किती रे पहावी वाट.....

>> शुक्रवार, ३ जुलै, २००९

गेले कित्येक दिवस तुझ्या येण्याकडे नजर लावून बसले होते मी... अगदी चातकाच्या आतुरतेने..
उदास आणि कासाविस मनाने रोज देवाला साकडं घालायचे, की देवा तो आता तरी येउदे..
अख्खं एक वर्ष उलटून गेलं होतं त्याला पाहून, भेटून आणि अनुभवून.

त्याचा तो स्पर्श...
कधी मायेचा..हळुवार असा..
कधी आवेगाचा...धसमुसळा.. तर
कधी उत्कट प्रेमाचा..
क्षणात जवळ घेणारा...क्षणात बोचणारा..

त्याचा माझा सहवास हा फ़क्त काही महिन्यांचाच, तसा तो देवानेच ठरवून दिलेला..
तो इतका प्रेमळ की त्या थोडक्या वेळात देखील प्रेमाच्या वर्षावात मला भिजवून टाकेल...
इतका रसिक की पाचुच्या दागिन्यांनी मला मढवून काढेल...
इतकं उदंड सुख माझ्या पदरात ओतेल की पुढचे, त्याच्या विरहाचे ते उदासवाणे आणि कंटाळवाणे दिवस झर्र्रकन निघून जातील...

पण या वर्षी तो असा का रुसला माझ्यावर? नेहमीच्या वेळेला आलाच नाही..
वाट पाहून पाहून डोळे थकून गेले..
देहाची पार रया गेली.. माझ्यातला तो रसरशीतपणा नावालासुद्धा उरला नाही..
सगळे पाचूभरले अलंकार निस्तेज झाले..

बघता बघता ठरलेल्या वेळेनंतर १ महिना उलटून गेला.. तरीही त्याचा काहीच पत्ता नाही. नेहमी तो येणार असला की कोण कोण त्याचा सांगावा घेउन येतं. तसंही या वेळी काहीच झालं नाही. काही फसवे संकेत मिळाले पण....

माझं पराकोटीच दु:ख त्याला समजत नाहीये का? हा विचार करून करून वेड लागायची पाळी आली..
माझ्यावर आणि त्याच्यावर अवलंबून असणारया आमच्या मुला-बाळांचं दु:ख मला बघवेना.

आणि अचानक.......
काल त्या मावळतीच्या सुर्याआडून मला माझ्या प्रिय सख्याचा तो परिचित असा सावळा चेहरा दिसला. मी आनंदले, मोहरले, थरारून उठले.
तरी पण ठरवल मनात की आज याला जाब विचारायचाच. पण मी असं काहीच करू शकले नाही. शरण गेले त्याला..
मग थोडसं चिडवून, थोडसं वेडावून आणि हलकेच गोंजारून माझ्या प्रियाने मला अलगद मिठीत घेतले. आणि त्याच्या प्रेमाच्या धारांमधे चिंब भिजवून टाकले.

या आमच्या भेटीचे साक्षीदार होते आमची असंख्य अपत्ये....पक्षी, प्राणी, झाडे, वेली आणि माणूस.
त्यांच्या डोळ्यातला तो आनंद मी कधीच विसरु शकणार नाही.....
...धरणी आईच्या लेखणीतुन

Read more...

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP