आम्ही वेंधळी वेंधळी

>> गुरुवार, २३ डिसेंबर, २०१०

मी लहानपणापासून स्वत:मध्ये रमण्यात जास्त धन्यता मानत आलेली आहे. घरी एकटी असले तरी मी निवांत असते अगदी. कधी मित्र-मैत्रीणींमध्ये कल्ला करते तर कधी स्वत:ला वेळ देते. आता अश्या स्वभावाला "ती व्यक्ती जर हुशार असेल" तर "एककल्ली" स्वभाव असे म्हणतात, आणि "ती व्यक्ती जर बावळट असेल" तर "मंदबुद्धी" म्हणतात. या दोन्ही विशेषणांच्यामध्ये एक पुसटशी सीमारेषा आहे. त्या सीमारेषेवर मी असावी असे मला वाटतं , कारण मी "वेंधळेपणा" करते असे खूप लोकांचं मत आहे. (अगदीच चुकीच नाहीये ते). अश्या काही गोष्टी घडतात आणि नंतर माझं मलाच खूप हसू येतं.

आज, आत्ता, अर्ध्या तासापूर्वी मी असा एक हिट आयटम दिलाय. म्हणलं चला, ही मजा लोकांना सांगून त्यांना पण हसवूया थोडंस.  जसं आपण आपल्या चांगल्या गोष्टी लोकांना सांगतो आणि वाहवा मिळवतो, तसंच आपली गंमतशीर बाजू पण कळू दे लोकांना, काय?

तर झालं असं---
मागच्या महिन्यात आमच्या कंपनी मध्ये "ऑनलाईन लीव्ह अप्लिकेशन सिस्टीम" चालू झाली. म्हणजे आधी होतीच पण "Manual" पण रेकॉर्ड्स ठेवले जायचे. आता पूर्णपणे ऑनलाईन  करून टाकली. आम्हाला सगळ्यांना जानेवारी पासून च्या सुट्ट्या या नव्या सिस्टीम मध्ये भरायला सांगितल्या. आणि आम्ही तत्परतेने भरल्या. अहो सुट्ट्या हा किती जिव्हाळ्याचा विषय असतो हे मी काय वेगळं सांगायला हवं का? तुम्ही माझी "आमचा बॉस आणि आम्ही" ही पोस्ट वाचली असेलच. तर त्या सणकी बॉसने तितक्याच तत्परतेने त्या सुट्ट्या "Disapprove" करून टाकल्या. का तर त्या वेळी ते आमच्या ग्रुपचे इनचार्ज नव्हते म्हणे. आता आली ना पंचाईत. तसं पाहायला गेलं तर या सगळ्या सुट्ट्या वेगळ्या आणि वरच्या Authority कडून आधीच मान्य झालेल्या होत्या, आणि या माणसाच्या "Disapprove " करण्याने त्यात काही फरक पडणार नव्हता. तरीपण त्याने आपला हुद्दा दाखवलाच. आणि आमच्या घेतलेल्या सगळ्या सुट्ट्या परत आमच्या वर्षाच्या balance मध्ये जमा झाल्या.

झालं, HR वाले पण हैराण. त्यांच्या सिस्टीमच्या मुस्कटात मारल्यासारखं झालं त्यांना. त्यांनी एक तोडगा शोधून काढला. वरच्या लोकांशी बोलून , ज्या Authority ने आमच्या सुट्ट्या मान्य केल्या होत्या त्याचं नाव आमचा इनचार्ज म्हणून सिस्टीम मध्ये बदललं आणि आम्हाला परत सगळ्या सुट्ट्या भरायला सांगितल्या.
आता तसं वर्ष संपायला १ च आठवडा राहिलाय. आणि त्यात उद्याचा दिवस म्हणजे नाताळच्या पूर्वसंध्येला आम्हाला एक सुट्टी घेता येऊ शकते. ("Restricted holiday- RH" या नावाचा एक रजेचा प्रकार सरकारी कंपन्यांमध्ये असतो, ज्या हक्काच्या असतात आणि वर्षात अश्या २ दाच घेता येतात, त्याही सरकारच्या लिस्ट मध्ये असलेल्या दिवशीच.) त्यावर माझ्या २ सहकारी मैत्रिणी आणि मी चर्चा करत होतो. उद्याची  RH घेतली की सगळ्या सुट्ट्या संपतात, त्यामुळे आपण सर्व सुट्ट्या वापरून घेतल्या या आनंदात आम्ही असतानाच, एक मैत्रीण म्हणाली, "माझ्याकडे एक "Casual leave-CL" शिल्लक आहे, ती सोमवारी घ्यावी काय". आम्ही तिला ३१ डिसेंबर ला घे असा सल्ला दिला. त्या नंतर पुढच्या काही मिनिटात घडलेलं हे संभाषण:

मैत्रीण: वा, माझ्याकडे एक CL शिल्लक आहे अजून.
 मी: मस्त, घेऊन टाक, सोडू नकोस.
मैत्रीण: पण मी ती कधी घेऊ? सोमवारी की ३१ ला?
मी. अगं, ३१ ला घे, तशीही उद्या RH घेतल्यावर ३ दिवस मिळतायतच, ३१ ला शुक्रवार आहे, तेव्हा पण ३ दिवस होईल मस्त.
मैत्रीण: पण तू घेणार का तेव्हा सुट्टी?
मी: आं?  आता माझा काय संबंध? माझ्या सगळ्या CL आधीच संपल्यात बरंका. तुझी तू घे ना.
(ही मैत्रीण आणि मी, आम्ही एकमेकींकड़े पाठ करून बसतो)
 
हे मी बोलले आणि आजुबाजूला जोरदार हास्याचे फवारे उडाले. मला कळेना, काय झालं. "बरोबर आहे ना मी म्हणते ते, हिने सुट्टी घेण्याशी माझ्या सुट्टीचा काय संबंध?" असे म्हणून मागे  फिरले आणि मग मला कळलं काय झालं ते. एक नंबर वेंधळेपणा केला होता मी. "ती मैत्रीण तिच्या नवऱ्याशी फोन वर बोलत होती, आणि तिने त्याला विचारलेल्या प्रश्नांना मी  उत्तरे दिली होती."

Read more...

वाळलेल्या पानांचा "सुबक" संग्रह- हर्बेरीअम

>> सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

सध्याचे हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट/नाटकं यांची जर कुणी तुलना करायची ठरवलीच, तर कोण श्रेष्ठ ठरेल हे काही मी वेगळं सांगायची गरज नाही. अहो काय ते हिंदी चित्रपट. काही शेंडा बुडखा नसलेली पटकथा, दे मार हाणामारी, प्रेमात पागल झालेले आणि कैच्या कै उद्योग करणारे नायक-नायिका किंवा मग एकदम काळ्या निळ्या कपड्यातले, स्वच्छ प्रकाशापेक्षा अंधारात जास्त सरावाने वावरणारे आणि खूप तत्वज्ञान झाडणारे लोक.  कसे बघायचे सांगा हे चित्रपट.. असो.

पहिल्यापासून मला चित्रपटांपेक्षा नाटकंच जास्त आवडतात. अगदी संगीत नाटकं पण मी आवडीने पाहते. त्यात पुण्यात असल्यामुळे नवीन नवीन आणि कसलेल्या नटवर्यांची नाटकं लागली बालगंधर्व किंवा यशवंतरावला (यशवंतराव चव्हाण नाट्यगृह) की मी शक्यतो सोडत नाही. अशीच काही महिन्यांपूर्वी एक बातमी वाचली होती. "१९६०-७० च्या काळातली गाजलेली मराठी नाटकं परत रंगभूमीवर आणण्याचं महत्वाचं काम "सुबक-सुनील बर्वे कलामंच" तर्फे हाती घेतलं आहे आणि त्या मालिकेतील पाहिलं नाटक "सूर्याची पिल्ले" याचे फक्त २५ प्रयोग महाराष्ट्रभर होणार आहेत." त्याच वेळी हे नाटक पाहायचं ठरवलं. पण नंतर कळलं की मुंबईत १३ आणि पुणे, कोल्हापूर, नाशिक अश्या इतर शहरांत मिळून उरलेले १२ प्रयोग असणार आहेत. आणि माझ्या दुर्दैवाने जे काही प्रयोग पुण्यात झाले, त्याला जायचा योग आला नाही.

काही दिवसांपूर्वी वाचलं की "सुबक" ची निर्मिती असलेले बाळ कोल्हटकर यांच्या "लहानपण देगा देवा" या सुखांती नाटकाचे २५ प्रयोग  "हर्बेरीअम"  सादर करणार आहे. घराच्या जाणत्या लोकांना, ज्यांनी त्यांच्या काळात खुद्द बाळ कोल्हटकर यांनी केलेलं हे नाटक पाहिलेलं आहे, त्यांना विचारल्यावर हे नाटक पाहायचा निर्णय अगदी पक्का केला.

"हर्बेरीअम" म्हणजे जुन्या वाळलेल्या पानांचा कुशलतेने केलेला संग्रह. या संग्रहातल्या या दुसऱ्या पानाचा पुण्यातला पहिला शुभारंभी प्रयोग बालगंधर्व ला होणार हे कळल्याबरोबर तिकीट काढून आले. या नाटकांची तिकिटे थोडी जास्त आहेत. पहिल्या १० की १२ रांगांचे तिकीट आहे ३०० रुपये. पण नाटकातले कलाकारच एवढे कसलेले आहेत, की मी विचार केला नाही जास्त. आणि तसंही चित्रपट जसा बाल्कनीतून पाहायला जास्त मजा येते, तसं नाटक हे शक्य तितक्या पुढच्या रांगेत बसून पाहिल्यानं त्याची लज्जत वाढते.

तर अश्या या नाटकाची गोष्ट इथे थोडक्यात सांगते.

अनंत उत्पात (जरा वेगळच आहे ना नाव?) नावाच एक माणूस आफ्रिकेहून बऱ्याच वर्षांनी अचानक आपल्या मुंबईला आपल्या बहिणीच्या घरी टपकतो आणि तिथेच तळ टाकतो. आणि चाळीतल्या सगळ्यांकडून मेव्हण्याच्या नावाने उधारी घेऊन सगळ्यांना बेजार करतो. हे सगळे लोक स्वत:ची खोटी प्रतिष्ठा जपण्याच्या नादात दुसऱ्यांना उधारी देऊन कर्जबाजारी झालेले आहेत. पण आपली अब्रू जाईल म्हणून कोणीच तसं  दाखवत नाहीत.

बहिणीच्या घरात तिची लग्नाला आलेली एक नणंद-शरयू आहे. ती पडलीय तिला गाणं शिकवायला येणारयाच्या-राजूच्या प्रेमात. पण त्या मुलाच्या बापाला हे लग्न मान्य नाही, का तर यांचं घराणं त्याच्या तोलामोलाचं नाही.तो बाप ही अफरातफरीच्या भानगडीत अडकलेला..

बहिणीचा नवरा-विसूभाऊ अतिशय भोळा भाबडा आणि बिच्चारा आहे. त्याचं एक दुकान आहे पण ते चालत नाही. पण हे वडिलांना कळू नये म्हणून प्रत्येक पत्रात दुकान उत्तम चाललंय असं कळवतो. दुकानासाठी घेतलेलं कर्ज फेडलं जात नाहीये, त्यामुळे कधीही दुकानावर बँकेची टाच येऊ शकते अशी परिस्थिती.

बहिणीचे सासरे-अप्पा,  गावाकडे असतात. त्यांचीही हीच गत आहे. प्रतिष्ठितपणाच्या हव्यासापायी राहतं घर गहाण पडलं आहे. पण हे मुलाला कळू नये म्हणून सगळं  कसं छानछोकीत  चालू आहे असं भासवतायत. 
या त्या कारणावरून सुनेला "तुमचं घराणंच तसलं" असे टोचून बोलणाऱ्या अप्पांना अनंता हा तिचाच भाऊ आहे हे माहित नाही, माहित करून दिलेलं नाही, कारण याने त्यांना पण त्यांच्या गावी जाऊन गंडा घातलाय आणि हे जर त्यांना कळलं तर ते दुकानात घातलेलं भांडवल काढून घेतील ही विसूभाऊना भीती आहे.

तर अशी हि सगळी गोलमाल अनंताच्या लक्षात आलीय. आणि त्या गोंधळात तो अजून भर टाकतोय नवे नवे उद्योग करून.

भाऊबिजेसाठी  आलेला अनंत उत्पात बहिणीला भाऊबीज घालतो की तिच्या गोंधळात अजून भर टाकून आफ्रिकेला निघून जातो, हे नाटकात प्रत्यक्ष पाहण्यात खरी मजा आहे. ते मी सांगत नाही. तुम्हीच पहा नाटक प्रत्यक्ष आणि आनंद घ्या.

पात्रपरिचय:
विश्वनाथराव-मंगेश कदम 
बहिण- शिल्पा तुळसकर
शरयू-स्पृहा जोशी
राजू-सचिन सुरेश
अप्पा-जयंत सावरकर
आणि
अनंत उत्पात- शरद पोंक्षे


नाटकात काम करणारे सगळेच कलाकार अतिशय कसलेले अभिनेते आहेत, त्यामुळे खरी बहार येते नाटक पाहताना. विशेषत: शरद पोंक्षे-.. अतिशय सुरेख आणि संयत अभिनय केलाय त्यांनी. मंगेश कदम यांचे काम ही सुंदर झालेय, भोळा भाबडा विसुभाऊ त्यांनी झकास उभा केलाय. दिग्दर्शन हि त्यांचंच आहे. स्पृहा जोशी या नव्या अभिनेत्रीने भूमिकेचं सोनं केलंय. (म्हणजे अग्निहोत्र मधली उमा बंड- हे काम तर तिने फारच छान केलं होतं).
एकूण काय तर तिकिटाच्या रकमेची पर्वा न करता हे नाटक जरूर जरूर पहा. तुम्हाला अजिबात पश्चात्ताप होणार नाही...

Read more...

एक उनाड दिवस

>> शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१०

दिवस: आठवड्यातला कुठलाही एक (शनिवार रविवार सोडून)
वेळ: भर दुपारी १२ ची
ठिकाण: माझी अत्यंत आवडती वेळ घालवण्याची जागा , तुळशीबाग  :)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्ष संपत आलं आहे. कंपनीने  दिलेल्या ८ आजारी सुट्ट्या (sick  leave) संपवण्याची वेळ आलेली आहे. उरलेल्या दिवसांमध्ये २ सार्वजनिक सुट्ट्या पण येणार आहेत. तेव्हा राहिलेली एक रजा जर मधल्या एखाद्या दिवशी , म्हणजे शनिवार रविवार ला न जोडता घेतली तर? असा विचार येण्याचे कारण एकच. तो एक दिवस हा पूर्णपणे तुमचा असतो, आणि तुम्हाला हवा तसा वापरता येतो. ज्या लोकांच मूळ गाव वेगळं आहे, आणि ५-६ तासांच्या अंतरात आहे, त्यांना माझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात येईल. त्यांना बऱ्याच वेळेला शनिवार रविवार ला जोडून रजा घेऊन घरी जावं लागतं, काहीतरी कार्यक्रम असतात, किंवा घरचे  बोलावत असतात म्हणून. मग अश्या वेळी स्वत:साठी , घरासाठी करण्यासारखी जी काही कामे असतात त्याला फाटा द्यावा लागतो. तुम्हाला हवा तसा दिवस घालवता येत नाही. कधी कधी आठवड्यातल्या त्याच त्याच दिनक्रमाचा कंटाळा आलेला असतो. मग अश्या वेळी एक सुट्टी अशी कामाच्या दिवशी मिळाली तर किती फ्रेश झाल्या सारखं वाटतं.

हाच विचार करून माझी राहिलेली आणि याच वर्षात संपवायची अशी एक सुट्टी मी घ्यायची ठरवली. नवऱ्याने विचारले, करणार काय आहेस अशी मधल्या दिवशी सुट्टी घेऊन? मी म्हणलं "उनाडक्या". खरंच, मी काहीही ठरवलं नव्हतं काय करायचं ते. 

अशी मध्ये अधे सुट्टी घेण्याची वेळ आली तर मी सहसा बुधवार पसंत करते. एक तर २ दिवस काम करून १ दिवस सुट्टी मस्त वाटते, आणि दुसरं म्हणजे परत २ दिवस काम केल की शनी-रवी आहेतच. त्यामुळे मी त्या बुधवारी अचानक आजारी पडले. (ते कंपनीत सांगण्यापुरत) खरं तर मला सकाळी उशिरा उठायचं होत, पण अहो ऑफिस ला जाणार म्हणजे काही चान्स नव्हता. पटपट त्याला नाश्ता, डबा देऊन ऑफिस ला पाठवलं. :) आणि मग आवरायला लागले.

साधारण ११ वाजता ३-४ पिशव्या आणि पर्स भरून बाहेर पडले हिंडायला. समस्त स्त्रीवर्गाचं  टाईमपास करण्याचं पुण्यातलं आवडतं ठिकाण म्हणजे तुळशीबाग आणि लक्ष्मी रोड.  (पु.ल. नी म्हणलेले आहेच नाहीतरी, की पुण्यातील लक्ष्मी रोड आणि मुंबईतील रानडे रोड इथे जगातलं काय मिळत नाही!! रानडे रोड झालाय थोडाफार एक्स्प्लोर करून, मागे मुंबईत होते तेव्हा) आधी तुळशीबागेत शिरले. उगाच jeans वरचे tops  पहा, ड्रेस मटेरीअल पहा अश्या टिवल्या बावल्या केल्या. विंडो शॉपिंग करायला आवडतं आपल्याला. मग चप्पल stall समोर रेंगाळले. २-३ दुकानं फिरल्यावर आपण काहीच घेतलं नाहीये अजून याची लाज वाटून एक चप्पल  घेतली(अर्थात चप्पल जोड). 

मग माझी नजर वळली  कानातली-गळ्यातली दुकानांकडे. तिकडे मी काही न काहीतरी घेतेच. त्यांना निराश नाही करत कधी. :)  तिथे जवळपास १०-१२ कानातली, २-४ गळ्यातली, बांगड्या वगैरे घेऊन मोर्चा बेडशिट, कपडे या दुकानाकडे वळवला. तिथेही थोडीफार खरेदी झाली. २ पिशव्या तर इथेच भरल्या होत्या.

मग जरा तुलसी-गायत्री या घरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मिळणारया दुकानांकडे चक्कर टाकावी असा विचार आला. घुसले गर्दीत. या तुलसी च्या बोळात मरणाची गर्दी असते. मग दिवस कोणता का असेना. मला सगळ्यात आश्चर्य वाटतं पुरुष मंडळींचं. ते या कोलाहलात का येतात कोण जाणे.  बिचारे कधी मैत्रिणीला दुखवायचं  कसं म्हणून, तर कधी बायकोला पिशव्या उचलायला येणार नाही म्हणून तिथे येतात आणि फसतात. कधी बायको खरेदी करत असताना लहान मूल कडेवर घेऊन उभे असलेले दिसतात. अर्थात काही काही स्वत: च्या इच्छेने येतात तो मुद्दा आहेच. :) तर अश्या या गच्च भरलेल्या बोळात मी शिरले, आणि कशी बशी तुलसी पर्यंत पोचले.

तिथे गेले की मला काय घेऊ काय नको असं होतं अगदी. मग काहीही गरज नसताना बरीचशी खरेदी होते. म्हणजे गेलेली असते कंगवा साफ करायचं उपकरण आणायला, पण घेऊन येते, ३-४ डबे, थोडे चमचे, बाउल, तवा/ताटल्या, फ्रीज च्या बाटल्या आणि इतर अनेक गोष्टी. नेहमीच्या या प्रथेला जागले मी आणि लागला चुना पाच-सहाशे चा इथेच. मग मी हाश्श: हुश्श: करत बाहेर आले, आणि जरा किती पैसे राहिलेत ते बघून एका सौदर्य प्रसाधने होलसेल मध्ये विकत मिळणाऱ्या दुकानात शिरले. झालं, तिथेही उगीच टाइमपास करून एखादं नेलपेंट, एखादं क्रीम वगैरे चुटपूट खरेदी करून बाहेर पडले. आता एकच पिशवी राहिली होती रिकामी आणि पैसेही फारसे उरले नव्हते. गाडी होती मंडइ जवळच्या पार्किंग मध्ये. मग म्हणलं एवढी आलेच आहे इथे तर जरा भाजी घेऊ एखादी. मग तिथेही चक्कर मारून काही भाज्या घेतल्या.

आता इतकी सगळी उलाढाल केल्यावर लक्ष्मी रोड ला जायची शक्ती नव्हती आणि पोटात कावळ्यांनी धुमाकूळ पण घातला होता. परत हातातलं सगळं लाटांबर सावरत अगत्य गाठलं. तिथे तब्येतीत सूप, चाईनीज भेळ आणि मिल्क शेक वगैरे हाणला. तसा माझा बेत खिमा पाव आणि कॅरामल पुडिंग  खायचा होता गुडलक ला जाऊन, पण  तिथे एकटीला जायला बरोबर वाटलं नाही म्हणून अगत्य वरच भागवलं. पुन्हा जाणार मी तिथे कधीतरी नवऱ्याला घेऊन.

आता ४ पिशव्या हातात, रणरणतं उन्ह डोक्यावर त्यात तुस्त जेवण झालेलं, मला खरंतर छानपैकी घरी जाऊन ताणून द्यायची इच्छा होत होती, पण २-३ पुस्तकं विकत घ्यायची होती मेहता पब्लिशिंग मधून. मग हे सगळ बारदान रचलं गाडीवर आणि आमची गाड़ी टिळक रोड कडे निघाली. मेहता च्या "T बुक क्लब" ची सभासद आहे मी.  त्या मालिकेतली २ पुस्तके आली होती, ती घेतली. पैसे कधीच संपले होते, पण कार्ड वर घेता येतात तिथे, त्यामुळे चिंता नव्हती. तसंच स्वामी, ययाती, भंडारभोग,शांताराम ही तर मला कधीपासून घ्यायची होती. ती ही घेतली हातासरशी. स्वामी, ययाती माझी २-३ दा वाचून झालीयत खरंतर, पण आपल्या संग्रही असावीत म्हणून घ्यायची होती. माझ्याकडे आता खूप पुस्तकं झाली आहेत, एक छानशी लायब्ररी आहे माझी. माझा मोकळा वेळ मजेत जातो पुस्तकात :)

तर अशी ४-५ तास उनाडक्या करून घरी आले एकदाची. येताना उसाचा रस पार्सल करून आणला होता, त्यात बर्फ टाकून प्यायले, छान पैकी ३ तास झोप काढली. नंतर नवरयाला फोन करून सांगितलं, जेवायला बाहेर जाऊ म्हणून. मग तो येईपर्यंत भंडारभोग (भंडारभोग आणि चौंडकं या पुस्तकावर जोगवा हा चित्रपट आधारलेला आहे) वाचायला घेतलं. नवरा आल्यावर  त्याला सगळ्या पिशव्या ओतून दाखवल्या, भाजीची सोडून. तो अवाक्. किती अनावश्यक वस्तू आणल्या म्हणून. ही ही.

मस्त आवरून जेवायला गेलो, येताना सीसीडी ची ब्राउनी आणि मफिन्स खाल्ले. आईशप्पथ, काय मजा आली त्या दिवशी. नवरयाची  अशक्य जळजळ झाली माझा दिवसभराचा उद्योग ऐकून. म्हणे, काय मस्त घालवलायस दिवस, अगदी तुला हवा तसा. (तो असताना इतके फिरू देत नाही मला, जे घ्यायचे आहे तेवढेच घ्यायचे आणि घरी यायचे, त्यामुळे त्यालाही बरंच वाटलं असेल की आता काही दिवस त्याच्या मागे लागणार नाही मी म्हणून.)

कधीतरी बरं वाटतं असा उनाडपणा करायला. आपण उत्साहात जास्त फिरतो, दमायला होतं थोडंसं. मी ही दमले होते,  पण हवा तसा दिवस गेल्यामुळे परत दुसरया  दिवसासाठी फ्रेशही झाले होते. विश्रांती घ्यायला लगेच येणारे शनिवार रविवार होतेच ना. मग काय.. एन्जॉय करायचं मस्त.
तुम्ही करता की नाही कधी असा उनाडपणा. एखादा दिवस असा घालवून पहा, ज्या दिवशी तुम्हीच फक्त सुट्टीवर. बाकीचे मित्र मैत्रिणी ऑफिस मध्ये काम करतायत आणि तुम्ही अशी छान मजा करताय, ही फिलिंग फार छान असते. :D

Read more...

माझा न बोलणारा मित्र

>> मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०१०


१० वर्षं झाली त्या गोष्टीला. आम्ही चहुबाजूनी गजबजलेल्या अशा शहराच्या मध्यवर्ती भागातून, म्हणलं तर गावात आणि म्हणलं तर गावाबाहेर अश्या ठिकाणी नवीन बंगल्यात राहायला जाणार होतो. आधी वाडा मग अपार्टमेंट अशा "आजूबाजूला खूप माणसे असलेल्या आणि त्याच वातावरणात रमणाऱ्या" आम्हा सगळ्यांना थोडं विचित्र वाटत होतं. बंगल्यात आपण एकटंच रहायचं , शेजारी पाजारी सगळे कंपाऊंड च्या पलीकडे, पाहिजे तेव्हा कुणाकडेही जाऊन गप्पा टाकत बसता येणार नाही ही कल्पना पचनी पडत नव्हती. विशेषत: माझी आई आणि आजी तर सुरुवातीला बाबांच्या विरोधातच होत्या म्हणा ना. तिथे त्यांना सुरक्षित वाटणार नाही असे त्यांचं म्हणणं. घर बांधून पूर्ण झालं तरी त्या दोघींचा हेका कायम होता. शेवटी आपण एक कुत्रा पाळू असे कबूल करून त्यांना कसंबसं तयार केलं.

माझी १२ वी परीक्षा झाल्यावर आम्ही तिकडे राहायला गेलो. प्रचंड मोठ्ठं पोर्च, मागे पुढे बाग आणि मधोमध छानसा टुमदार बंगला बघून मी आणि माझा भाऊ तर एकदम हरखून गेलो होतो. पण माझ्या आई-आजी ला मात्र आपण अश्या एकलकोंड्या जागी कसे काय राहणार याची चिंता सतावत होती. आणि त्या दोघी लवकरात लवकर कुत्रा आणण्यासाठी बाबांच्या मागे लागल्या होत्या. मी आणि भाऊ वेगळ्याच चिंतेत होतो. आम्हाला कुत्र्याची प्रचंड भीती वाटायची. मग तो आपल्याच घरात आणायचा म्हणल्यावर आमची काय अवस्था झाली असेल!

पण तो दिवस आलाच... एके दिवशी बाबा आणि आमच्या दवाखान्यातला एक कंपौंडर एक छोटंस काळं बंडल घेऊन गाडीतून उतरले. मला वाटलं काहीतरी असेल फाइलचा गठ्ठा वगैरे, म्हणून मी ते घ्यायला बाहेर गेले. पाहते तर एक गोंडस पिटुकलं जर्मन शेफर्ड जातीचं कुत्र्याचं पिल्लू. काळ्या लोकरीचा गुंडाच जणू. बाबांनी खाली सोडताच ते इकडे तिकडे निवांत फिरायला लागलं आणि माझी पळता भुई थोडी झाली. मी आणि भाऊ आम्ही एका खोलीत कडी लावून बसलो, कारण हे महाराज त्याच्या बापाचं घर असल्यासारखे हुंदडत होते. बरं ते इतकं छोटं होत कि त्याला बांधून ठेवायची काही सोय नव्हती. घरात शिरल्या शिरल्या त्याने एक फ्लॉवरपॉट फोडला, मिठाचं भांडं सांडलं आणि कोपर्यात ठेवलेल्या टेबलावरून एक टॉवेल ओढून तो चावत चावत सोफ्याखाली बसकण मारली.

आईने एका भांड्यात दुध - भाकरीचा काला करून त्याच्या समोर ठेवला. पण बेट्याला कळेचना की हे खायचंय. त्याने त्यावर पाय मारून भांडं उपडं केलं. पाणी दिलं तरी हीच गत. 2-3 दिवस असेच गेले. काही खायचं नाही आणि रात्री कुई कुई करत बसायचं. चौथ्या दिवशी त्याला कळलं कि कसं खायचं आणि कसं प्यायचं. आईच्या पायात पायात फिरायचा. स्वयंपाकघरात कट्ट्याखाली मुटकुळं करून बसायचा नाहीतर चारी पाय पसरून ताणून द्यायचा. आम्ही त्याचं नाव Jacky ठेवलं.

त्याचे दात छोटे छोटे पण टोकदार होते. दिसेल त्यात तोंड घालणे आणि सापडेल ते चावणे, चोथा करणे, एवढेच काम त्यांना. एक दिवस माझा पाय पकडला. माझं हार्टफेल व्हायचं बाकी होतं फक्त. पण तो मला चावला नाही, नुसता पाय पकडून ठेवला. याचा अर्थ तो मला त्या घरातला एक मेंबर म्हणून ओळखायला लागला होता. आणि या घटनेनंतर मात्र माझी भीती पूर्ण गेली. आम्ही एकमेकांचे मस्त दोस्त झालो.

जसा जसा तो मोठ्ठा होत गेला तसेतसे त्याचे कारनामे वाढतच चालले. आम्ही त्याला आमच्या खोलीशेजारच्या गच्चीत ठेवायला लागलो होतो. तिथून सगळ्यात वरच्या गच्चीत जाण्यासाठी जिना होता. हे साहेब एक दिवस खालच्या गच्चीत दिसेचनात. अचानक वरून कसलीतरी खसफस ऐकू आली म्हणून वर गेले, तर Jacky खाली येण्याचा प्रयत्न करत होता, आणि पायऱ्या उतरता येत नाहीत म्हणून नखाने जमीन खरवडत होता. कसाबसा त्याला खाली आणला, तर हा सरळ बेडरूम मध्ये जाऊन मस्त बेडवर झोपला.
                                  
मी आणि माझा भाऊ एकमेकांशी चढ्या आवाजात बोलत असलो, किंवा भांडत असलो, की हा शेजारच्या गच्चीतून गुरगुरायचा आणि नखाने खिडकीवर ओरखडे काढायचा. मोठी माणसे समोर असतील तर लहान लोकांकडे दुर्लक्ष्य करायचा. कुणाला महत्त्व द्यायचं आणि कुणाला नाही हे लॉजिक कुठून आलं होतं त्यालाच माहित.


एके दिवशी त्याला नाक जमिनीला लावून स्वत: भोवती गोल गोल फिरताना माझ्या आजोबांनी पाहिलं. त्यांना वाटलं याला काहीतरी लागलं. पाहायला गेले तर हा एका माशीला पकडायच्या प्रयत्नात होता. माशी अशी सापडते काय कधी, पण हे त्याला कुठलं कळायला. असाच तो कबुतर, कावळे यांच्या मागे धावायाचा. आमची भाषा त्याला कशी काय समजायची कोण जाणे, पण "माशी पकड", "Jacky , ते बघ कबूतर" "बिस्कीट देऊ?" यासारख्या वाक्यांना तो अपेक्षित प्रतिसाद द्यायचा.

गेट समोरून कुणी जात असेल तर एकदा clockwise आणि एकदा anticlockwise असा गोल गोल फिरत भुंकायचा. ही काय पद्धत होती काय माहित. त्याच्या या गोल फिरत भुंकण्यामुळे अख्या गल्लीत प्रसिध्द होते "Jacky गद्रे"

संध्याकाळी पोर्च मधल्या कट्ट्यावर मी कधी कधी बसायचे. मी बसले की हा आलाच. आल्या आल्या मांडीवर डोके ठेउन प्रेमात यायचा. अशावेळी समजून घ्यावं लागायचं, की मिस्टर Jacky  याना त्यांचे डोके थोपटून, गळ्याखाली खाजवून पाहिजे आहे. मग एकदम समाधी लागल्यासारखा, डोळे मिटून कान पाडून शांत बसून असायचा.

दोन गोष्टींना तो भयंकर घाबरायचा. एक डॉक्टर आणि एक त्याचा स्प्रे. एकदा त्याच्या पाठीला एक जखम झाली. त्यावर मारायला डॉक्टरनी एक आयुर्वेदिक स्प्रे दिला होता. कदाचित तो मारल्यावर त्याला झोंबत असेल. त्या स्प्रे च्या बाटलीला सुद्धा तो घाबरायचा. नुसतं स्प्रे हा शब्द जरी कुणाच्या तोंडातून आला तरी स्वत: च्या पिंजर्यात जाऊन बसायचा. कित्ती तरी दिवस त्याला कंट्रोल करायचं असलं की आम्ही ती स्प्रे ची बाटली दाखवायचो त्याला.चुकून जर एखाद्याचा त्या जखमेच्या जागी हात लागला, की भयंकर प्रकारे दात विचकायचा.  

त्याची फिरायला जायची वेळ झाली की मागच्या बागेतला त्याचा खास फिरायचा पट्टा तोंडात घेऊन स्वारी आमच्या पुढे मागे घुटमळत असायची. फिरून परत घरी आणलं की हाताला हिसका मारून त्या पट्ट्याचं दुसरं टोक स्वत: च्या तोंडात घेऊन आपापला चालता व्हायचा. हे शहाणपण कुठून आलं होतं कोण जाणे. 

अंघोळ घालून घ्यायला त्याला आवडत नसे. गरम गरम पाणी अंगावर ओतलं की डोळे बिळे मिटून शहाण्या बाळासारखा बसायचा, पण शाम्पू लावला रे लावला, की फडफड करून अंग झटकून टाकायचा की समोरचा ओला आणि फेसमय झालाच पाहिजे. एवढं करूनही कमी असल्यासारखं तिरका तिरका आमच्या अंगाला घासायचा. त्याच ते एवढं मोठ्ठं धूड पेलवणे म्हणजे सोप्पं काम नव्हतं.

कुत्रे इमानदार असतात तसेच आपल्या मालकाबाबत Possessive ही असतात. एकदा शेजार्यांनी एक पिल्लू आणलं म्हणून मी त्यांच्याकडे पाहायला गेले. ते सुद्धा Jacky शी मी खेळत असताना मधेच गेले. मी परत येईपर्यंत हा प्राणी नुसता मधल्या भिंतीलगत येरझाऱ्या घालत भुंकत होता.तिकडे उडी मारून यायचा प्रयत्न करत होता. जर का तो तिकडे आला असता तर त्या बिचार्या पिल्लाचं काही खरं नव्हतं. त्या शेजार्यांच्या कुत्र्याशी किती तरी दिवस दुश्मनी होती त्याची.


आम्ही नवीन कपडे घालून बाहेर आलो, की स्वत: हून आपल्या पिंजर्यात जायचा. तरीपण आम्ही तसेच थांबलो तर आत बाहेर चालू असायचं. असं वाटायचं की याला जर बोलता येत असतं तर म्हणाला असता, किती वेळ घालवताय, जा की पटकन, आणि मला मोकळं करा. पण तरीपण आम्ही जाणार म्हणून चिडून भुंकायचा .

असा हा आमचा Jacky ३ महिन्यांपूर्वी आम्हाला सोडून गेला. वय झाल होतं तसं. खात पीत नव्हता,  नुसता पडून असायचा. जवळ गेलं की आपणहून पाय आपल्या हातात द्यायचा.  माझा खूप जीव होता त्याच्यावर, आणि तो गेल्याचं कळल्यावर मला खूप वाईट वाटेल म्हणून  म्हणून आईने मला २-३ दिवस सांगितलंच नव्हतं. अजून आठवण येते त्याची. घरी गेलं की घर शांत शांत वाटतं. "Jacky" म्हणून हाक मारल्यावर पळत येऊन आपल्या अंगावर तो उडी मारणार नाही ही जाणीव झाली की नको नकोसं वाटतं.

किती जीव लावतात ना हे मुके जीव. आपल्या कुटुंबाचा एक सदस्य होऊन जातात. आणि मग त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला सवय होऊन गेल्यावर एक दिवस आपल्याला सोडून निघून जातात. त्यापेक्षा कधी कधी वाटतं नकोच पाळायला कुत्रा वगैरे. नकोच ते प्रेम लावणं आणि नकोच ते गेल्याच दु:ख. पण मग रिकामा पिंजरा बघून वाटतं, पाहिजेच  नवा दोस्त. परवा गेले होते सांगलीला तेव्हा बाबांना सांगून आलेय, नवीन पिल्लू आणायला जाल तेव्हा मी येईन तिकडे, नाहीतर ते मला लक्षात कसं ठेवेल!
त्याचं नाव पण Jacky च ठेवणार आहे मी.

Read more...

साहित्य दिवाळी!!

>> मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०१०

 

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
संपली... दिवाळी संपली... माहित्येय मला. पण मी अजून साहित्य दिवाळी या सणात रमलेली आहे. तुम्हाला वाटेल, काय बडबड लावलीय? साहित्य दिवाळी म्हणे.. फराळात झिंग येणारं काहीच नसत तरी पण हिला फराळ चढला बहुतेक...

हो हो.. झिंगच आलीय मला. साहित्यिक झिंग... तरीही मी जे काही लिहीन ते "अगदीच कामातून गेलेले" असे न मानता वाचावे, ही नम्र विनंती.

कसंय, काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी परवा परवाच, "ब्लॉग माझा" या  स्टार माझा ने आयोजित केलेल्या स्पर्धेबद्दल वाचनात आलं.  वाचनात आलं म्हणजे सरळ निकालच वाचला मी. ट्विटर वर भुंगा चा ट्विट वाचताना ही नोंद आढळली. सहज म्हणून त्या दुव्यावर गेले तर ५-६ पारितोषिक विजेते आणि खूप सारे उत्तेजनार्थ अशी मोठ्ठी यादी. आनंदाची गोष्ट म्हणजे प्रत्येक ब्लॉगरचं नाव आणि त्याच्या ब्लॉग चा पत्ता अशी व्यवस्थित यादी पाहून तर अगदी म्हणतात ना, "मन थुई थुई नाचू लागले" तश्या भावना आल्या मनात.

मग मी सपाटाच लावला, प्रत्येक ब्लॉग ला भेट देण्याचा. त्यातून जे जे लेख मला माझ्या टाईप चे वाटले, म्हणजे माझ्या सारख्या पामराला सहज कळतील, उमगतील असे, त्या त्या ब्लॉग ना मी सरळ अनुसरत  गेले. (म्हणजे शिम्पल म्हराटीत follow  केलं हो.. काय आहे, आपल्याला सवय झालेली असते ना शिम्पल बोलायची, लिहायची, मग अशी अवघड(?) भाषा झेपत नाही)  शनिवार - रविवार असे अगदी सत्कारणी लागल्यासारखे वाटतायत त्यामुळे.

ऑफिस मधे सुध्दा वेळात वेळ काढून मी हे अनुसरण केलेले ब्लॉग पाहतेय, वाचतेय. आणि त्यातून जो काही बुद्धीला म्हणा अगर मनाला म्हणा खुराक मिळतोय ना, त्यामुळे ही बौद्धिक नशा आलीय मला. रोज काहीतरी नवीन वाचायला मिळतंय. मधून मधून शाब्दिक फटाक्यांची आतशबाजी आहेच मनोरंजनासाठी. आधीचे काही लेख रूपी खादयही पोटात जातंय simultaneously. (याला मराठी शब्द समांतर होऊ शकतो, पण तो इथे जरा बरोबर वाटला नाही.) तर तुम्हाला आता कळलं असेल की मी वर काय काय बडबड केली ती सगळी या शतपक्वान्नांमुळेच. (पंचपक्वान्न कसं म्हणू? पाच पेक्षा जास्त ब्लोग्स आहेत ते :) )
म्हणून म्हणलं की माझी दिवाळी- साहित्यिक दिवाळी.अजून संपायचीय!!. चालत राहील पुढच्या दिवाळीपर्यंत.
सर्वाना याही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.


Read more...

बालपण देगा देवा

>> शुक्रवार, २० ऑगस्ट, २०१०

 

  
"शेजारयाची बायको जास्त सुंदर वाटते "ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. शब्दश: जाऊ नका. :) त्याचा अर्थ आहे, जे आपल्याकडे नाही ते माणसाला हवं हवंस वाटतं (ती डोळे मिचकावणारी स्माइली काढायची आहे मला..कशी काढू...) तुम्हाला वाटेल, ही मुलगी वेडी तर नाही ना?, वर शीर्षक आहे बालपण वगैरे, आणि सुरुवात काय, तर शेजारयाची बायको? काळजी नसावी. म्हणूनच त्या म्हणीचा अर्थ पण लिहिला मी. आणि पुढे सांगणार पण आहे का लिहिलय ते. 

मी शाळेत असताना एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता. विषय होता, "बालपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा" 
मला हे "मुंगी साखरेचा रवा" म्हणजे काय ते तेव्हाही नव्हतं कळलं आणि अजूनही ते अज्ञान दूर झालेलं नाही. 
असो, अर्थातच तेव्हा ते भाषण माझ्या आजोबांनी मला लिहून दिलं होतं (आता जरा तरी लिहिता येतंय मला, तेव्हा काहीच अक्कल नव्हती)  आणि मी मस्त पैकी रट्टा मारला होता. पण त्यातला "बालपण देगा देवा" हा भाग मात्र तेव्हा कळला होता. लहानपण कसं छान असतं, मोठ्ठ झाल्यावर ती सगळी मजा नाहीशी होते अश्या अर्थाचं भाषण होतं ते. मला इतका राग आला होता ना तेव्हा. म्हणे लहानपण छान असतं...काहीतरीच.. उलट सगळे लोक उगीचच मागे लागायचे... पाढे म्हणून दाखव,  श्लोक म्हण, अभ्यास कर, मार्क कमी का पडले,  शाळेला उशीर का झाला, गृहपाठ का केला नाही...एक ना दोन, हजारो प्रश्न..   खेळायला जाऊ का असं म्हणलं तरी आईच्या कपाळावर सतराशे साठ आठ्या पडायच्या. तेव्हा वाटायचं, शी, काय वैताग आहे, लवकर मोठ्ठं व्हावं आणि पळून जावं इथून.
(हा राग तेव्हा लगेच मावळला , जेव्हा मला ह्या भाषणासाठी पहिलं बक्षिस मिळालं :) )   

आज या घडीला मात्र ती उक्ति पुरेपूर पटते आहे. जेव्हा रोज सकाळी लवकर उठून, स्वयंपाक करून, ९ ला ऑफिस मधे पोहोचावं लागतं, जेव्हा दमून भागून घरी परत आल्यावर देखील स्वयंपाकघर वाट पाहत असतं आणि जेव्हा तोच सगळा संसाराचा रामरगाडा अहोरात्र ओढून थकून जायला होतं, तेव्हा खरंच वाटतं, की का मोठ्ठे झालो आपण?  

अगदी शाळेत असताना फ़क्त अभ्यास करणे, आणि चांगले मार्क मिळवणे एवढच तर काम असतं. खाणे-पिणे, कपडे-लत्ते वगैरे पहायला आई-बाबा असतातच. खर्च करायचाय तर पैसा आपणच मिळवला पाहिजे ही चिंता ही नसते. ११ वी आणि १२ वी जरा धामधुमीत जातात, कारण चांगल्या कॉलेज ला प्रवेश हवा असेल तर आपणच सिंसियरली अभ्यास करतो. तेव्हाही तसे आपले लाडच होतात. "करुदे अभ्यास करतेय तर, उठवू नका तिला (कधी नव्हे ते बसलीय एका जागी - मनातल्या मनात )" असे म्हणत खायची डिश, चहा आपल्या हातात आणून  दिला जातो. 

कॉलेज मधे गेल्यावर आपल्यालाच शिंगे फुटतात, आणि पहिली २ वर्षे टाईमपास मधे जातात (माझी तरी गेली आहेत हा). मग मात्र  कॉलेज मधे campus recruitment साठी कंपन्या यायला लागल्या की धावपळ सुरु होते आणि तिथेच आपण या "Rat race" चे शिकार होतो. अपेक्षांचं ओझं पेलता पेलता, आपण कधी मोठ्ठे झालो, आणि ते रम्य बालपण मुठीतून वाळूच्या कणांसारखं कधी निसटून गेलं हे ही कळत नाही.

मग अचानक एका प्रसन्न सकाळी कुठेतरी वर्तमानपत्रात तीच ओळ दिसते, आणि मग आठवणींची पाने वाऱ्याच्या झुळकीसरशी आपोआप उलटत जातात. मग आठवते ती शाळा, ते भाषण, ते बक्षीस, आणि ते हरवलेलं बाल्य-जे आता आपल्याकडे नसतं व पुन्हा अनुभवावंस वाटतं (आठवा-शेजारयाची बायको वाली म्हण आणि तिचा वर लिहिलेला अर्थ)  आणि पुन्हा पुन्हा देवाला सांगावंस वाटतं, बालपण देगा देवा.....               





Read more...

घर पहावं बांधून

>> गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

 
 
नमस्कार मित्र-मैत्रीणीनो,
बराच मोठा ब्रेक घेतल्यानन्तर आज ज़रा वेळ मिळालाय.आणि हात तर कधीपासून शिवशिवतायत लिहिण्यासाठी (म्हणजे किबोर्ड बडवण्यासाठी :) ). खरं सांगायचं तर लिहिण्यासारख काहीतरी घडायची वाट पहात होते.

शीर्षक पाहून चतुर वाचकांच्या लक्षात आलं असेलच की अस्मादिक "घर" नावाच्या मूलभूत गरजेची पूर्तता करता करता कुठेतरी अडकून बसले होते. अगदी बरोबर. हा हा, थांबा.. बांधून हा शब्द वाचून असं तर वाटलं नाही ना तुम्हाला, की मी बंगला वगैरे बांधलाय? तेवढी लायकी पण नाही आणि ऐपत तर नाहीच नाही. या पुण्यनगरीत बंगला बिंगला बांधणे म्हणजे काय खाऊ आहे का राव? पु.लं च्या भाषेत, जन्मदात्याने तरी ही बंगल्याची सोय केलेली हवी किंवा नवरयाच्या तिर्थरुपानी तरी.  नाहीतर आपल्यासारख्या पामरांचा काय पाड लागणार इथे.


तर बंगला वगैरे नाही, पण एक छानसा २ BHK फ्लैट घेतला. आणि आत्ता कुठे त्या गडबड़ीतून जरा मोकळा श्वास घेतेय. त्या बिल्डर ने फार पकवल आम्हाला. हे लोक ना पुढ़ारयांसारखे असतात. नुसती आश्वासने द्यायची. नाही कळल ? सांगते..
आम्ही जेव्हा घर बुक केलं तेव्हा ते जवळ जवळ ९०% बांधून पूर्ण झालेलं होतं. तेव्हा आम्हाला सांगण्यात आले, की बस २ महिन्यात नक्की ताबा देणार. (आश्वासन १) त्याच्या पुढे ५-६ महिने झाल्यावर आणि आम्ही त्याच्या पूर्वजांच्या भुतासारखे त्याच्या मानगुटीवर बसल्यावर कसंतरी उरकाउरक करून पझेशन दिलं. काही जास्तीच्या गोष्टी करून घ्यायच्या होत्या, जस की सर्व्हिस ओटा, जास्तीच बेसिन इ.इ. त्या ही करून द्यायला सांगितल्या. २ दिवसात होइल असे आश्वासन २ मिळालं.
पण कसचं काय! त्यात गेले २ महिने. वस्तुशांतिची तारीख १५ दिवसांवर आली. मग मात्र बिल्डर ऑफिस ला जाउन सज्जड  दम भरला. (हो हो मीच. हे काम बरं जमतं मला) शेवटी सगळी पेंडिंग कामे होउन आम्ही पूजा करून घेतली.

बिल्डर कड़ून तर सगळं काम झालं. पण आता नातेवाईक, घरचे लोक या सगळ्यांकडून वेगवेगळी मते यायला लागली. आधीच फर्नीचर करून घ्या, नंतर घर घाण होतं हा सल्ला महत्वाचा होता. चला एवढे पैसे घालतोच आहोत तर हे पण करून टाकू, असा ठराव सर्वानुमते पास झाल्यावर परत २ महिन्यांची निश्चिंती झाली.
मग आर्किटेक्ट कड़े जा, डिझाइन्स फायनल करा, स्वत:ची अक्कल पाजळा,  काहीतरी बदल सुचवा, यांव रंग, त्यांव सनमाईका असले उद्योग सुरु झाले. १०० वेळा तिथे जाउन सुतार, पेंटर याना सूचना करणं ओघाने आलंच. त्यात घराचा हप्ता सुरु झालेला. आम्ही भाड्याच्या घरात. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ घालण हेही एक मोठ्ठ काम होतं. पण स्वत:चं घर असं छान आपल्या नजरेसमोर साकार होताना स्टेप बाय स्टेप पहाण्यातली मजा काही औरच असते आणि ती आम्ही पुरेपुर अनुभवली.

प्रत्येकाने हे उद्योग कधी ना कधी केलेले असतील, ज्यानी नाही केले, ते नजीकच्या भविष्यकाळात यातून जातील यात काही शंका नाही. पण प्रत्येकाचे अनुभव नवीन असतील आणि ते अनुभवण्यातल सुख खरंच अवर्णनीय असतं हे मी नक्की सांगेन.    

आता १५ दिवस झाले आम्ही नव्या घरी रहायला येउन. आजकाल Movers and Packers मुळे सामान हलवणे एकदम सोप्पे झालेय. त्यामुळे २ दिवसात सगळ्या वस्तू जागच्या जागी विराजमान झाल्या. खूप छान वाटतंय, आपल्या स्वकष्टाच्या कमाईच्या घरात राहताना. नवीन नवीन स्वप्ने पहाताना. आणि त्या स्वप्नांना साकार होताना बघताना.
तुम्हा सगळ्याना नवीन नवीन वास्तू/घरे  घेण्यासाठी माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा!!!

ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफ़ळ सम्पूर्ण!! (श्रावण चालू आहे ना, शेवटच वाक्य लिहिल्याशिवाय कहाणी संपत नाही चातुर्मासात :) )  




Read more...

आमचा बॉस आणि आम्ही

>> सोमवार, १८ जानेवारी, २०१०

बरेच दिवस काहीच न लिहिल्यामुळें डोक्यात अनेक विचार साचून राहिलेत. आणि तेंडुलकरने सटासट षटकार ठोकावेत, अगदी तसेच ते मेंदूच्या आतल्या आवरणावर सटासट धड़का मारतायत. ज्या धड़कने डोक्यात सर्वात जास्त कळ आली तो विषय मी लिहायला निवडला.

आता शीर्षक वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल. पुणे विद्यापीठाचे कुलगुरु आणि प्रख्यात अर्थ-तज्ञ डॉ.नरेद्र जाधव यांनी लिहिलेल्या "आमचा बाप आणि आम्ही" या पुस्तकाशी साधर्म्य साधणारे काही आहे की काय हे? तर तसे काही नाही..नावाशी साधर्म्य आहे फ़क्त.

मला सांगा, आपल्यासारखी सामान्य माणसे स्वत:ला "आम्ही" म्हणतील का? (आपण काय UP वाले नाही स्वत:ला "हम" म्हणायला :) ) पण सामान्याला असामान्य आणि असामान्याला सामान्य करणारी एक शक्ती आहे आणि ती प्रत्येकाकड़े आहे, ती म्हणजे विचार. फ़क्त असा विचार करायचा की मी म्हणजे कोणीतरी "ग्रेट" आहे, आणि झोपायचं. की लगेच "मनी वसे ते स्वप्नी दिसे" या उक्तीचं "implementation" सुरु......

म्हणजे असा विचार करा, की तुम्ही चक्क पेशवे आहात. (आता इतक्यात तरी पुन्हा नवे पेशवे जन्माला येतील असे वाटत नाही, पण स्वप्न बघायला काय जातंय?) हा, तर पुढे.. तुम्ही जोरात ओरडताय, "सेवका, एवढेही कळत नाही? आम्ही आल्याची खबर देखिल नाही? जा सत्वर, आम्हास शीत जल घेउन ये" आणि हा सेवक, दुसरे तिसरे कोणी नसून तुमचा बॉस आहे.. हे होतं शीर्षकाचं विवरण. तर आता नमनाला घडाभर तेल न घालता शीर्षकाचं विवेचन ही सुरु करते.

आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही म्हणजे मीच आणि आयुष्याच्या २७ वर्षाच्या कालावधीत सर्वात कमी काळात सर्वात जास्त छळ मांडणारा प्राणी म्हणजे माझा बॉस. सकाळी ऑफिसला आल्या मिनिटापासून ते जाईपर्यंत नुसती कारणे मागत राहतो. "आज उशीर का झाला? आज कसे काय लवकर आलात? काम झालं का? का नाही झालं? लंच ला एवढा वेळ का? चहा घ्यायला १५ मि. लागतात का? नुसतं "प्रश्नचिन्ह" कोरलेलं असतं चेहऱ्यावर. बघावं तेव्हा "कारणे दाखवा" नोटिस पुढे करत राहतो. त्यात एक अख्खं वाक्य काही एका दमात बोलत नाही. अर्धं वाक्य झालं की अड़कलाच गीअर. म्हणजे प्रश्नांची सरबत्ती सुरु असेल, तर "why" नंतर २-५ मि. टेप अड़कलेली असते. keep guessing.... आपण मनात भरपूर "Permutations & combinations" करून उत्तरे तयार ठेवायची. नाहीतर नव्या लूप मधे अड़कायची भिती.

अचानक एखाद्या वेळी कोपरयातून एक आवाज येतो, "अरे ए....." की मग सगळे "अरे" बळी जाण्याची वाट पाहत राहतात. (मी सेफ असते ;) ) एक दिवस तर "New year resolutions" या विषयावर ५ तास मीटिंग... सगळा जेवणाचा विचका. पण या मीटिंग मधे एक सव्वाशेर भेटला या शेराला(की पावशेराला?)
नवीन लग्न झालेला एक लग्नाळलेला जीव तो. त्यात ६ वाजून गेलेले, आणि अर्थातच त्याला घरी पळायची घाई.
त्याने काहीच्या काही उत्तर दिले, "मी लवकर झोपणार आणि लवकर उठणार" कारण "लवकर उठे, लवकर निजे, तया ज्ञान,आरोग्य, संपत्ती लाभे". बॉस अवाक्. आत्तापर्यंत सर्वांनी "Technical" संकल्प सोडले होते, याने "Domestic" संकल्प सोडला. मग काय, "तखलिया" असे पुटपुटत बॉस अदृश्य झाला. त्या "Colleague" ला सगळयांनी नंतर खूप पिडलं ते वेगळं, पण त्याचा उद्देश मात्र सफल झाला, बॉस ला गप्प बसवण्याचा. तर एकूणच "मिटींग मिटींग" खेळणे हा आवडता उद्योग. एकदा तर म्हणे त्याची सासू गेली(गेली म्हणजे वर गेली) आणि त्यानंतर ह्याने "माणूस मेल्यावर जाळावे की पुरावे" यावर मिटींग घेतली. आहे की नाही अवघड? असा आमचा बॉस. समोरच्याला उत्तरे माहीत नसतील असे पश्न हुडकून विचारण्यात एकदम तरबेज. १० लोकांमधे एकाला पकड़ायचं आणि त्याला आपला वजीर बनावुन इतर गरीब जनतेवर(म्हणजे आम्ही इतर. मुकी बिचारी कुणीही हाका) सोडून द्यायचं. मग हा वजीर स्वत: राजा असल्यासारखा हवेतच कायम. मग एखाद्यानं त्याची हवा काढायची आणि अर्थात स्वत:त भरून घ्यायची. की मग आम्ही "सत्तांतरण" हा विषयावर बोलायला मोकळे.

याने एकतर वकील व्हायला हवं होतं किंवा राजकारणी.. पण भलतीकडेच आली गाड़ी आणि आमच्या इवलुश्या डब्यांना धड़कली. पुढचा इतिहास तर तुम्हाला कळलाच आहे. काही दिवसानी आम्ही इतिहासजमा होऊ पण हे पिवळं पान देठ मोडून हिरव्यात शिरायचं काही सोडणार नाही. असो... हे एवढेच कारनामे नाहीयेत.
कारनामे -> इनफिनिटी...... :D

आता या रामायणाचा शेवट जरा चांगला करावा. त्याच्यात अगदी काहीच चांगलं नाही असे नाही. कुठल्याही गोष्टीचा प्रचंड अभ्यास करणे ही वृत्ती. जी गोष्ट interesting वाटेल तिचा पार मुळापर्यंत जाउन शोध घेइल. (नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोधू नये म्हणतात, हा ते देखील करेल, बघाच तुम्ही..) एखाद्याचा पार पिच्छा पुरवेल, पण मग या सगळ्यातून जे काही निघेल ते बावनकशी सोनं (ही फार म्हणजे फार चांगली उपमा आहे. एवढ seriously घेऊ नका) असेल. ते ज्ञान इतराना देइल, काही हातचं राखून. पण मग त्यातून नवे प्रश्न अणि नवे लूप तयार होणे अपरिहार्य... अजुन एक चांगलं म्हणजे एखादी Dead-line अगदी जवळ येत नाही तोवर फारशी ढवळाढवळ करत नाही. सततच दडपणाखाली राहणं कुणाला आवडेल? त्यावेळी त्याच्या दृष्टीने ऑफिस मधली सर्वात दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट म्हणजे employee.

प्रत्येकाच्या बॉस मधे हा असा नमूना कुठे ना कुठे तरी दडलेला असतोच. पण आजकाल कॉपीराईट हे एक मोठं प्रस्थ झालंय. त्यामुळे, या लिखाणाच्या सुरुवातीला किंवा शेवटी, एखादा "Disclaimer" टाकावा की काय असा विचार चालू आहे. "वरील घटना किंवा व्यक्ति यांचे प्रत्यक्ष जीवनात काही साधर्म्य आढ़ळल्यास योगायोग समजावा"

[हा लेख माझ्या बॉसने वाचला तर? तर काय होइल, "Disclaimer" आहेच ना.. आल इज वेल चाचू]








Read more...

कशासाठी..गाण्यासाठी...

>> बुधवार, १३ जानेवारी, २०१०

वाचकहो.. तुमच्या सारख्या जाणकारांना एव्हाना कळलेच असेल की मी आता गाण्याबद्दल काहीतरी लिहिणार आहे ते. खरंय.. मी माझ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर आणि कार्यक्रमावर बोलणार आहे.
अर्थातच तुमचा , माझा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम, "सा रे "

"कलेला भाषा, धर्म, जात, प्रांत कशाच्याच सीमा नसतात. ती फ़क्त सादर करायची असते." असे कुणीतरी म्हणलंच आहे. (कुणीतरी म्हणजे मीच. पण "कुणीतरी" असे म्हणलं की जरा लोक नीट वाचतात, हा आपला मला आलेला एक अनुभव) हे अगदी शब्दश: खरं ठरावं अशीच परिस्थिति सध्या "सा रे " मधे आहे. मला मनापासून कौतुक वाटतं "राहुल सक्सेना" आणि "अभिलाषा चेल्लम" या दोघांचं. एक उत्तरेकडचा आणि एक दक्षिणेतली. आणि पश्चिमेत येउन हे लोक आपली कला इतकी उत्तम सादर करतायत ना की फ़क्त "वाह वाह, अप्रतिम" एवढच म्हणत रहावंसं वाटतं..गाण्यावरची अढळ निष्ठा... भाषा हा अडथळा न मानता फ़क्त आणि फ़क्त गाण्यासाठीच गातात असे वाटत. संत नामदेवांनी आपल्या एका अभंगात म्हणलच आहे "टाळ मृदुंग, दक्षिणेकड़े, माझे गाणे पश्चिमेकडे". शेवटी मराठी गाणी गायला आणि ऐकायला गोडच(तसं गायला अवघड आहे..असो) . त्यामुळे उत्तर, दक्षिण सगळीकड़च्याना मराठी गाणी गावीशी वाटली यात काही नवल नाहीच. "
ळ", "ण", "च" हे सगळे उच्चार ही दोघे इतके स्पष्ट करतात की कुणाला सांगून देखिल पटणार नाही की हे अमराठी आहेत. भावगीत, अभंग, हिप हॉप, लावणी सगळ्याच प्रकारात ही दोघे उत्कृष्ट आहेत. "नटरंग" या चित्रपटातील प्रसिध्द लावणी "मला जाऊदया ना घरी" अभिलाषा च्या तोंडून ऐकताना खूपच सुरेख वाटली. सगळे लटके , झटके, मुरके एकदम सटाक... अवधूत च्या भाषेत "नाद खुळा". तसेच राहुल चे, "खेळ मांडला" एकदम संयत, पक्क्या सुरांचे आणि गाण्यातील भावना बोलून दाखवणारे होते.
परीक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिक्रिया बाबतीत देखिल ही दोघे अव्वल आहेत. पण....
हा पण येतोच बघा मधे.. केवळ ते अमराठी आहेत म्हणून त्याना मते कमी मिळतायत. एरवी मराठीच्या मुद्द्यावरून मुंबई पेटलेली असते. "बाहेरचे लोक येतात, मुंबई घाण करतात, महाराष्ट्रात राहूनही मराठी बोलत नाहीत इ.इ." वादंग उठवणारे लोक आता शांत का बरं? उलट २ अमराठी मुलाना मराठीत गाणी गाताना पाहून यांना अत्यानंद व्हायला हवा. मतांसाठी या लोकानी आवाहन केले तर नक्कीच काहीतरी फरक पडेल.असो..
स्पर्धा काय होतच राहतील. आत्ता नाही तर पुढे कधीतरी हे तारे अत्त्युच्च ठिकाणी पोचणार यात काही शंका नाही.
तेव्हा तुम्ही आम्ही छानपैकी संगीताचा आनंद लुटुया... काय म्हणता?




Read more...

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP