आम्ही वेंधळी वेंधळी

>> गुरुवार, २३ डिसेंबर, २०१०

मी लहानपणापासून स्वत:मध्ये रमण्यात जास्त धन्यता मानत आलेली आहे. घरी एकटी असले तरी मी निवांत असते अगदी. कधी मित्र-मैत्रीणींमध्ये कल्ला करते तर कधी स्वत:ला वेळ देते. आता अश्या स्वभावाला "ती व्यक्ती जर हुशार असेल" तर "एककल्ली" स्वभाव असे म्हणतात, आणि "ती व्यक्ती जर बावळट असेल" तर "मंदबुद्धी" म्हणतात. या दोन्ही विशेषणांच्यामध्ये एक पुसटशी सीमारेषा आहे. त्या सीमारेषेवर मी असावी असे मला वाटतं , कारण मी "वेंधळेपणा" करते असे खूप लोकांचं मत आहे. (अगदीच चुकीच नाहीये ते). अश्या काही गोष्टी घडतात आणि नंतर माझं मलाच खूप हसू येतं.

आज, आत्ता, अर्ध्या तासापूर्वी मी असा एक हिट आयटम दिलाय. म्हणलं चला, ही मजा लोकांना सांगून त्यांना पण हसवूया थोडंस.  जसं आपण आपल्या चांगल्या गोष्टी लोकांना सांगतो आणि वाहवा मिळवतो, तसंच आपली गंमतशीर बाजू पण कळू दे लोकांना, काय?

तर झालं असं---
मागच्या महिन्यात आमच्या कंपनी मध्ये "ऑनलाईन लीव्ह अप्लिकेशन सिस्टीम" चालू झाली. म्हणजे आधी होतीच पण "Manual" पण रेकॉर्ड्स ठेवले जायचे. आता पूर्णपणे ऑनलाईन  करून टाकली. आम्हाला सगळ्यांना जानेवारी पासून च्या सुट्ट्या या नव्या सिस्टीम मध्ये भरायला सांगितल्या. आणि आम्ही तत्परतेने भरल्या. अहो सुट्ट्या हा किती जिव्हाळ्याचा विषय असतो हे मी काय वेगळं सांगायला हवं का? तुम्ही माझी "आमचा बॉस आणि आम्ही" ही पोस्ट वाचली असेलच. तर त्या सणकी बॉसने तितक्याच तत्परतेने त्या सुट्ट्या "Disapprove" करून टाकल्या. का तर त्या वेळी ते आमच्या ग्रुपचे इनचार्ज नव्हते म्हणे. आता आली ना पंचाईत. तसं पाहायला गेलं तर या सगळ्या सुट्ट्या वेगळ्या आणि वरच्या Authority कडून आधीच मान्य झालेल्या होत्या, आणि या माणसाच्या "Disapprove " करण्याने त्यात काही फरक पडणार नव्हता. तरीपण त्याने आपला हुद्दा दाखवलाच. आणि आमच्या घेतलेल्या सगळ्या सुट्ट्या परत आमच्या वर्षाच्या balance मध्ये जमा झाल्या.

झालं, HR वाले पण हैराण. त्यांच्या सिस्टीमच्या मुस्कटात मारल्यासारखं झालं त्यांना. त्यांनी एक तोडगा शोधून काढला. वरच्या लोकांशी बोलून , ज्या Authority ने आमच्या सुट्ट्या मान्य केल्या होत्या त्याचं नाव आमचा इनचार्ज म्हणून सिस्टीम मध्ये बदललं आणि आम्हाला परत सगळ्या सुट्ट्या भरायला सांगितल्या.
आता तसं वर्ष संपायला १ च आठवडा राहिलाय. आणि त्यात उद्याचा दिवस म्हणजे नाताळच्या पूर्वसंध्येला आम्हाला एक सुट्टी घेता येऊ शकते. ("Restricted holiday- RH" या नावाचा एक रजेचा प्रकार सरकारी कंपन्यांमध्ये असतो, ज्या हक्काच्या असतात आणि वर्षात अश्या २ दाच घेता येतात, त्याही सरकारच्या लिस्ट मध्ये असलेल्या दिवशीच.) त्यावर माझ्या २ सहकारी मैत्रिणी आणि मी चर्चा करत होतो. उद्याची  RH घेतली की सगळ्या सुट्ट्या संपतात, त्यामुळे आपण सर्व सुट्ट्या वापरून घेतल्या या आनंदात आम्ही असतानाच, एक मैत्रीण म्हणाली, "माझ्याकडे एक "Casual leave-CL" शिल्लक आहे, ती सोमवारी घ्यावी काय". आम्ही तिला ३१ डिसेंबर ला घे असा सल्ला दिला. त्या नंतर पुढच्या काही मिनिटात घडलेलं हे संभाषण:

मैत्रीण: वा, माझ्याकडे एक CL शिल्लक आहे अजून.
 मी: मस्त, घेऊन टाक, सोडू नकोस.
मैत्रीण: पण मी ती कधी घेऊ? सोमवारी की ३१ ला?
मी. अगं, ३१ ला घे, तशीही उद्या RH घेतल्यावर ३ दिवस मिळतायतच, ३१ ला शुक्रवार आहे, तेव्हा पण ३ दिवस होईल मस्त.
मैत्रीण: पण तू घेणार का तेव्हा सुट्टी?
मी: आं?  आता माझा काय संबंध? माझ्या सगळ्या CL आधीच संपल्यात बरंका. तुझी तू घे ना.
(ही मैत्रीण आणि मी, आम्ही एकमेकींकड़े पाठ करून बसतो)
 
हे मी बोलले आणि आजुबाजूला जोरदार हास्याचे फवारे उडाले. मला कळेना, काय झालं. "बरोबर आहे ना मी म्हणते ते, हिने सुट्टी घेण्याशी माझ्या सुट्टीचा काय संबंध?" असे म्हणून मागे  फिरले आणि मग मला कळलं काय झालं ते. एक नंबर वेंधळेपणा केला होता मी. "ती मैत्रीण तिच्या नवऱ्याशी फोन वर बोलत होती, आणि तिने त्याला विचारलेल्या प्रश्नांना मी  उत्तरे दिली होती."

वाळलेल्या पानांचा "सुबक" संग्रह- हर्बेरीअम

>> सोमवार, ६ डिसेंबर, २०१०

सध्याचे हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपट/नाटकं यांची जर कुणी तुलना करायची ठरवलीच, तर कोण श्रेष्ठ ठरेल हे काही मी वेगळं सांगायची गरज नाही. अहो काय ते हिंदी चित्रपट. काही शेंडा बुडखा नसलेली पटकथा, दे मार हाणामारी, प्रेमात पागल झालेले आणि कैच्या कै उद्योग करणारे नायक-नायिका किंवा मग एकदम काळ्या निळ्या कपड्यातले, स्वच्छ प्रकाशापेक्षा अंधारात जास्त सरावाने वावरणारे आणि खूप तत्वज्ञान झाडणारे लोक.  कसे बघायचे सांगा हे चित्रपट.. असो.

पहिल्यापासून मला चित्रपटांपेक्षा नाटकंच जास्त आवडतात. अगदी संगीत नाटकं पण मी आवडीने पाहते. त्यात पुण्यात असल्यामुळे नवीन नवीन आणि कसलेल्या नटवर्यांची नाटकं लागली बालगंधर्व किंवा यशवंतरावला (यशवंतराव चव्हाण नाट्यगृह) की मी शक्यतो सोडत नाही. अशीच काही महिन्यांपूर्वी एक बातमी वाचली होती. "१९६०-७० च्या काळातली गाजलेली मराठी नाटकं परत रंगभूमीवर आणण्याचं महत्वाचं काम "सुबक-सुनील बर्वे कलामंच" तर्फे हाती घेतलं आहे आणि त्या मालिकेतील पाहिलं नाटक "सूर्याची पिल्ले" याचे फक्त २५ प्रयोग महाराष्ट्रभर होणार आहेत." त्याच वेळी हे नाटक पाहायचं ठरवलं. पण नंतर कळलं की मुंबईत १३ आणि पुणे, कोल्हापूर, नाशिक अश्या इतर शहरांत मिळून उरलेले १२ प्रयोग असणार आहेत. आणि माझ्या दुर्दैवाने जे काही प्रयोग पुण्यात झाले, त्याला जायचा योग आला नाही.

काही दिवसांपूर्वी वाचलं की "सुबक" ची निर्मिती असलेले बाळ कोल्हटकर यांच्या "लहानपण देगा देवा" या सुखांती नाटकाचे २५ प्रयोग  "हर्बेरीअम"  सादर करणार आहे. घराच्या जाणत्या लोकांना, ज्यांनी त्यांच्या काळात खुद्द बाळ कोल्हटकर यांनी केलेलं हे नाटक पाहिलेलं आहे, त्यांना विचारल्यावर हे नाटक पाहायचा निर्णय अगदी पक्का केला.

"हर्बेरीअम" म्हणजे जुन्या वाळलेल्या पानांचा कुशलतेने केलेला संग्रह. या संग्रहातल्या या दुसऱ्या पानाचा पुण्यातला पहिला शुभारंभी प्रयोग बालगंधर्व ला होणार हे कळल्याबरोबर तिकीट काढून आले. या नाटकांची तिकिटे थोडी जास्त आहेत. पहिल्या १० की १२ रांगांचे तिकीट आहे ३०० रुपये. पण नाटकातले कलाकारच एवढे कसलेले आहेत, की मी विचार केला नाही जास्त. आणि तसंही चित्रपट जसा बाल्कनीतून पाहायला जास्त मजा येते, तसं नाटक हे शक्य तितक्या पुढच्या रांगेत बसून पाहिल्यानं त्याची लज्जत वाढते.

तर अश्या या नाटकाची गोष्ट इथे थोडक्यात सांगते.

अनंत उत्पात (जरा वेगळच आहे ना नाव?) नावाच एक माणूस आफ्रिकेहून बऱ्याच वर्षांनी अचानक आपल्या मुंबईला आपल्या बहिणीच्या घरी टपकतो आणि तिथेच तळ टाकतो. आणि चाळीतल्या सगळ्यांकडून मेव्हण्याच्या नावाने उधारी घेऊन सगळ्यांना बेजार करतो. हे सगळे लोक स्वत:ची खोटी प्रतिष्ठा जपण्याच्या नादात दुसऱ्यांना उधारी देऊन कर्जबाजारी झालेले आहेत. पण आपली अब्रू जाईल म्हणून कोणीच तसं  दाखवत नाहीत.

बहिणीच्या घरात तिची लग्नाला आलेली एक नणंद-शरयू आहे. ती पडलीय तिला गाणं शिकवायला येणारयाच्या-राजूच्या प्रेमात. पण त्या मुलाच्या बापाला हे लग्न मान्य नाही, का तर यांचं घराणं त्याच्या तोलामोलाचं नाही.तो बाप ही अफरातफरीच्या भानगडीत अडकलेला..

बहिणीचा नवरा-विसूभाऊ अतिशय भोळा भाबडा आणि बिच्चारा आहे. त्याचं एक दुकान आहे पण ते चालत नाही. पण हे वडिलांना कळू नये म्हणून प्रत्येक पत्रात दुकान उत्तम चाललंय असं कळवतो. दुकानासाठी घेतलेलं कर्ज फेडलं जात नाहीये, त्यामुळे कधीही दुकानावर बँकेची टाच येऊ शकते अशी परिस्थिती.

बहिणीचे सासरे-अप्पा,  गावाकडे असतात. त्यांचीही हीच गत आहे. प्रतिष्ठितपणाच्या हव्यासापायी राहतं घर गहाण पडलं आहे. पण हे मुलाला कळू नये म्हणून सगळं  कसं छानछोकीत  चालू आहे असं भासवतायत. 
या त्या कारणावरून सुनेला "तुमचं घराणंच तसलं" असे टोचून बोलणाऱ्या अप्पांना अनंता हा तिचाच भाऊ आहे हे माहित नाही, माहित करून दिलेलं नाही, कारण याने त्यांना पण त्यांच्या गावी जाऊन गंडा घातलाय आणि हे जर त्यांना कळलं तर ते दुकानात घातलेलं भांडवल काढून घेतील ही विसूभाऊना भीती आहे.

तर अशी हि सगळी गोलमाल अनंताच्या लक्षात आलीय. आणि त्या गोंधळात तो अजून भर टाकतोय नवे नवे उद्योग करून.

भाऊबिजेसाठी  आलेला अनंत उत्पात बहिणीला भाऊबीज घालतो की तिच्या गोंधळात अजून भर टाकून आफ्रिकेला निघून जातो, हे नाटकात प्रत्यक्ष पाहण्यात खरी मजा आहे. ते मी सांगत नाही. तुम्हीच पहा नाटक प्रत्यक्ष आणि आनंद घ्या.

पात्रपरिचय:
विश्वनाथराव-मंगेश कदम 
बहिण- शिल्पा तुळसकर
शरयू-स्पृहा जोशी
राजू-सचिन सुरेश
अप्पा-जयंत सावरकर
आणि
अनंत उत्पात- शरद पोंक्षे


नाटकात काम करणारे सगळेच कलाकार अतिशय कसलेले अभिनेते आहेत, त्यामुळे खरी बहार येते नाटक पाहताना. विशेषत: शरद पोंक्षे-.. अतिशय सुरेख आणि संयत अभिनय केलाय त्यांनी. मंगेश कदम यांचे काम ही सुंदर झालेय, भोळा भाबडा विसुभाऊ त्यांनी झकास उभा केलाय. दिग्दर्शन हि त्यांचंच आहे. स्पृहा जोशी या नव्या अभिनेत्रीने भूमिकेचं सोनं केलंय. (म्हणजे अग्निहोत्र मधली उमा बंड- हे काम तर तिने फारच छान केलं होतं).
एकूण काय तर तिकिटाच्या रकमेची पर्वा न करता हे नाटक जरूर जरूर पहा. तुम्हाला अजिबात पश्चात्ताप होणार नाही...

एक उनाड दिवस

>> शुक्रवार, ३ डिसेंबर, २०१०

दिवस: आठवड्यातला कुठलाही एक (शनिवार रविवार सोडून)
वेळ: भर दुपारी १२ ची
ठिकाण: माझी अत्यंत आवडती वेळ घालवण्याची जागा , तुळशीबाग  :)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वर्ष संपत आलं आहे. कंपनीने  दिलेल्या ८ आजारी सुट्ट्या (sick  leave) संपवण्याची वेळ आलेली आहे. उरलेल्या दिवसांमध्ये २ सार्वजनिक सुट्ट्या पण येणार आहेत. तेव्हा राहिलेली एक रजा जर मधल्या एखाद्या दिवशी , म्हणजे शनिवार रविवार ला न जोडता घेतली तर? असा विचार येण्याचे कारण एकच. तो एक दिवस हा पूर्णपणे तुमचा असतो, आणि तुम्हाला हवा तसा वापरता येतो. ज्या लोकांच मूळ गाव वेगळं आहे, आणि ५-६ तासांच्या अंतरात आहे, त्यांना माझ्या म्हणण्याचा अर्थ लक्षात येईल. त्यांना बऱ्याच वेळेला शनिवार रविवार ला जोडून रजा घेऊन घरी जावं लागतं, काहीतरी कार्यक्रम असतात, किंवा घरचे  बोलावत असतात म्हणून. मग अश्या वेळी स्वत:साठी , घरासाठी करण्यासारखी जी काही कामे असतात त्याला फाटा द्यावा लागतो. तुम्हाला हवा तसा दिवस घालवता येत नाही. कधी कधी आठवड्यातल्या त्याच त्याच दिनक्रमाचा कंटाळा आलेला असतो. मग अश्या वेळी एक सुट्टी अशी कामाच्या दिवशी मिळाली तर किती फ्रेश झाल्या सारखं वाटतं.

हाच विचार करून माझी राहिलेली आणि याच वर्षात संपवायची अशी एक सुट्टी मी घ्यायची ठरवली. नवऱ्याने विचारले, करणार काय आहेस अशी मधल्या दिवशी सुट्टी घेऊन? मी म्हणलं "उनाडक्या". खरंच, मी काहीही ठरवलं नव्हतं काय करायचं ते. 

अशी मध्ये अधे सुट्टी घेण्याची वेळ आली तर मी सहसा बुधवार पसंत करते. एक तर २ दिवस काम करून १ दिवस सुट्टी मस्त वाटते, आणि दुसरं म्हणजे परत २ दिवस काम केल की शनी-रवी आहेतच. त्यामुळे मी त्या बुधवारी अचानक आजारी पडले. (ते कंपनीत सांगण्यापुरत) खरं तर मला सकाळी उशिरा उठायचं होत, पण अहो ऑफिस ला जाणार म्हणजे काही चान्स नव्हता. पटपट त्याला नाश्ता, डबा देऊन ऑफिस ला पाठवलं. :) आणि मग आवरायला लागले.

साधारण ११ वाजता ३-४ पिशव्या आणि पर्स भरून बाहेर पडले हिंडायला. समस्त स्त्रीवर्गाचं  टाईमपास करण्याचं पुण्यातलं आवडतं ठिकाण म्हणजे तुळशीबाग आणि लक्ष्मी रोड.  (पु.ल. नी म्हणलेले आहेच नाहीतरी, की पुण्यातील लक्ष्मी रोड आणि मुंबईतील रानडे रोड इथे जगातलं काय मिळत नाही!! रानडे रोड झालाय थोडाफार एक्स्प्लोर करून, मागे मुंबईत होते तेव्हा) आधी तुळशीबागेत शिरले. उगाच jeans वरचे tops  पहा, ड्रेस मटेरीअल पहा अश्या टिवल्या बावल्या केल्या. विंडो शॉपिंग करायला आवडतं आपल्याला. मग चप्पल stall समोर रेंगाळले. २-३ दुकानं फिरल्यावर आपण काहीच घेतलं नाहीये अजून याची लाज वाटून एक चप्पल  घेतली(अर्थात चप्पल जोड). 

मग माझी नजर वळली  कानातली-गळ्यातली दुकानांकडे. तिकडे मी काही न काहीतरी घेतेच. त्यांना निराश नाही करत कधी. :)  तिथे जवळपास १०-१२ कानातली, २-४ गळ्यातली, बांगड्या वगैरे घेऊन मोर्चा बेडशिट, कपडे या दुकानाकडे वळवला. तिथेही थोडीफार खरेदी झाली. २ पिशव्या तर इथेच भरल्या होत्या.

मग जरा तुलसी-गायत्री या घरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मिळणारया दुकानांकडे चक्कर टाकावी असा विचार आला. घुसले गर्दीत. या तुलसी च्या बोळात मरणाची गर्दी असते. मग दिवस कोणता का असेना. मला सगळ्यात आश्चर्य वाटतं पुरुष मंडळींचं. ते या कोलाहलात का येतात कोण जाणे.  बिचारे कधी मैत्रिणीला दुखवायचं  कसं म्हणून, तर कधी बायकोला पिशव्या उचलायला येणार नाही म्हणून तिथे येतात आणि फसतात. कधी बायको खरेदी करत असताना लहान मूल कडेवर घेऊन उभे असलेले दिसतात. अर्थात काही काही स्वत: च्या इच्छेने येतात तो मुद्दा आहेच. :) तर अश्या या गच्च भरलेल्या बोळात मी शिरले, आणि कशी बशी तुलसी पर्यंत पोचले.

तिथे गेले की मला काय घेऊ काय नको असं होतं अगदी. मग काहीही गरज नसताना बरीचशी खरेदी होते. म्हणजे गेलेली असते कंगवा साफ करायचं उपकरण आणायला, पण घेऊन येते, ३-४ डबे, थोडे चमचे, बाउल, तवा/ताटल्या, फ्रीज च्या बाटल्या आणि इतर अनेक गोष्टी. नेहमीच्या या प्रथेला जागले मी आणि लागला चुना पाच-सहाशे चा इथेच. मग मी हाश्श: हुश्श: करत बाहेर आले, आणि जरा किती पैसे राहिलेत ते बघून एका सौदर्य प्रसाधने होलसेल मध्ये विकत मिळणाऱ्या दुकानात शिरले. झालं, तिथेही उगीच टाइमपास करून एखादं नेलपेंट, एखादं क्रीम वगैरे चुटपूट खरेदी करून बाहेर पडले. आता एकच पिशवी राहिली होती रिकामी आणि पैसेही फारसे उरले नव्हते. गाडी होती मंडइ जवळच्या पार्किंग मध्ये. मग म्हणलं एवढी आलेच आहे इथे तर जरा भाजी घेऊ एखादी. मग तिथेही चक्कर मारून काही भाज्या घेतल्या.

आता इतकी सगळी उलाढाल केल्यावर लक्ष्मी रोड ला जायची शक्ती नव्हती आणि पोटात कावळ्यांनी धुमाकूळ पण घातला होता. परत हातातलं सगळं लाटांबर सावरत अगत्य गाठलं. तिथे तब्येतीत सूप, चाईनीज भेळ आणि मिल्क शेक वगैरे हाणला. तसा माझा बेत खिमा पाव आणि कॅरामल पुडिंग  खायचा होता गुडलक ला जाऊन, पण  तिथे एकटीला जायला बरोबर वाटलं नाही म्हणून अगत्य वरच भागवलं. पुन्हा जाणार मी तिथे कधीतरी नवऱ्याला घेऊन.

आता ४ पिशव्या हातात, रणरणतं उन्ह डोक्यावर त्यात तुस्त जेवण झालेलं, मला खरंतर छानपैकी घरी जाऊन ताणून द्यायची इच्छा होत होती, पण २-३ पुस्तकं विकत घ्यायची होती मेहता पब्लिशिंग मधून. मग हे सगळ बारदान रचलं गाडीवर आणि आमची गाड़ी टिळक रोड कडे निघाली. मेहता च्या "T बुक क्लब" ची सभासद आहे मी.  त्या मालिकेतली २ पुस्तके आली होती, ती घेतली. पैसे कधीच संपले होते, पण कार्ड वर घेता येतात तिथे, त्यामुळे चिंता नव्हती. तसंच स्वामी, ययाती, भंडारभोग,शांताराम ही तर मला कधीपासून घ्यायची होती. ती ही घेतली हातासरशी. स्वामी, ययाती माझी २-३ दा वाचून झालीयत खरंतर, पण आपल्या संग्रही असावीत म्हणून घ्यायची होती. माझ्याकडे आता खूप पुस्तकं झाली आहेत, एक छानशी लायब्ररी आहे माझी. माझा मोकळा वेळ मजेत जातो पुस्तकात :)

तर अशी ४-५ तास उनाडक्या करून घरी आले एकदाची. येताना उसाचा रस पार्सल करून आणला होता, त्यात बर्फ टाकून प्यायले, छान पैकी ३ तास झोप काढली. नंतर नवरयाला फोन करून सांगितलं, जेवायला बाहेर जाऊ म्हणून. मग तो येईपर्यंत भंडारभोग (भंडारभोग आणि चौंडकं या पुस्तकावर जोगवा हा चित्रपट आधारलेला आहे) वाचायला घेतलं. नवरा आल्यावर  त्याला सगळ्या पिशव्या ओतून दाखवल्या, भाजीची सोडून. तो अवाक्. किती अनावश्यक वस्तू आणल्या म्हणून. ही ही.

मस्त आवरून जेवायला गेलो, येताना सीसीडी ची ब्राउनी आणि मफिन्स खाल्ले. आईशप्पथ, काय मजा आली त्या दिवशी. नवरयाची  अशक्य जळजळ झाली माझा दिवसभराचा उद्योग ऐकून. म्हणे, काय मस्त घालवलायस दिवस, अगदी तुला हवा तसा. (तो असताना इतके फिरू देत नाही मला, जे घ्यायचे आहे तेवढेच घ्यायचे आणि घरी यायचे, त्यामुळे त्यालाही बरंच वाटलं असेल की आता काही दिवस त्याच्या मागे लागणार नाही मी म्हणून.)

कधीतरी बरं वाटतं असा उनाडपणा करायला. आपण उत्साहात जास्त फिरतो, दमायला होतं थोडंसं. मी ही दमले होते,  पण हवा तसा दिवस गेल्यामुळे परत दुसरया  दिवसासाठी फ्रेशही झाले होते. विश्रांती घ्यायला लगेच येणारे शनिवार रविवार होतेच ना. मग काय.. एन्जॉय करायचं मस्त.
तुम्ही करता की नाही कधी असा उनाडपणा. एखादा दिवस असा घालवून पहा, ज्या दिवशी तुम्हीच फक्त सुट्टीवर. बाकीचे मित्र मैत्रिणी ऑफिस मध्ये काम करतायत आणि तुम्ही अशी छान मजा करताय, ही फिलिंग फार छान असते. :D

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP