नजरेसमोरून सरकत गेलं, आणि श्रीनिवासरावांना तो तमाशाचा फड आठवला. मनोमन त्यांनी प्रार्थनाही केली देवाची, की नको देवा, यांना परवानगी नको मिळूदे आमच्या गावात फड उभारण्याची. अजून किती नर्मदा त्यांना भुलतील आणि आयुष्याची नासाडी करून घेतील कोण जाणे..   

विचारात गुरफटलेल्या अवस्थेतच ते घरी आले. अंजलीताईनी ओळखलं की काहीतरी सलतंय यांच्या मनात. पण काही विचारायच्या आतच श्रीनिवासरावांनी सगळा प्रकार त्यांना सांगितला. दोघेही गंभीर झाले, आणि तडक गाव प्रमुखाकडे गेले. ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली, आणि परवानगी दिल्यास त्याबरोबर काय काय घडू शकतं याचीही कल्पना दिली. मामला गंभीर आहे हे लक्षात आल्यावर प्रमुखांनी समस्त गावाची सभा बोलावली, आणि त्या तमाशाच्या व्यवस्थापकालाही बोलावणं धाडलं. सभेमध्ये झालेल्या चर्चेतून आणि सर्व शक्याशक्यतांचा विचार करून तमाशाला परवानगी नाकारण्यात आली. व्यवस्थापकाने खूप प्रयत्न केला सांगायचा की आमच्या तमाशातले सर्व कलाकार हे चांगले आहेत, त्यांच्यामुळे तुमच्या गावाच्या सौख्यात काहीच बाधा येणार नाही. पण पंचायतीने त्यांना फड लावायला नकार दिला.

कष्टी मनाने तो फडावर परत आला, व काम करणाऱ्यांना तंबू उठवायची सूचना दिली. सर्व जण एकदम अवाक झाले. इतके श्रम करून उभा केलेला फड असा एका रात्रीत उठवायचा? एकदम गोंधळ उडाला तिथे.

कसला एवढा आवाज चालू आहे, असा विचार करत तमाशाची मुख्य नृत्यांगना , आणि मालकीण सुंदराबाई जबलपूरकर बाहेर आल्या आणि व्यवस्थापकांना विचारले, "काय हो, का एवढा कालवा करताय? झालं तरी काय असं?"

तेव्हा त्यांच्या फडावर गावकऱ्यांनी आणलेली संक्रांत त्यांना समजली.

"मी जाते त्यांच्याकडे आणि बोलते, पाहू काय होतं ते, तो पर्यंत तंबू उठवायची घाई करू नका" असं सांगून आणि व्यवस्थापकांना सोबत घेऊन सुंदराबाई गावप्रमुखांकडे निघाल्या.

सुंदराबाई जबलपूरकर या प्रख्यात तमाशा कलाकार होत्या. त्यांनी खूप कष्टाने त्यांचा फड नावारूपाला आणला होता. स्वत: ला सिध्द करताना झालेला प्रचंड त्रास, समाजाची अवहेलना, पुरुषांची वाईट नजर आणि स्त्रियांचा तिरस्कार त्यांनी अनुभवला होता. पण स्वत:च्या इज्जतीला आणि इभ्रतीला तडा जाईल अशी कुठलीही गोष्ट त्यांच्या हातून कधी घडली नव्हती. त्यांच्या तमाशात नाचणाऱ्या मुली त्यांच्या हाती सुरक्षित होत्या. त्या मुलींबाबत कुठलाही गैरव्यवहार सुंदराबाईनी कधीच होऊ दिला नव्हता. डोळ्यात तेल घालून मुलींच्या अब्रूचं रक्षण केलं होतं. त्यामुळे "कर नाही त्याला डर कशाला" असं म्हणत गावप्रमुखाना भेटायला जातीने जाण्यात त्यांना काहीच अडचण नव्हती.

विचारांच्या नादात त्या प्रमुखांच्या घरासमोर पोचल्या. ही घरंदाज दिसणारी बाई कोण असा विचार करत प्रमुखांनी त्यांना ओसरीवर बसवले. पाणी, गूळ दिला. सुंदराबाईनी स्वत:ची ओळख करून दिली. येण्याचा उद्देश सांगितला. तो ऐकल्यावर गाव प्रमुखांनी परत गावातल्या प्रसिध्द आणि मानाच्या व्यक्तींना बोलावणं पाठवलं. सर्व जमल्यावर सुंदराबाईनी त्यांची कहाणी सुरु केली. त्या सर्व मंडळींकडे पाठ करूनच बोलत होत्या. त्यामुळे लोकांना कळत नव्हते की ही धडाडीची बाई आहे तरी कोण. पण सर्व मनापासून त्यांची कहाणी ऐकत होते.

"मी एका सुशिक्षित, साधन कुटुंबातली हुशार मुलगी. मला नृत्याची, विशेष करून लोकनृत्याची विलक्षण आवड होती. पण त्या काळी चांगल्या घरातल्या मुलीला हा मार्ग उपलब्धच नव्हता. मलाही नव्हता. पण माझ्या ह्या ध्येयाने मी इतकी झपाटली गेले की मी घर सोडून एका मेळ्यात प्रवेश केला, आणि माझं घरदार मला तुटलं ते कायमचं." सुंदराबाई बोलत होत्या. उपस्थित कुतूहलाने ऐकत होते.

"त्या मेळ्यात काही वाईट अनुभव आले, आणि मी तो मेळा सोडला. जबलपूरहून महाराष्ट्रात आले, आणि लावणी या लोककलेच्या प्रेमात पडले. नृत्यात तर मी पारंगत होतेच, पण लावणीसाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागली. पंडित किशन महाराजांकडे ही कला शिकले, आणि "ज्यात शृंगार असेल पण पुराणातल्या कथाही असतील, ज्यात कला असेल, आणि निर्भेळ करमणूकही असेल, ज्यात संगीत असेल आणि नृत्यही असेल" असा सर्वगुणसंपन्न तमाशा काढायचा हे माझ्या मनाने घेतलं. मी तयारी सुरु केली. दरम्यान माझी गाठ माझ्यासारख्याच ध्येयाने पछाडलेल्या श्री. जबलपूरकर यांच्याशी पडली. मी त्यांच्या प्रेमात पडले, व आम्ही लग्न केलं. नव्या दमानं कामाला लागलो, व तमाशा उभा केला. माझ्या तमाशात नाचणाऱ्या सगळ्या मुली या परिस्थितीमुळे तमाशात काम करत नाहीत,तर त्या चांगल्या घरच्या मुली आहेत, नृत्याची आवड म्हणून त्या इथे काम करतात. जसं मी माझ शील सांभाळलं तसंच त्यांच्यापैकी कुणाचंही पाऊल वाकडं पडलेलं नाही आणि पडणारही नाही. मी खात्री देते. हे एवढं ऐकूनही जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या तमाशाला परवानगी द्यायची नाही, तर आम्ही उद्या सकाळी त्या मैदानावर नसू, याचीही खात्री देते."

एवढं बोलून सुंदराबाई वळल्या, सर्वाना नमस्कार केला, व चालू लागल्या. श्रीनिवासरावांना एकदम काहीतरी वाटले, आणि ते ओरडले, "नर्मदे, थांब."

गाव दचकला. सुंदराबाई थबकल्या. गर्रकन वळल्या, आणि आपल्याकडे येणाऱ्या आपल्या सख्या मोठ्या भावाला पाहून चकित झाल्या. दोघेही समोरासमोर आले, आणि पाणावल्या डोळ्यांनी एकमेकांकडे पाहत राहिले.

"दादा, मी चूक नाही केली रे, माझ्यामुळे आपल्या घराण्याची बदनामी होईल असं जे आई-बाबांना वाटत होतं, त्यासाठी मी नाव बदललं. मी अजूनही तशीच आहे, स्वच्छ,  न डागाळलेली. तू पण माझ्याबद्दल असाच विचार करत होतास का?"

श्रीनिवासरावांनी "नाही" अशी मान डोलावली,  बहिणीला आपल्या जवळ घेतलं आणि आशीर्वाद दिला. "आयुष्यमान भव, सदा सुखी राहा, तुझ्या पाठीशी तुझा भाऊ भक्कमपणे उभा आहे"

"आम्ही पण" हेलावलेले गावकरी ओरडले, आणि एकच जल्लोष झाला...

 

5 comments:

Aarti ८ मार्च, २०११ रोजी ५:२५ PM  

वेगळा विषय निवडल्या बद्दल अभिनंदन!!! छान लिहिले आहेस. कथेची मांडणी पण आवडली.

Kiran ९ मार्च, २०११ रोजी ७:५४ AM  

Nave Prayog jorat chalu ahet....

Ketaki Abhyankar ९ मार्च, २०११ रोजी १०:४१ AM  

Thanks Kiran ani Aarti :)

Ashwini ९ मार्च, २०११ रोजी १२:१३ PM  

Chhan !!

sumedha ५ जुलै, २०११ रोजी २:१८ PM  

khupach chhan ahe hi katha... :)

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP