गणेशोत्सव आणि जातीयवाद

>> शुक्रवार, ११ सप्टेंबर, २००९

गेले काही दिवस आपण सगळेमिरजेतल्या धुमाकुळाच्या बातम्या ऐकतोय. प्रकरण कुठचं कुठे जाउन पोचलंय. आधी फक्त मिरजेत झालेल्या या वादावादीचे हे लोण आता सांगली, इचलकरंजी, आष्टा, कोल्हापूर आणि जवळपासच्या गावांमधे पसरलंय. अनेक हिंसक प्रकार झाल्यानंतर घोषित केलेल्या संचारबंदीमुळे गावांमधून शुकशुकाट आहे. पण या सगळ्या प्रकारामधे सामान्य नागरिक मात्र अडकला गेलाय. काही लोकांना मार खावा लागलाय तर काहींनी हकनाक आपले प्राण गमावले आहेत. शिवाय वाहने, घरे, दुकाने यांचं नुकसान झाले ते वेगळंच.
आपला देव ही यातून सुटला नाही. अनेक ठिकाणी मूर्ति भंग करण्याचे प्रकार घडले. मिरजेतले जे हिंदू भाग आहेत तिथे मांसाचे तुकडे टाकले गेले. मग यावर प्रतिक्रिया म्हणुन मुस्लिम धार्मिक स्थळांमधे मेलेले डुक्कर टाकण्यात आले. या सगळ्या जातीय भांडणांच नक्की मूळ काय आणि अंत कुठे आहे, हेच शोधणं अवघड होउन बसलंय आता. जिथे हे सगळे मुस्लिम बांधव जन्मापासून राहतायत, तिथेच त्यांनी "जय पाकिस्तान" सारख्या घोषणा द्याव्यात? म्हणजे ह्या लोकांनी ही भारत भूमि कधी आपली मानलीच नाही का जिने त्यांना आत्तापर्यंत आपल्या मुलांप्रमाणे माया दिली? असो.... सगळेच लोक असे नाहीत हे ही तितकंच खरं.. काही असंतुष्ट समाज कंटकांच काम आहे हे.
अनंत चतुर्दशीला होणारं गणपती विसर्जन या जातीयवादाच्या गोंधळामुळे शेवटी काल करण्यात आलं. आणि तरीही अजुन सांगली मधे संचारबंदी आहेच.. सगळे नागरिक कधी मोकळा श्वास घेणार आहेत ते परमेश्वरालाच ठाउक.
मुळात हे सगळ सुरु होण्यासाठी कारणीभूत ठरलेली ती कमान खरंच एवढी आक्षेपार्ह होती का? शिवाजी महाराजांनी अफ़झलखानाला मारतानाचा प्रसंग दाखवणे यात धार्मिक भावना दुखावण्यासारखं काय आहे? तो इतिहास आहे, आणि अर्थातच घडून गेलेली घटना आहे. असे दंगे करण्याने काय परिस्थिती बदलणार आहे थोडीच?
जे आहे ते आहे. त्याचा एवढा मोठा इश्यु करून कोणाचा फायदा झाला, हे ज्यानी ही दंगल सुरु केलीय तेच जाणे..
आता हे सगळं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालय हा अजुन एक योगायोग.. शेवटी वाचकांनी या दोन गोष्टींचा संबंध आहे की नाही ते ठरवायचं आहे. होय, त्यांनी आपल्या संचार करायच्या स्वातंत्र्यावर तात्पुरती बंदी घातली असली, तरी विचार स्वातंत्र्यावर कुठे घातलीय? नाही का?

Read more...

किती रे पहावी वाट.....

>> शुक्रवार, ३ जुलै, २००९

गेले कित्येक दिवस तुझ्या येण्याकडे नजर लावून बसले होते मी... अगदी चातकाच्या आतुरतेने..
उदास आणि कासाविस मनाने रोज देवाला साकडं घालायचे, की देवा तो आता तरी येउदे..
अख्खं एक वर्ष उलटून गेलं होतं त्याला पाहून, भेटून आणि अनुभवून.

त्याचा तो स्पर्श...
कधी मायेचा..हळुवार असा..
कधी आवेगाचा...धसमुसळा.. तर
कधी उत्कट प्रेमाचा..
क्षणात जवळ घेणारा...क्षणात बोचणारा..

त्याचा माझा सहवास हा फ़क्त काही महिन्यांचाच, तसा तो देवानेच ठरवून दिलेला..
तो इतका प्रेमळ की त्या थोडक्या वेळात देखील प्रेमाच्या वर्षावात मला भिजवून टाकेल...
इतका रसिक की पाचुच्या दागिन्यांनी मला मढवून काढेल...
इतकं उदंड सुख माझ्या पदरात ओतेल की पुढचे, त्याच्या विरहाचे ते उदासवाणे आणि कंटाळवाणे दिवस झर्र्रकन निघून जातील...

पण या वर्षी तो असा का रुसला माझ्यावर? नेहमीच्या वेळेला आलाच नाही..
वाट पाहून पाहून डोळे थकून गेले..
देहाची पार रया गेली.. माझ्यातला तो रसरशीतपणा नावालासुद्धा उरला नाही..
सगळे पाचूभरले अलंकार निस्तेज झाले..

बघता बघता ठरलेल्या वेळेनंतर १ महिना उलटून गेला.. तरीही त्याचा काहीच पत्ता नाही. नेहमी तो येणार असला की कोण कोण त्याचा सांगावा घेउन येतं. तसंही या वेळी काहीच झालं नाही. काही फसवे संकेत मिळाले पण....

माझं पराकोटीच दु:ख त्याला समजत नाहीये का? हा विचार करून करून वेड लागायची पाळी आली..
माझ्यावर आणि त्याच्यावर अवलंबून असणारया आमच्या मुला-बाळांचं दु:ख मला बघवेना.

आणि अचानक.......
काल त्या मावळतीच्या सुर्याआडून मला माझ्या प्रिय सख्याचा तो परिचित असा सावळा चेहरा दिसला. मी आनंदले, मोहरले, थरारून उठले.
तरी पण ठरवल मनात की आज याला जाब विचारायचाच. पण मी असं काहीच करू शकले नाही. शरण गेले त्याला..
मग थोडसं चिडवून, थोडसं वेडावून आणि हलकेच गोंजारून माझ्या प्रियाने मला अलगद मिठीत घेतले. आणि त्याच्या प्रेमाच्या धारांमधे चिंब भिजवून टाकले.

या आमच्या भेटीचे साक्षीदार होते आमची असंख्य अपत्ये....पक्षी, प्राणी, झाडे, वेली आणि माणूस.
त्यांच्या डोळ्यातला तो आनंद मी कधीच विसरु शकणार नाही.....
...धरणी आईच्या लेखणीतुन

Read more...

मुक्कामपोस्ट 'कंटाळा बंगला' ता.वैतागवाडी....

>> बुधवार, २५ फेब्रुवारी, २००९

काय दिवस आहे हो आजचा..सगळ्या गोष्टींचा अगदी वीट आलाय मला. सकाळपासून जे-जे काम करायच ठरवते आहे त्याला सगळीकड़े नुसता 'नन्ना' चा पाढा.

सुरुवात ऑफिस ला येण्यापासूनच झाली. आमचा घोड़ा (माझी अत्यंत आवडती स्कूटी पेप, कध्धी कध्धी त्रास देत नाही हो) काही केल्या हालायलाच तयार नाही (आजच मेली काय उसण भरली तिला, TVS च जाणे). किक मारून पाहिली पण छे...शेवटी काहीतरी करून कशीबशी एकदाची झाली चालू तर तोपर्यंत १० वाजून गेलेले. (लगेच आमच्या डोळ्यासमोर मॅनेजरचा चिडलेल्या बुलडॉग सारखा चेहरा अवतीर्ण झाला.)

तो सीन डोळ्यासमोर ठेउन, जितक्या स्पीड मधे गाडीला पळवणे शक्य होते तितक्या जोरात हाकत आणि सगळ्या सिग्नल्स ना नेहमीपेक्षा जास्त वेळ लागल्यामुळे जिथे तिथे थांबत, अशी तब्बल दिड तासाने पोचले एकदाची कंपनीत. सगळीकड़े नेहमी सारखी शांतता होती. म्हणल, 'चला इथे तरी सगळं व्यवस्थित दिसतय'. माझ्या जागेवर पोचले तर माझी नेहमीची खुर्ची कोणीतरी ढापलेली. मला दुसरी चालतच नाही. माझी खुर्ची नसेल तर माझी चिडचिड अजुनच वाढते. मग काय , तसच झाल. काम करायच सोडून आधी तो 'प्रोजेक्ट' संपवला आणि सापडली एकदाची माझी खुर्ची. म्हणतात ना.."दिवस असे की कोणी माझा नाही, अन मी कोणाचा नाही". जो तो मला त्रास द्यायला टपलेला.

मशीन चालू केलं. नेहमीच्या सवयीने मेलबॉक्स उघडला. बघते तर मेनेजर च्या 'ह्याssss' इतक्या मेल्स पडलेल्या. म्हणल, बघू निवांत. आत्ता तर एंट्री मारलीय.(आधी जीमेल पाहुया.) तासाभराने पाहिल, तर सगळ्या असाइनमेंट्स च्या डेडलाइन्स आजच..अरे देवा..काय वैताग आहे. पण काय करणार..दिवसभर खपून बरीचशी कामे मार्गी लावण्याशिवाय उरलय काय दुसरं हातात?

त्यात गाडीला किक मारून बरयापैकी कॅलरीज जळल्यामुळे दमलेही होते आणि कंटाळाही आला होता. दिवसाच्या सुरुवातीलाच इतक्या पनवत्या लागल्यावर काम करावंस वाटेल तरी का? पण...(हा 'पण' मधे मधे येउन फारच घोळ करतो नाही?) उरलेला दिवस ती रटाळ आणि कंटाळवाणी कामे पूर्ण करण्यात संपला. शेवटी शेवटी तर 'संदीप खरे' च्या कवितेतल्या त्या चाकरमान्यासारखाच मलाही 'कंटाळ्याचा कंटाळा' यायला लागला.

त्या दिवशी रात्री ११.३० वाजता, अनेक लोकानी दमलेला, थकलेला आणि खांदे पाडून चाललेला एक दु:खी जीव नक्की रस्त्यावर पाहिला असेल. देवाने आकाशातून पाहिले असेल का हो? पाहिले असेल तर त्याला नक्कीच दया आली असेल आणि तो विचार करत असेल की "मी बनवलेला इतका क्षुद्र प्राणी देखिल किती कष्टात दिवस काढतो आहे. पुढचा मानव बनवताना हा 'program' modify करायला हवा"..

Read more...

सारेगमप लिटिल चॅम्प्स चा अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल.

>> सोमवार, ९ फेब्रुवारी, २००९

८ फेब्रुवारी २००९ ...
सकाळपासून महाराष्ट्रातील प्रत्येक संगीत रसिकाला संध्याकाळच्या "सारेगमप महाअंतिम फेरी " चे वेध लागले होते. प्रत्येक जण दुसऱ्याला बजावून सांगत होता, की बाबारे संध्याकाळी काहीही बेत ठरवू नकोस. महाअंतिम फेरी चुकवायची नाहीये मला. सगळेजण आपापली कामे संपवून ७.३० च्या आत घरी परत आणि बरोब्बर ७.३० वाजता टीव्ही चालू झाले सगळ्यांचे....
सुरुवात छान झाली. सगळ्या स्पर्धकानी मिळून एक समूहगीत सदर केले. त्यानंतर "फॅन्सी ड्रेस राउंड" सारखी एक फेरी झाली.म्हणजे, तुम्हाला आठवत असेल तर दिवाळी च्या वेळी जुन्या काळातील काही गाणी या मुलानी सादर केली होती, मूळ गाण्यातल्यासारखे कपडे घालून. तीच सगळी गाणी या फेरीत झाली. आर्या ने "आता कशाला उद्याची बात", रोहितने "वासुदेवाची स्वारी", प्रथमेशने "सुंदरा मनामधे भरली", मुग्धाने "छड़ी लगे छम छम" आणि कार्तिकीने "मन सुद्ध तुज" ही गाणी गायली. त्यातल आर्या आणि प्रथमेश ची गाणी मस्त झाली.

आपले ज्यूरी म्हणजे सुरेश वाडकर, देवकी पंडित, संजीव अभ्यंकर, आशा खाडिलकर आणि श्रीधर फडके ही मंडळी मनापासून स्पर्धकांची गाणी ऐकत होती. दाद ही देत होती. बरेच दिग्गज कलाकार, गायक, संगीतकार या छोट्या गंधर्वांना आशीर्वाद देण्यासाठी खास उपस्थित होते.

त्यानंतर आपल्या महागयिकेने आणि आत्ताच्या विश्वगयिकेने, अहो म्हणजे वैशाली भैसने-माडे हिने "घन रानी" आणि "सात समंदर" ही गाणी पेश केली. नेहमीप्रमाणेच उत्तम.

मग आपल्या स्पर्धकांच्या हिंदी गाण्यांचा राउंड झाला. पण सगळी गाणी आधी गायलेलीच गायले हो सगळे. त्यातल ही प्रथमेश च "सूरत पिया की" अप्रतिमच. शब्दच नाहीत माझ्याकडे. आर्याने "वंदे मातरम" छान गायल. मुग्धाने "ये इश्क हाय" छान गायल. पण तिच वय लहान असल्याच मात्र जाणवल या गाण्यात. अहो जीव केवढासा तिचा. पण पोरीने आत्तापर्यंत जोरदार लढत दिली सगळ्या मोठ्या मुलाना.
ही फेरी झाल्यावर असे जाहिर करण्यात आले की आता sms करायची वेळ संपली आहे आणि सगळे ज्यूरी आत जाउन निर्णय घेणार आहेत.
शेवटचा राउंड ही नव्या गाण्यांचा नव्हताच. पूर्वी गायलेलीच पण जरा "ढ़िन चॅंग" गाणी होती. ही सगळीच गाणी मस्त झाली. आर्याने "छम छम", मुग्धाने "डोक फिरलया", कार्तिकिने "नवरी नटली" आणि "मोदक" प्रथमेशने त्याच्या नेहमीच्या स्टाइल पेक्षा चांगलच वेगळ "डिपाडी डिपांग" उत्तम रितीने सादर केल. रोहित ने तर "मोरया मोरया" हे गाण खरच "चाबुक" गायल हो. बरेच चढ़ उतार असुनही ओरिजनल वाटाव अस झाल अगदी. तसाही परफॉर्मेंस देण्यात रोहित भन्नाट च आहे...

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत जितक्या महाअंतिम फेरया झाल्या त्यामधे सारखे सारखे sms किती आले ते वाचून लोकांची उत्सुकता ताणणारया पल्लवीबाईनी एकदाही सांगितले नाही की कुणाला किती sms आले आणि कोण किती पुढे आहे. मुले येतायत, गातायत आणि जातायत. जरा विचित्र वाटल होत बघताना.

शेवटची फेरी झाली आणि झाsल.... संपली स्पर्धा...बघणार्यांच्या पोटात हाs भला मोठा गोळा. निकाल सांगण्यासाठी खळेकाकाना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आले. त्यानी प्रस्तावानेखातर छोटस भाषण केल, की तुम्ही सगळ्या मुलानी शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास करा वगैरे... आणि एवढे बोलून लोकांच्या पोटातला गोळा फोडला. महागायिका कोण तर म्हणे "कार्तिकी गायकवाड"
अर्ररर. माझा अशक्य भ्रमनिरास झाला हो. मी प्रथमेश ,आर्या किंवा रोहित यांच्या पैकी कुणाच्या तरी नावाची अपेक्षा केली होती. या सगळ्या ज्यूरीना हिच्या गाण्यात कुठे शास्त्रीय संगीत दिसल देव जाणे. नुसते अभंग तर गायली. कधीतरी आपल एखाद भावगीत, भक्तिगीत, लोकगीत. तिच्या त्या "नवरी नटली" ने तर माझ फारच डोक उठल होत राव. बर त्यात तिचे उच्चार स्पष्ट, शुद्ध नाहीत. बाकीचे चौघे कितीतरी पटीने कार्तिकी पेक्षा चांगले आहेत. पण.......... असो। त्यातल्या त्यात एक चांगल झाले की संगीत शिक्षणासाठी सगळ्याना सारखच बक्षिस मिळालय.
सारेगमपच्या पहिल्या सेशन च्या वेळी असच झाल होत. आठवतय का? ३ जण अंतिम फेरीत गेले होते. अभिजित कोसंबी, मंगेश बोरगावकर आणि अनघा ढोमसे. तेव्हाही sms चा काहीतरी घोळ झाला होता. अंतिम फेरी आधी कधीही sms मधे पहिला नसलेला कोसंबी अंतिम फेरीत एकदम महागायक च बनला(आणि हिंदी सारेगमप च्या पहिल्या १-२ राउंड्स मधेच उडाला पण). तेव्हा देखिल मंगेश आणि अनघा कित्येक पटीने उत्कृष्ट गायक होते.
चालायचच. असे धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल काही नविन राहिले नाहीत. आता सवय करून घ्यायला हवी आणि पुढच सारेगमप बघायला तयार ही व्हायला हव. नाही का?

(वि.सु : वरील लेख वाचून कुणाला वाईट वाटल असेल किंवा कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व: )

Read more...

तरुणाइला - भुलवणारा कवी.आणि डोलवणारा संगीतकार

>> मंगळवार, ३ फेब्रुवारी, २००९

ही तरुणाई ...
आभाळाची निळाइ ॥ सागराची गहराई।
हरेक क्षणाच्या डोळ्यातली रोषणाइ...

आजच्या तरुण पिढीच प्रतिनिधित्व करणार्‍या या कवितेचे शिल्पकार आहेत "तरुण" कवी "संदीप खरे".
तुम्हा आम्हा सामान्यांना सुचेल का हो, "तरुणाई" ला आभाळाइतक अथांग, समुद्राइतक खोल असे काही म्हणायला? नाही. आपली धाव कुम्पणापर्यंतच।

"जे न देखे रवि ते देखे कवी" असे म्हणतात. खरच तर आहे. उत्कृष्ट कविता जन्माला येण्यासाठी, जे पाहिल नाही ते शब्दात साकारण्याच सामर्थ्य हव. आणि जे पाहिल, त्याला हवा तसा आकार देऊन कवितेच्या साच्यात बसवता यायला हव.

संदीप खरे ला (मी एकवचन वापरते आहे कारण हा कवी अगदी आपल्यातलाच आणि आपल्यासारखाच तरुणाइने बहरलेला आहे) या दोन्ही गोष्टी सहजगत्या आणि उत्तम अवगत आहेत.
इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेला संदीप मनापासून कवितेला मानतो। हा कधी असतो एक रोमॅंटिक प्रेमवीर तर कधी असतो एक विरह्ग्रस्त असफल प्रेमिक. मधेच तो छोट्यांबरोबर छोटा होतो तर थोरांबरोबर थोर। तो शब्दातूनच एखाद्या घटनेचे वर्णन असे काही उभं करतो की बस...आपल्याला वाटत की मी प्रत्यक्ष बघतोय की काय...त्याच उत्तम उदाहरण म्हणजे "कसे सरतील सये" ही कविता. नुसती ऐकली तरी असे वाटत की आपल्या प्रियकराच्या काही काळाच्या त्या विरहाने ती मुलगी आपल्या गुलाबासारख्या २ नेत्रातुन टप टप आंसू वाहते आहे। वाह वाह, काय कल्पना आहे. हे असे विचार कवीच करू जाणे.

लहान मुलांचा "अग्गोबाई ढग्गोबाई" हा अल्बम तर खुपच छान जुळून आलाय. सगळी गाणी एका पेक्षा एक.
"दूरदेशी गेला बाबा " तर खुप "touching" आहे तर "सुपरमॅन" मधे चक्क सुपरमॅन आणि हनुमान यांची ओळख आहे , माहितीय?

"कधी हे कधी ते", "मी गातो एक गाणे", "दिवस असे की", "आयुष्यावर बोलू काही", "नामंजूर", "सांग सख्या रे", "अग्गोबाई ढग्गोबाई" इतके सगळे अल्बम्स आत्तापर्यंत प्रदर्शीत झालेले आहेत। तसेच "मौनाची भाषांतरे" आणि "नेणिवेची अक्षरे" हे कविता संग्रह ही त्याच्या खात्यावर जमा आहेत.

त्याच्या सर्व गाण्याना सुमधुर संगीत देणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. सलिल कुलकर्णी। अतिशय गोड पण तितकाच खणखणित आवाज ही दैवी देणगी असलेला हा गृहस्थ M.B.B.S. आहे। पण संगीत हेच कार्यक्षेत्र मानलेला सलिल "आयुष्यावर बोलू काही" या कार्यक्रमात संदीप ची पुरेपूर साथ देतो।

सलिल ची मला आवडलेली काही गाणी म्हणजे "पाउस असा रुणझुणता", "हे भलते अवघड असते" आणि "संधिप्रकाशात"। अप्रतिम गाणी....

खरया अर्थाने आजच्या तरुण पिढीला आपल्या शब्दानी भुलविणारया आणि संगीताने डोलविणारया या जोड़गोळीला भविष्यात देखिल असच भरभरून यश मिळो हीच देवाकडे प्रार्थना।

Read more...

चुकीची ऐकलेली गाणी

>> गुरुवार, २९ जानेवारी, २००९

माझी एक जुनी सवय आहे, की जर गाण्यातला एखादा शब्द किंवा वाक्य कळले नाही तर आपल्याला जे यमकाप्रमाणे बरोबर वाटतं ते बिनधास्त ठोकुन देणे. अशी काही चुकीची ऐकू आलेली गाणी खाली देत आहे ...
--------------------------------------------------------------------------------------------------
"देवदास" मधे एक गाणे आहे. "काहे छेड मोहे",त्या मधे माधुरी च्या आवाजातल्या काही ओळी आहेत. एक वाक्य ती म्हणते, "आहट सुन जियरा गयो धडक धडक धडक",..
ही ओळ मी बरेच दिवस,"आह ठुसुम जियरा गयो धडक धडक धडक" अशी म्हणायचे.
--------------------------------------------------------------------------------------------------
महानंदा या सिनेमातील एक गाणे...
मागे उभा मंगेश ..त्या मधे एक कडवे आहे।

जन्मजन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी
विरागी की म्हणू भोगी
शैलसूतासंगे गंगा, मस्तकी वाहे

हे मला कसं ऐकु यायचं माहितिय?
जन्मजन्मांचा हा योगी, संसारी अनंत भोगी
विरा कीर्ती म्हणू भोंगी (भोंगी म्हणजे आमच्या सांगली कडे सिमला मिरची)
शैलसूतासंगे रंग, मस्तकी वाहे.

मला वाटायचं, की कसलं गाणं आहे, शंकराला "भोंगी" काय म्हणते?, आणि म्हणते ते म्हणते आणि वर डोक्यावरुन रंगाची गंगा का वाहवते?

----------------------------------------------------------------------------------------------

"सारेगमप लिटिल चॅम्प्स" मधल्या मुग्धा ने "एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाये तुझी कोल्यावरी" .. हे गाण
"एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाये तुझी कोल्ह्यावरी.. अस म्हणल होत । तिला अवधूत दादा ने नंतर सांगितले पण होते, की बाळा, ते "कोल्यावरी" असे आहे. आणि यावर माझा आणि माझ्या "अहों" चा बराच वाद झाला. त्याचं म्हणणं ते कोल्ह्यावरी च आहे. मी बरच सांगुन पाहिल की एकविरा ही कोळी लोकांची देवी आहे, त्यामुळे ते "कोल्यावरी" असे आहे. पण छे हो, पटायलाच तयार नाही त्याला. त्याच्या logic प्रमाणे,त्या देवीला बळी द्यायची पद्धत असेल आणि म्हणुन बळी साठी आणलेल्या "कोल्ह्यावर" तिची नजर असणारच...आता मला सांगा, कोंबडी, बकरा, अगदी जुन्या काळी रेडा पण बळी दिलेला ऐकलाय मी, पण कोल्हा बळी दिलेलं अजुन तरी कानावर आल नाही. तुम्ही ऐकलय का?
------------------------------------------------------------------------------------------------



Read more...

यू टर्न - अप्रतिम नाटक

>> बुधवार, २८ जानेवारी, २००९

नाटक अणि सिनेमे बघणे हा आपला आवडता उद्योग... त्यातल्या त्यात नाटक जरा जास्तच प्रिय आहे मला।
आणि माझ्या नशिबाने मला ती संधी अगदी लहानपणापासून मिळत गेली। मी मुळची सांगली ची, आणि सांगली "नाट्यपंढरी" म्हणुन ओळखली जाते हे उभ्या महाराष्ट्रात सगळ्यानाच माहीत आहे। अगदी ३-४ वर्षाची असल्यापासून मी संगीत नाटके बघत आले आहे। अर्थात तेव्हा काही कळायच नाही, पण छान वाटायच। त्यातली गाणी अपोआप पाठ होउन जात. कदाचित याच काळात नाटकान्बद्दल आवड निर्माण झाली असावी।

हा, तर फारसे न भरकटता मी मूळ मुद्द्यावर येते। सध्या मी पाहिलेल नवीन नाटक म्हणजे "यू टर्न"। डॉ गिरीश ओक अणि इला भाटे यांच्या प्रमुख भूमिकानी सजलेल हे नाटक खूप छान आहे। विषय आहे "उतारवयातील मैत्री" अर्थात "companionship"।

गिरीश ओक आहेत एक रिटायर्ड मेजर "सुधीर वैद्य"। ते मुंबई मधे रहातात . त्यांचा अणि त्यांची बायको स्वाति हिचा काही मतभेदान्मुळे घटस्फोट झाला आहे. त्याना एक मुलगी आहे , मधु। तिच लग्न झालेल आहे आणि ती सध्या बंगलोर ला असते। ती प्रेग्नंट आहे। मेजर तिच्या चिंतेत आहेत, कारण त्यांच्या मते जावई एकदम टुकार आहे.

इला भाटे या आहेत एक गृहिणी अणि दिवंगत ACP प्रभाकर गोखले यांच्या पत्नी रमा गोखले .त्या पुण्याला असतात. त्याना एक मुलगा आहे, साहिल, जो सोफ्टवेअर इंजिनियर आहे आणि लंडन मधे असतो।

मेजर आणि रमा या दोघांची भेट योगायोगाने होते. रमा या मुंबई ला एका मैत्रिणीकडे आलेल्या आहेत पण त्याना घराला कुलुप दिसते। व मैत्रिणीला फ़ोन केल्यावर त्याना कळते की तिला यायला अजुन अर्धा तास आहे. तो वेळ कुठे बसणार म्हणुन त्या समोरच्या घराची बेल वाजवतात। अणि ते घर असत मेजर सुधीर वैद्य यांच। हा माणूस जरा फटकळ आहे। त्यांना त्यांच्या मोर्निंग वोक च्या वेळी या बाई आलेल्या अजिबात आवडलेल नाही। ते गोखले बाई शी जरा उर्मटपणेच बोलतात । पण नाईलाजाने का होइना पण त्याना चहा बिस्किट्स देतात। बाई एकदम बोलक्या आहेत। त्याना नुसता चहा प्यायल्याने एसिडिटी होते वगैरे गोष्टी पण त्या बोलून टाकतात। दरम्यान मेजरच्या घरी एक फ़ोन येतो। त्यानी पेपर मधे दिलेल्या "companionship" च्या जहिरातिबद्दल एका बाई ना बोलायच असत। रमाने फ़ोन घेतला म्हणुन मेजर रागवतात। पण त्याच वेळी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ही ठेवतात। त्यानंतर काही वेळाने, मैत्रिण आली म्हणुन रमाबाई निघून जातात। मेजर च फ़ोन नम्बर घेउन जातात व जाताना कृतद्न्यता म्हणुन त्याना घरी पुण्याला यायचे आमंत्रण ही देतात.

या रमाबाईना रोज रात्री डायरी लिहायची सवय आहे। त्या वेळी त्यांच्या लक्षात येत की चश्मा मुंबई ला च राहिला. त्या मेजर ना फ़ोन करून चश्मा ठेउन द्यायची विनंती करतात व पुढच्या वेळी घेउन जाइन असे सांगतात। तेवढ्यानेही हा माणूस वैतागतोच। म्हणजे बघा।

रमाबाई पुढच्या वेळी मानत काहीतरी विचार करून जातात। मेजर त्याना चहा अणि हो बिस्किट्स पण देतात। रमाबाईना त्यांची ही छोटीशी गोष्ट लक्षात ठेवली म्हणुन अप्रूप वाटत। तेवढ्यात पण "companionship" साठी मेजरना फ़ोन येतो। आणि रमाबाई "मैत्रिणीसाठी" म्हणुन त्याबद्दल काही प्रश्न विचारू लागतात। तेव्हा अचानक टीव्ही वर बातमी येते की लंडन मधे काहीतरी बोम्बस्फोट झाला आहे, आणि साहिल(रमाबाई चा मुलगा) जिथे काम करतो तिथेच झाला आहे। रमा बाई ना त्याचा फ़ोन लागत नाही। अशावेळी मेजर त्याना खूप मानसिक आधार देतात व स्वत:च्या सर्व ओळखी वापरून बाइंच साहिल शी बोलणे घडवून आणतात। या प्रसंगानंतर ते दोघे "companion" म्हणुन राहण्याचे ठरवतात.

त्या दोघांच्या मुलाना ते कधीच आवडत नाही। साहिल लग्न ठरवतो पण आईला बोलवत नाही। तर मधु बाळन्तपणासाठी मुंबई ला न येता आपल्या आईकडे जाते,तेही मेजर च्या इच्छेविरुद्ध। शेवटी दोघाना ही कळते की आपली मुलेच आपल्यासाठी महत्वाची आहेत। आणि ते या वेगळ्या ट्रेक वरून "यु टर्न" मारून परत आपल्या पहिल्या रस्त्याला लागतात.
------------------------------------------------------------------------------------------------
या नाटकामधे दोघांची कामे अप्रतिम झाली आहेत। पण मला शेवट जरासा खटकला . "ते मुलांच म्हणण मानून आपल्या आनंदाचा त्याग करतात" या ऐवजी "मित्र म्हणुन एकमेकांबरोबर रहाणे पसंत करतात" असा शेवट जास्त भावला असता असे वाटत। पण मग "यु टर्न" हे नाव सार्थ ठरल नसत म्हणा। असो, कसाही शेवट असला तरी नाटकाची संकल्पना चांगली आहे हे मान्यच...

तर तुमच्या गावात/ शहरात हे नाटक लागले तर अवश्य पहा.

Read more...

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP